मुंबईतील चिऊताई पोहोचली कझाकिस्तानात!

जागतिक चिमणी दिनानिमित्त चिमण्यांच्या घसरत्या संख्येवर लक्ष देण्याची गरज

    20-Mar-2024   
Total Views |

world sparrow day

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारतातील चिमण्यांच्या (Sparrow day) संख्येत झालेली घट 'स्टेट ऑफ इंडियन बर्ड्स'च्या अहवालामध्ये नोंदविण्यात आली आहे. 'हाऊस स्पॅरो' (Sparrow day) अर्थात आपल्या घराजवळ आढळणाऱ्या चिमण्या या आंतरराष्ट्रीय स्थलांतर करतात हे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मुंबई, राजस्थान, तामिळनाडू रिंग केलेल्या चिमण्या कझाकिस्तान, उझबेकिस्तान, ताझिकिस्तान आणि बांग्लादेशमध्येही नोंदविण्यात आल्या होत्या.






काही वर्षांपूर्वी चिमण्यांचा (Sparrow day) अभ्यास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र, राजस्थान, तमिळनाडू आणि दिल्लीत त्यांना रिंग करण्यात आले होते. चिमण्यांना रिंग करण्याच्या या प्रकल्पामध्ये स्पॅनिश स्पॅरो आणि हाऊस स्पॅरो या दोन उपप्रजातींच्या चिमण्यांना रिंग करण्यात आले होते. यामध्यमातून शास्त्रज्ञांना हाऊस स्पॅरो प्रजातीमधील आठ चिमण्यांच्या स्थलांतराच्या नोंदी मिळाल्या. या चिमण्या कझाकिस्तान आणि तझाकिस्तानमध्ये तसेच बांग्लादेशमध्ये आढळल्या. तमिळनाडूमध्ये रिंग केलेली एक चिमणी चार वर्षांनी बांग्लादेशमध्ये आढळली. तर, आठपैकी चार चिमण्या तझाकिस्तानमध्ये गेल्याच्या नोंदी आहेत. उर्वरित तीन चिमण्या कझाकिस्तानच्या भागांमध्ये आढळल्या. यामध्ये रिंग केल्यानंतर काही चिमण्यांची ९९ दिवसानंतर, तर काहींची ३ वर्षांनंतर नोंद करण्यात आली आहे.
स्पॅनिश स्पॅरोच्या रिंग अहवालामध्ये पाच नोंदी शास्त्रज्ञांना मिळाल्या आहेत. यापैकी चार चिमण्यांना राजस्थानच्या भरतपुरमध्ये, तर एका चिमणीला मुंबईत रिंग लावण्यात आली होती. मुंबईत रिंग लावण्यात आलेली स्पॅनिश स्पॅरो अवघ्या ८१ दिवसांत कझाकिस्तानमध्ये पोहोचली. चिमणांच्या स्थलांतराचा हा सर्वात कमी कालावधी नोंदविला गेला आहे. तर, सर्वाधिक कालावधी ८ वर्षांचा नोंदविण्यात आला आहे. ज्यामध्ये भरतपुरमध्ये रिंग केलेली चिमणी पाकिस्तानमध्ये आढळली आहे. उर्वरित तीन चिमण्या भरतपुरमध्येच रिंग केल्या गेल्या होत्या आणि पुढे त्या कझाकिस्तानमध्येच नोंदविल्या गेल्या. कझाकिस्तानच्या जांबिल परिसरातुन रिंग केलेली एक चिमणी भरतपुरमध्ये ही नोंदविली गेली आहे. या नोंदींमुळे चिमण्या या स्थलांतर करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चिमण्यांची संख्येत नोंदवण्यात येणारी घट ही या स्वरुपाच्या स्थलांतरामुळे देखील असू शकते का, यावर अभ्यास करणे गरजेचे आहे.

“हाऊस स्पॅरो वाढते शहरीकरण, किटकनाशकांचा वाढलेला वापर तसेच मोबाईल टॉवर्स अशा मुख्य कारणांमुळे जवळपास दिसेनाशी झाली आहे. मुंबईतील चिमण्यांची ८० ते ८४ टक्क्यांनी घट झाल्याची नोंद आहे तर, पुण्यातील आयटी पार्क आणि तत्सम बांधकामे वाढलेल्या भागातुन, वृक्षतोड झालेल्या भागातुन चिमण्या ९० टक्क्यांनी घटल्या आहेत. जुन्या बागा, वाडे, घरं, जनावरांचे गोठे अशा भागांमध्ये चिमण्या तग धरू शकत होत्या, मात्र सिमेंटच्या बांधकामांवर तग धरू न शकल्यामुळे चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.”

- प्रेमसागर मेस्त्री,
पक्षी अभ्यासक



समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.