वन रक्षणाय, खल निग्रहणाय!

    20-Mar-2024   
Total Views |
Madan Kshirsagar
 
वन आणि वन्यजीवांच्या संरक्षण-संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेले आणि सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेत, चोख भूमिका निभावणार्‍या वनअधिकारी मदन क्षीरसागर यांच्याविषयी...

जवळजवळ गेली दहा वर्षं वनसेवेमध्ये कार्यरत असणार्‍या, वनांचे आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी झटणार्‍या, तसेच अनेक कारवाया करत, गुन्हेगारांना गजाआड करणारे वन विभागाचे धडाडीचे अधिकारी म्हणजे मदन क्षीरसागर. प्रामाणिक आणि करारी स्वभाव असलेल्या मदन यांचा जन्म सोलापुरातील मंगळवेढा गावातला. मंगळवेढ्यातील शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर सोलापुरातील ज्ञान प्रबोधिनी शाळेत त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. पुन्हा मंगळवेढ्यात येऊन मदन यांनी आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अभ्यासाच्या गोडीबरोबरच खेळातही ते आघाडीवर. २००९ साली ’बीएससी‘ (अ‍ॅग्री)ला प्रवेश घेऊन पदवी मिळवली त्यानंतर, २०१३ मध्ये त्यांनी ‘एमएससी’ (अ‍ॅग्रोनॉमी) पदवी प्रप्त केली. व्यायाम, खेळ, एनसीसी अशा सर्वच क्षेत्रांमध्ये पुढे असलेल्या मदन यांनी पदव्युत्तर शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. ’एमपीएससी’ परीक्षेत यश मिळवत, २०१६ मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतरही ’पीएसआय’ आणि ’एसटीआय’च्या परीक्षांमध्ये त्यांची निवड झाली होती.

निसर्ग संरक्षणाचे संस्कार मदन यांच्या आईमुळे त्यांच्या बालमनावर कोरले गेले. त्यामुळे वनसेवेतच रुजू होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मदन यांच्या आईला नवनवीन झाडांची रोपे लावायला, त्यांची देखभाल करायची खूप आवड होती. लहानपणापासून आईचं निसर्गावर असलेलं, हे प्रेम मदन यांच्या मनात दिवसेंदिवस कुतूहल निर्माण करत होतं आणि पुढे याच कुतूहलाचं रुपांतर त्यांच्या करिअरमध्येही झालं.२०१६ ते २०१८ या कालावधीत वन विभागाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, जानेवारी-२०१८ मध्ये सांगली वन विभागांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी, तासगाव सामाजिक वनीकरण म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्यावेळी ५० कोटी वृक्षलागवडीचा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू होता. या प्रकल्पामध्ये सामाजिक वनीकरणअंतर्गत त्यांनी जवळपास पाच लाख सुदृढ रोपांची लागवड करत, ती रोपे रस्ता दुतर्फा तसेच गायरान लागवडीसाठी वापरण्यात आली होती. तासगाव सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र अधिकारी याबरोबर मदन यांच्याकडे शिराळा प्रादेशिक तसेच काही कालावधीकरिता कडेगावचा प्रादेशिकचा देखील अतिरिक्त कार्यभार होता.

अतिरिक्त कार्यभाराच्या जबाबदार्‍या समर्थपणे सांभाळत, या कालावधीमध्येही त्यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. तसेच सांगलीतील ’कुंडल वन अकादमी’मध्ये ‘क्युरेटर’चा अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला. कडेगावमध्ये कृष्णेच्या खोर्‍यात मगरींची समस्या प्रामुख्याने भेडसावत होती. मदन यांनी या कालावधीत अनेक मगरींचे बचावकार्य पार पाडले असून, हा संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच शिराळ्यामध्ये नागपंचमीची मोठी परंपरा असलेले; पण वन्यजीवांना धोका पोहोचू शकतो, अशा सणाचे योग्य आणि शिस्तबद्ध नियोजन आखले. कोणताही अनुचित प्रसंग किंवा गैरप्रकार घडू न देता, हा बंदोबस्त त्यांनी योग्य प्रकारे पार पडला. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या पहिल्या श्रेणीमध्ये येणारे नाग, धामण या वन्यजीवांच्या गैरवापरावर आळा घालत, तसेच तेथील सामाजिक-सांस्कृतिक परिस्थिती सांभाळत, त्यांनी हे नियोजन केले.ऑगस्ट २०२१ मध्ये मदन यांची कोकणातील सावंतवाडी येथे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्याबरोबरच एका वर्षासाठी दोडामार्गतील अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे होता. दोडामार्ग तालुक्यातील हत्ती-मानव संघर्ष निवारण्यासाठी, त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. सर्पमित्राने पाळलेल्या किंग कोब्राचा बचाव, बिबट्याची तस्करी करणार्‍या, गव्यांना मारणार्‍या, खवले मांजराची शिकार आणि तस्करी करणार्‍या अशा वन्यजीवांचे नुकसान करणार्‍या अनेक गुन्हेगारांना त्यांनी गजाआड केले.

लहानपणापासूनच हुशार, खेळात प्रावीण्य मिळवलेल्या मदन यांना बॅडमिंटनची विशेष आवड. तसेच त्यांनी वेटलिफ्टिंगच्या अमृतसर येथे झालेल्या, राष्ट्रीय स्पर्धांमध्येही सहभाग घेतला आहे.”आपल्या पूर्वजांनी जसा निसर्ग जपला, पर्यावरणाचे रक्षण केले, तसेच आताच्या पिढीनेही करणे गरजेचे आहे,” असा संदेश ते तरूण पिढीला देतात. पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिकाधिक समृद्ध व्हायला हवी आणि तरुणांनी यात सहभागी व्हायला हवे, असे आवाहनही ते करतात. नुकतेच सावंतवाडीतील नरेंद्र वनउद्यानाला वन पर्यटन सुरू करण्यात आले असून, निसर्ग माहिती केंद्र आणि पर्यटकांसाठी जीपची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या माध्यमातून शाश्वत पर्यटनाबरोबरच स्थानिकांना रोजगारदेखील उपलब्ध होणार आहे.नियोजनबद्ध आणि धडाडीने काम करणार्‍या, वन्य गुन्हेगारीला आळा घालण्याचे महत्त्वपूर्ण काम करणार्‍या, खर्‍या अर्थाने ‘वन रक्षणाय, खल निग्रहणाय!’चे ब्रीद जपत वनांच्या आणि वन्यजीवांच्या सेवेचा, संरक्षणाचा ध्यास घेतलेल्या मदन क्षीरसागर यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!



समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.