निर्यातवाढीचा ‘स्मार्ट’ वेग

    20-Mar-2024   
Total Views |
indian Export Growth

रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास संघर्ष आणि यातून निर्माण झालेले लाल समुद्रातील संकट. या सर्व कारणांमुळे जागतिक व्यापारावर दूरगामी परिणाम झाला. अशा परिस्थितीमध्ये भारताची वस्तू निर्यात वेगाने वाढत आहे. यामध्ये भारताच्या स्मार्टफोन निर्यातीचा सर्वाधिक वाटा. त्यानिमित्ताने भारताच्या निर्यातवाढीच्या ‘स्मार्ट’ वेगाचे केलेले हे आकलन...

स्वातंत्र्योत्तर काळापासून तत्कालीन भारतीय राज्यकर्त्यांच्या बोटचेप्या धोरणांमुळे हार्डवेअर क्षेत्रातील प्रमुख उत्पादक म्हणून जागतिक नेतृत्व करण्याची संधी आपण गमावली. फक्त सॉफ्टवेअर बनवण्याकडेच लक्ष दिले, अशी खंत ’इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी २०१५ साली एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली होती. त्यांच्या मते, भारताने वस्तू उत्पादनाकडे लक्ष न दिल्यामुळे, भारत या क्षेत्रात मागेच राहिला. पण, मागील दशकभरात या ऐतिहासिक चुकांच्या नुकसानाची भरपाई करण्यास मोदी सरकारने सुरुवात केली आहे. आतापर्यंत एक प्रमुख सेवा निर्यात करणारा देश म्हणून जागतिक पातळीवर भारताकडे पाहिले जात होते. त्यात भारताच्या आयटी क्षेत्राची मोठी पुण्याई. पण, आता भारत हा जागतिक पातळीवर एक प्रमुख वस्तू निर्यातक म्हणूनही समोर आला आहे.

रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास संघर्ष, जागतिक पातळीवर मागणीत नोंदवण्यात आलेली घट, यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात सध्या मंदीचे वातावरण. या मंदीचा फटका ’जगाचा कारखाना’ अशी ओळख असलेल्या चीनला सुद्धा बसला. पुढील काही महिने चीनच्या निर्यातवाढीचा वेगही मंदावणार असण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, भारताची निर्यात नवनवीन उच्चांक गाठत आहे. फेब्रुवारीमध्ये भारताच्या व्यापारी मालाच्या निर्यातवाढीचा वेग हा ११.९ टक्के इतका राहिला आहे. निर्यातवाढीचा हा वेग मागील २० महिन्यांतील सर्वाधिक आहे.भारताने फेब्रुवारी महिन्यात ४१.४ अब्ज डॉलर इतकी निर्यात केली. या काळात भारताने आपली सर्वाधिक निर्यात अमेरिकेला केली. भारताच्या एकूण निर्यातीच्या २२ टक्के निर्यात ही अमेरिकेला करण्यात आली. अमेरिकेला सर्वाधिक निर्यात करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये स्मार्टफोन पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेनंतर भारताने दुसर्‍या क्रमांकाची निर्यात संयुक्त अरब अमिरातीला केली. संयुक्त अरब अमिराती सोबत भारताच्या निर्यातवाढीचा वेग हा २३.१ टक्के इतका राहिला. संयुक्त अरब अमिरातीला केलेल्या निर्यातीमध्ये सुद्धा स्मार्टफोनने पहिल्या क्रमांक पटकावला आहे. भारताच्या स्मार्टफोन निर्यातवाढीचा वेग हा फेब्रुवारी महिन्यात ५४.८ टक्के इतका राहिला.

विशेषकरुन सॉफ्टवेअर निर्यातीसाठी ओळखल्या जाणार्‍या भारतासाठी स्मार्टफोन निर्यात ही तुलनेने तशी नवी बाजारपेठ. पण, तरीही आर्थिक वर्ष २०२३-२४च्या पहिल्या तिमाहीत भारताने ३.५३ अब्ज डॉलरचे स्मार्टफोन निर्यात केले. यांची तुलना २०२२-२३ या आर्थिक वर्षाशी केल्यास, ही वाढ तब्बल २५३.७ टक्के इतकी प्रचंड होती. २०२३-२४च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीमध्ये अमेरिकेच्या स्मार्टफोन बाजारपेठेत भारताचा वाटा ७.७६ टक्के इतका होता. याचं कालावधीत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये हा वाटा फक्त दोन टक्के इतका होता. यावरून आपल्या लक्षात येईल की, भारताची स्मार्टफोन निर्यात किती झपाट्याने वाढत आहे, याचा अंदाज येईल. या स्मार्टफोन उत्पादनाचे आणि निर्यातवाढीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील ’रालोआ’ सरकारला द्यावेच लागेल.

 केंद्र सरकारने ’प्रोडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह’ (पीएलए)च्या माध्यमातून जगभरातील स्मार्टफोन उत्पादकांना ’मेड इन इंडिया’ आणि ’मेक इन इंडिया’अंतर्गत देशात उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले. या सरकारी योजनांचा फायदा घेऊन, ‘अ‍ॅपल’सारख्या जगप्रसिद्ध अमेरिकन स्मार्टफोन उत्पादक कंपनीने सुद्धा चीनमधून आपले उत्पादन भारतात स्थानांतरित करण्यास सुरुवात केली.इलेक्ट्रॉनिक्स वस्तूनंतर प्रामुख्याने मांस, दुग्ध आणि पोल्ट्री (३७.८ टक्के), रसायने (३३ टक्के), औषधे आणि फार्मास्युटिकल्स (२२.२ टक्के) आणि अभियांत्रिकी वस्तू (१५.९ टक्के) इत्यादी उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे.भारतीय निर्यातीच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडली आहे, ती म्हणजे दक्षिण आफ्रिकेसोबत भारताची दुपटीने वाढलेली निर्यात. निर्यातीत झालेल्या या अभूतपूर्व वाढीमुळे दक्षिण आफ्रिका भारताच्या निर्यात यादीत दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. मागच्या वर्षी याचं कालावधीत दक्षिण आफ्रिका १६व्या क्रमांकावर होता. भारत दक्षिण आफ्रिकेला प्रामुख्याने पेट्रोलियम पदार्थांची निर्यात करत आहे.दक्षिण आफ्रिकेबरोबरच फेब्रुवारीमधील इतर प्रमुख निर्यात स्थळांमध्ये सौदी अरेबिया (५० टक्के), नेदरलॅण्ड (२६.७ टक्के), ब्रिटन (३१.९ टक्के), बांगलादेश (१८.१ टक्के) आणि चीन (१३.३ टक्के) निर्यातीत वाढ झाली. या प्रमुख देशांसोबत झालेल्या निर्यातवाढीने, भारताच्या एकूण निर्यातवाढीच्या वेगाने दुहेरी आकडा गाठला आहे.

 भारताच्या निर्यातवाढीच्या वेगाने नवा उच्चांक गाठला असला, तरी व्यापारी वस्तूंची आयातसुद्धा फेब्रुवारीमध्ये १२.२ टक्क्यांनी वाढून, १७ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. भारताने फेब्रुवारी महिन्यात ६०.१ अब्ज डॉलरची आयात केली. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये भारताची व्यापारी तूट ही १८.७ इतकी राहिली. पण, भारतासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे, भारताची सेवा निर्यात फेब्रुवारीमध्ये १७.३ टक्क्यांनी वाढून ३२.१५ अब्ज झाली, तर सेवा आयात २.८ टक्क्यांनी वाढून १५.४ अब्ज झाली. परिणामी, भारताचा सेवा व्यापार १६.७६ अब्जने अधिक झाला. भारताने आपल्या धोरणात सुधारणा आणि सातत्य ठेवल्यास भविष्यात भारत वस्तू व्यापारात सुद्धा आपली व्यापारी तूट नक्कीच कमी करू शकेल.


श्रेयश खरात

वाणिज्य शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC), अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यासक. इतिहास, अर्थकारण, राजकारण आणि क्रिकेट इत्यादी विषयांची आवड.