पुराणांमधील श्रीराम दर्शन

    02-Mar-2024
Total Views |
shri ram in puranas


पुराण वाङ्मय हा विविध प्रकारच्या माहितीचा खजिना असून, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आहे. कोणताही विषय पुराणांना वर्ज्य नाही. नव्या परिभाषेत सांगायचे, तर पुराणे ‘भारतीय इन्सायक्लोपीडिया’च आहेत. ‘पाचवा वेद’ म्हणून पुराणांचा गौरव केला जातो. अशा पुराणांमध्येही अनेक स्थळी ‘रामकथा’ आढळते. घरोघर म्हटले जाणारे रामोपासनेतील अविभाज्य असे ‘श्रीरामरक्षा स्तोत्र’ ही पुराणाचीच अक्षर मंगल देणगी आहे.

भारतीय साहित्यामध्ये ‘वेद’, ‘उपनिषदे’, ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘गीता’ याप्रमाणेच पुराण वाङ्मयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुराणे अनेक आहेतच; पण प्रमुख पुराणे १८ मानली जातात. काही अभ्यासक पुराणांना ‘भाकडकथा’ म्हणून त्यांची उपेक्षा करतात; पण भारतीय संस्कृती, परंपरा, दार्शनिक विचार-चिंतन, भाषाशैली, देवमहिमा, राजवंश घराण्याची माहिती, विविध धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्र अशा विविध प्रकारच्या माहितीचा खजिना म्हणून पुराण वाङ्मयास ऐतिहासिक महत्त्व आहे. पुराणांचा काळ वेगवेगळा आहे; पण काही पुराणे ही वेदांइतकी प्राचीन आहेत. बृहदअरण्यक-छांदोग्य या उपनिषदांनी तर पुराणांना ‘पाचवा वेद’ असे मानाचे स्थान देऊन, त्याचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. पुराणांमधील एकूण विषयांची व्याप्ती पाहता, सृष्टी आरंभापासून ते प्रलयापर्यंत सारे विषय पुराणात आहेत. कोणताही विषय पुराणांना वर्ज्य नाही. पुराणांवर मोठमोठे संशोधन प्रकल्प-शोधनिबंध लिहिले जात आहेत. पुराणांमधील ‘रामकथा’ अनेक अभ्यासकांसाठी कुतूहलाचा विषय आहे.

पुराण वाङ्मयामध्ये १) ब्रह्मपुराण २) पद्मपुराण ३) विष्णूपुराण ४) वायुपुराण-शिवपुराण ५) भागवतपुराण (देवीपुराण) ६) नारदपुराण ७) मार्कंडेयपुराण ८) अग्नीपुराण ९) भविष्यपुराण १०) ब्रह्मवैवर्तपुराण ११) लिंगपुराण १२) वराहपुराण १३) स्कंदपुराण १४) वामनपुराण १५) कूर्मपुराण १६) मत्स्यपुराण १७) गरूडपुराण १८) ब्रह्मांडपुराण ही प्रमुख १८ पुराणे आहेत. शिवपुराणांतर्गत ‘रेवा माहात्म्य’नुसार, या सर्व १८ पुराणांचे महर्षी व्यास हेच रचनाकार-कर्ते आहेत. ‘सूर्य’, ‘शिव’(रुद्र), आणि ‘विष्णू’ या पुराणांतील तीन प्रमुख देवता आहेत. या पुराणांपैकी ब्रह्मपुराणास ‘आदिपुराण’ मानले जाते. स्कंदपुराणात ८१ हजार एवढी प्रचंड श्लोक संख्या असून, ते सर्वात मोठे पुराण आहे. या १८ पुराणांपैकी ‘पद्मपुराण’,‘विष्णूपुराण’, ‘वायुपुराण’, ‘भागवतपुराण’, ‘कूर्मपुराण’, ‘वराहपुराण’,‘अग्नीपुराण’ आणि ‘लिंगपुराण’ या आठ पुराणांमध्ये रामकथा आढळते. काही पुराणात रामकथा अत्यंत संक्षेपात आहे. काही ठिकाणी रामायणातील एक-दोन प्रसंगांचाच फक्त उल्लेख आहे, तर काही पुराणात सविस्तर रामकथा वर्णिलेली आहे.

‘रामरक्षा स्तोत्र’ पुराणांची देणगी

पुराणामधील राम उल्लेख व रामकथेचा संदर्भ पाहता, हे लक्षात येते की, ‘वाल्मिकी रामायण’ आणि ‘महाभारता’मध्ये जो राम मनुष्य, राजा म्हणून वर्णित आहे, तो पुराणांमध्ये देव, विष्णूंचा अवतार अशा परब्रह्म रुपात पूजनीय-आराध्य म्हणून वर्णिलेला आहे. थोडक्यात, ‘वाल्मिकी रामायणा’तील ‘राम’ पुराणांमध्ये ‘भगवान श्रीराम’ झालेला दिसतो. पुराण वाङ्मयांनी रामाला देव म्हणून महिमामंडित केलेले आहे. राम आणि रामनाम यांना उपासनेचे साधन-माध्यम म्हणून भक्तिमंदिरात त्यांची प्रतिष्ठापना केली आहे.

नव्या कथा, प्रसंगांची भर

पद्मपुराण हे १८ पुराणांतील आणखी एक महत्त्वाचे पुराण आहे. त्यामध्ये ५५ हजार इतके श्लोक आहेत. या पुराणामध्ये रामकथा अधिक विस्तारने वर्णिलेली आहे. सीतेच्या विषयी संशय व्यक्त करणार्‍या धोब्याची कथा या पुराणातील आहे, ती मूळ वाल्मिकी रामायणात नाही. तसेच ‘विष्णूंना वृंदेचा शाप’ ही वृंदा शाप कथाही याच पुराणातील आहे. ‘तुझ्यामुळे मला पतीवियोग सोसावा लागला आहे, तर तुला माझ्या शापाने मनुष्य जन्म घ्यावा लागेल आणि त्या जन्मात पत्नीविरह भोगावा लागेल,’ असा वृंदा विष्णू देवाला शाप देते व त्यामुळे विष्णूचा रामरुपात मनुष्य म्हणून जन्म होतो व त्याला सीता विरह-त्याग सोसावा लागतो. ही कथाही मूळ वाल्मिकी रामायणात नाही, उत्तररामायणातील आहे. शंबूकवधाची रामावर आक्षेप घेणारी कथासुद्धा याच पुराणात आहे की, जी मूळ रामायणात नाही. यावरून आपणास एक लक्षात येते की, मूळ वाल्मिकी रामायणात नसलेल्या अनेक नव्या कथांची भर पुराणांमधील रामकथांमध्ये आहे.

गौतमऋषी पत्नी अहिल्येच्या मूळ रामायणातील कथेत पुराणांनी अतर्क्य बदल केला आहे. मूळ रामायणात गौतमांच्या क्रोधाने दूर झालेली अहिल्या तपाचरणात लीन राहते. शापकाळ संपताना राम-लक्ष्मण विश्वामित्रांसह त्या आश्रमस्थळी येतात. तेव्हा तपाचरणी अहिल्येच्या चरणांना हात लावून राम-लक्ष्मण वंदन करतात व गौतम ऋषी अहिल्येचा स्वीकार करतात, अशी स्वाभाविक कथा आहे. पद्मपुराणामध्ये राम मनुष्य नाही, देवावतार आहे. म्हणून राम अहिल्येच्या पायाला वंदन न करता, शीलास्वरूप अहिल्येला पायाचा स्पर्श करून तिचा उद्धार करतो. अहिल्येची दगडाची शीळा होणे, रामाने पाय लावणे आणि दगडातून अहिल्या जीवंत होणे, ही सारी अतर्क्य-अद्भुत चमत्कारयुक्त कल्पना पुराणातील आहेत. या पुराणात राम जसा विष्णूचा अवतार आहे, तशी सीता लक्ष्मीचा अवतार, लक्ष्मण शेषाचा अवतार, भरत सुदर्शन चक्राचा, तर शत्रुघ्न पांचजन्य शंखाचा अवतार म्हणून वर्णन आहे.

विष्णूपुराण, वायूपुराण, अग्नीपुराण, विष्णूधर्मोत्तरपुराण, देवीभागवतपुराण, ब्रह्मवैवर्तपुराण या पुराणांमध्ये रामकथेचे कमी अधिक उल्लेख आहेत. देवीपुराणामध्ये राम-रावणयुद्धापूर्वी राम देवीची पूजा-उपासना करतो, नवरात्र उपवास करतो. त्यानंतर देवी प्रसन्न होऊन, त्याला रावण वधाची शक्ती वरदान देते, असा देवी माहात्म्यपर भाग रामकथेमध्ये घातलेला आहे. थोडक्यात, पुराणांनी कैक नवीन कथा मूळ रामायणात घुसडून, रामाचे देवत्त्व विविध चमत्कारांनी झळझळीत केले आहे. देव म्हणजे सर्व शक्तिमान, त्याला अशक्य काहीच नाही, असा भाविकांचा भाबडा भोळा भाव-श्रद्धा यातून हे स्वाभाविकपणे घडलेले आहे. मात्र, पुराणांमध्ये आलेली रामाची स्तोत्रे, स्तुती या अत्यंत काव्यमय, मंत्रमय आहेत, ती स्तोत्रे पुराणांचे वरदान आहे. ॥श्रीराम ॥

विद्याधर ताठे

(पुढील अंकात ः अध्यात्म रामायण)