शेकरूमुळे भविष्याची चिंता!

    02-Mar-2024
Total Views |
 Indian giant squirrel

कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, तो हिरवाईने नटलेला सुंदर निसर्ग. कोकणाची खरी ओळख म्हणजे आंबा, काजू, फणसाच्या बागा आणि सोबत पावसाळी भात शेती. निसर्गाची मुक्त हस्ते उधळण असल्यामुळे, वन्यजीवांचे कोकण हे नंदनवनच! कोकणातील विशिष्ट भौगोलिक परिस्थितीतमुळे मानवी जीवन आणि वन्यजीवांचा कायमचा संबंध जोडला गेलेला आहे. कोकणात स्थानिक शेतकरी शेती करत असताना, वन्यप्राण्यांना गृहीत धरूनच शेती करतो. अगदी त्यांच्यापासून होणार्‍या फायद्यापासून ते नुकसानीपर्यंतचे गणित सांभाळून शेती केली जाते.
 
आंबा-काजू-नारळ-फोफळी-जांभूळ या हंगामी कोकणी मेव्याच्या पिकांसह पावसाळी भातशेती हे कोकणातील प्रमुख पीक आहे. सोबतच नाचणी, कुळीथ, उडीद, चवळी, वाल, मका यांसारखी उन्हाळी पिकेदेखील या ठिकाणी घेतली जातात. कोकणात वन्यजीवांकडून होणार्‍या शेती नुकसानीबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो, तेव्हा हत्ती, रानडुक्कर, वानरांसोबतच आता अनपेक्षितपणे राज्याचा ’राज्यप्राणी’ शेकरूचा देखील या यादीत समावेश झालेला दिसतो.मोर, रानडुक्कर आणि शेकरू यांच्या वर्तनाचा आणि अधिवासाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा हे तिन्ही प्राणी झाडी-झुडपात, घनदाट जंगलात मानवापासून लपून राहणे पसंत करतात. रानडुक्करांकडून बर्‍याच वेळा रात्री उशिरा भातशेती, भुईमूग, सुरण, काटेकणगे यांसारखी पिके फस्त केली जातात. साहजिकच पिकांच्या नुकसानीत रानडुक्करांचा पहिला क्रमांक लागतो. मोर हा अतिशय बुजरा पक्षी. तो झाडी झुडपात, जंगलात राहतो. मात्र, बदलत्या काळात हा शेती किंवा बागबागायतीच्या आजूबाजूलाच असणार्‍या झाडी झुडपात राहणे पसंत करतो.

जमिनीवरचे किडे, छोटे बेडूक, जंगलातील फळे हे त्याचे मुख्य खाद्य असले, तरी भात शेती, नाचणी आणि चवळीवर देखील यथेच्छ ताव मारतो. शेकरू हे शेती नुकसानीत घेतले जाणारे अनपेक्षित असेच नाव आहे. घनदाट जंगलात खास करून सह्याद्रीच्या वनराईत, तिलारी खोर्‍यात दिसणारा आणि झाडावरच राहून प्रमुख अन्न म्हणून तिथल्याच वन्य फळांवर ताव मारणारा, हा आपला ’राज्यप्राणी’ आज थेट तळकोकणात माड, काजू बागायतींवर अक्षरशः धूमशान घालताना दिसतो आहे. शेकरू हे झाडावरचे नारळ पोखरून खात असल्यामुळे, शेतकर्‍यांचा जीव या नव्याने आलेल्या संकटामुळे हवालदिल झाला आहे.शेकरूसोबत सुरू असलेला संघर्षाचे निवारण करण्यासाठी, शेतकर्‍यांकडून अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात. बर्‍याच वेळा छर्‍याच्या बंदुकीचा वापर करून फणस किंवा आंबा-काजू खाणार्‍या शेकरूंना हुसकावले जाते. काही वेळा त्रासाला कंटाळून, शेतकरी चोरट्या पद्धतीने शेकरूंची शिकारही करतात. काही वेळा त्याचे मांस खातात. हा प्राणी नारळाचे मोठ्या प्रमाणात नुकसानकरतो. त्यामुळे शेतकर्‍यांकडून नारळाच्या झाडाच्या बुंध्यात थायमाईट पावडरची पुडी बांधून ठेवली जाते.
 
मात्र, हा उपायदेखील कूचकामी ठरतो. त्यामुळे भविष्यात शेकरूच्या व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेण्यासंदर्भात विचार करणे आवश्यक झाले आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचे शेकरूच्या नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन आणि त्यांच्या नैसर्गिक खाद्य झाडांची लागवड यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पूर्वजांनी राखलेल्या जमिनी न विकणे, हा एक मुख्य उपाय आवर्जून अमलात आणणे गरजेचे आहे. तसेच वन्य जीवांकडून होणार्‍या नुकसानीची पाहणी आणि नुकसान भरपाई यांची अंमलबजावणी तातडीने होणे गरजेचे आहे. यावर उपाययोजना करत असताना शासन आणिवनखात्याने स्थानिकांना विश्वासात आणि सोबत घेऊन कार्य करणे गरजेचे आहे; कारण निसर्ग आणि शेती यांचे संवर्धन करण्याचे महत्त्वाचे कार्य पूर्वापार याच स्थानिक शेतकर्‍यांकडूनच केले जात आहे.

नितीन गोलतकर
वन्यजीव निरीक्षक वेंगुर्ला