जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ हा आवाज कानावर पडताच क्षणी साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे डोळ्यांसमोर उभे राहतात. बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अनुकरण करीत, या घोषवाक्याद्वारे शिवसैनिकांना साद घालण्याचा प्रयत्न केला; पण त्याला कधीही ’ठाकरे’ शैलीची धार चढली नाहीच. केवळ ‘बाळासाहेबांचा पुत्र’ म्हणून उद्धवरावांनी मान-सन्मान पदरात पाडून घेतला खरा; पण त्यांना तो फारकाळ टिकवता आला नाही. ‘किचन कॅबिनेट’च्या नादाला लागून, त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. असंगाशी संग केला आणि स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला, तरीही त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. परवाच्या शिवाजी पार्कवरील सभेत तर त्यांनी काँग्रेसच्या युवराजांना खूश करण्यासाठी, बाळासाहेबांच्या घोषवाक्यातला ’हिंदू’ शब्दच चक्क गाळून टाकला. ’हिंदुहृदयसम्राट’ आज हयात असते, तर सुपुत्राचा कसा उद्धार झाला असता, ते वेगळे सांगायला नकोच.परवाच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या समारोप सभेत महाराष्ट्रातील यजमान ठाकरे, पवार आणि प्रकाश आंबेडकर यांना केवळ पाच-पाच मिनिटे बोलण्याची संधी देऊन, अपमानित करण्यात आले. त्याबद्दल आंबेडकर यांनी व्यासपीठावरच ’इंडी’ आघाडीचे वाभाडे काढले, तर पवारांनी फारसे उत्साही भाषण केले नाही. अशावेळी उद्धव ठाकरेही निषेधाचा सूर आळवतील, अशी अपेक्षा होती. पण, त्यांनी लांगूलचालनाची एकही संधी सोडली नाही. भाषणाच्या सुरुवातीलाच ठाकरेंच्या पारंपरिक घोषवाक्यातील ’हिंदू’ शब्द गाळून, त्यांनी काँग्रेसच्या युवराजांना खूश केले. विरोधक कितीही टीका करीत असले, तरी आपल्या पक्षप्रमुखांनी हिंदुत्व सोडलेले नाही, अशी भाबडी आशा बाळगून असलेल्या, शिवसैनिकांचा त्यामुळे पुरता भ्रमनिरास झाला. काहींनी जाहीर नाराजीही व्यक्त केली. पण, त्यांचे ऐकणार कोण? या उलट काँग्रेसच्या युवराजांनी मतदारांचा बदललेला कल लक्षात घेऊन, प्रभू श्रीरामांची शिकवण अंगीकारण्याचे आवाहन शिवतीर्थावर केले. “महात्मा गांधी, भगवान गौतम बुद्ध आणि प्रभू श्रीराम यांनी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडा,” असे राहुल म्हणाले. आता त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, तरी उद्धव ठाकरे श्रीरामांची शिकवण अंगीकारतील, हीच अपेक्षा!
'गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी; म्हणायचा अन् मनाशीच की या जागेवर बांधीन माडी...’ ही बा. सी. मर्ढेकर यांची कविता महाविकास आघाडीतील घटकपक्षांना विशेषतः ठाकरे आणि शरद पवार गटाला तंतोतंत लागू पडणारी. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उठाव केल्यानंतर या दोघांच्याही पक्षाला ओहोटी लागली. जुन्या जाणत्या सहकार्यांनी एकेक करून साथ सोडली. पण, त्यातून त्यांनी शहाणपणाचा धडा घेतलेला दिसत नाही. उलट, ‘वंचित’सारख्या समविचारी पक्षाला डिवचण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या प्रकाश आंबेडकरांनी आपल्या खास शैलीत ठाकरे आणि पवारांना ’जागा’ दाखवून दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहीत आंबेडकर यांनी उबाठा आणि पवार गटाच्या कुरापतींचा पाढा वाचला. शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी महाविकास आघाडीच्या अनेक बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला. या असमान वागणुकीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे, असा जोरदार आक्षेप आंबेडकर यांनी नोंदवला. तसेच आघाडीचा हात पुढे करीत, काँग्रेसला राज्यातील सात जागांवर पाठिंबा देण्याची ऑफर दिली. वंचितसोबत जागावाटपाची बोलणी सुरू असताना, एकाएकी आलेल्या अशा पत्रामुळे काँग्रेसच्या पोटात मात्र मोठा गोळा आला. कारण, आंबेडकरांनी सात जागांवर पाठिंब्याची ऑफर देण्याचा अर्थ उर्वरित ४१ जागांवर ते स्वबळावर लढणार आहेत. गेल्या लोकसभेला वंचितने राज्यातील ४७ जागा लढविल्या होत्या. त्यांचा एकही खासदार निवडून आला नसला, तरी मत विभाजनामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला १७ ठिकाणी मोठा फटका बसला. २०१९च्या विधानसभेला वंचितने २८८ पैकी २३४ जागा लढवल्या. त्यात त्यांना दहा जागांवर दुसर्या क्रमांकाची मते मिळाली. अलीकडेच झालेल्या अकोला जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीतही त्यांनी सहा जागांवर विजय मिळवला. या आकडेवारीकडे डोळेझाक करून, वंचितला डावलणे विशेषतः काँग्रसला परवडणारे नाही. त्यामुळेच आंबेडकर यांच्या मनधरणीसाठी हायकमांडकडून दूत पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे कळते.