भारतीय राज्यघटनेचे भाष्यकार, थोर मानवतावादी आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या सद्सद्विवेकबुद्धीचा संरक्षक अशा फली नरिमन यांचे नवी दिल्ली येथे नुकतेच वयाच्या ९५व्या वर्षी दुःखद निधन झाले. न्यायालयीन निकालाच्या प्रक्रियेत मैलाचे दगड ठरावेत, अशा प्रकरणात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. आपल्या नैतिक अधिकाराने त्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेला योग्य ते वळण दिले, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. त्यांना अतिशय सफल आणि समृद्ध असे दीर्घायुष्य लाभले. म्हणूनच त्यांना झोपेतच शांतपणे मृत्यू यावा, हा काव्यगत न्यायच म्हणावा लागेल.
भारताच्या प्रगतीत पारशी समाजाचा महत्त्वाचा व मोठा वाटा. विशेषतः उद्योग, व्यापार व न्यायव्यवस्था या क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षणीय म्हणावे लागेल. न्यायव्यवस्थेत नानी पालखीवाला, होमी भाभा, होमी सीरबाई, सर जमशेटजी कांगा, सोली सोराबजी, ए. डी. श्रोफे, सी. के. दफ्तरी या थोर परंपरेतील महत्त्वाचे आणि ठसठशीत नाव म्हणजे फली नरिमन!केंद्र व राज्य सरकारे किंवा सर्वोच्च न्यायालय यांनी त्यांच्या मर्यादा ओलांडणारे निर्णय घेतले आहेत, असे जेव्हा-जेव्हा अभ्यासाअंती वाटले, तेव्हा-तेव्हा त्या विरोधात नरिमन यांनी निर्भयपणे आवाज उठविलेला दिसतो. इतके ते तत्त्वनिष्ठ होते. म्हणूनच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दि. २६ जून १९७५ रोजी आणीबाणी लादली तेव्हा कोणतीही वाट न पाहता, आपल्या ‘अॅडिशनल सॉलिसिटर जनरल’ पदाचा त्यांनी राजीनामा दिला. म्हणूनच त्यांचा उल्लेख ‘सद्सद्विवेकबुद्धीचा संरक्षक’ अशा यथार्थ शब्दांत करण्यात येतो.फली नरिमन यांचा जन्म तत्कालीन ब्रह्मदेशातील रंगून शहरात दि. १० जानेवारी १९२९ रोजी झाला. बरियमजी नरिमन आणि बानू नरीमन हे त्यांचे माता-पिता. मात्र, व्यावसायिक अडचणींमुळे नरिमन कुटुंबाला ब्रह्मदेश सोडावा लागला. फली यांचे प्राथमिक शिक्षण शिमला येथे, तर माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले.
सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर, त्यांनी शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याचा अभ्यास पूर्ण केला. त्यांनी ‘ICS‘ करावे व प्रशासनात जावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण, तेथपर्यंत पोहोचण्याची आपली क्षमता नाही, हे फलींना लक्षात आल्यामुळे, त्यांनी १९५० साली मुंबईतच वकिली करण्याचा निर्णय घेतला. जमशेटजी बेहरामजी कांगा यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी वकिलीस सुरुवात केली. आपली बुद्धिमत्ता व अभ्यासू वृत्ती यामुळे ते लवकरच आघाडीचे वकील बनले. जवळजवळ २२ वर्षे मुंबई उच्च न्यायालयात वकिली केल्यानंतर, १९७१ साली ते नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले. भक्कम पूर्वानुभव आणि युक्तिवादातील कौशल्य, यामुळे लवकरच ज्येष्ठ वकिलांच्या श्रेणीला त्यांची गणना होऊ लागली. पुढे तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘असिस्टंट सॉलिसिटर’ जनरल म्हणून त्यांची नियुक्ती केली. १९७५ साली लादलेल्या आणीबाणीचा निषेध म्हणून त्यांनी आपल्या पदाचा त्याग केला. देशाच्या राज्यघटनेला पायदळी तुडविणारा, तो निर्णय होता. म्हणून फलींनी हे स्वाभिमानी पाऊल उचलले होते. त्यानंतर कोणतेही सरकारी पद कोणत्याही सरकारमध्ये स्वीकारायचे नाही, असा कठोर निर्णय त्यांनी घेतला. अगदी चालून आलेले सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचे पदही त्यांनी ठामपणे नाकारले.
१९७१ पासून व्यवसायातून स्वेच्छानिवृत्तीपर्यंतच्या ५० वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक खटल्यांचे वकीलपत्र घेतलेले दिसते. त्यातील काही खटले तर घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे होते व राष्ट्राचे भवितव्य ठरविणारे होते. अशा खटल्यांत नेतृत्व करून, त्यांनी राज्यघटनेचे पावित्र्य जपण्याचा व राष्ट्रहित साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ‘नॅशनल ज्युडिशियल अपॉईंटमेंट कमिशन’ (NJAC) गोरखनाथ खटला, टी. एम. पै. फाऊंडेशन खटला, जयललिता भ्रष्टाचार खटला, युनियन कार्बाईड नुकसान भरपाई खटला, कोवरी पाणीवाटप खटला यांसारख्या अनेक घटनात्मक व राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या खटल्यांत त्यांनी आपले बुद्धीकौशल्य पणाला लावले. न्यायदानाच्या व्यवस्थेला यानिमित्ताने योग्य ते वळण लावण्याचे व घटनेचे पावित्र्य जपण्याचे कार्य त्यांनी या काळात केले. भोपाळ येथील युनियन कार्बाईड वायुगळती प्रकारात हजारो कामगारांना आपले जीव गमवावे लागले होते. या संदर्भातील नुकसान भरपाईच्या खटल्यात फली हे युनियन कार्बाईडच्या बाजूने लढले. पुढे या प्रकरणात आपण चुकीच्या पक्षाची बाजू घेतल्याचे, त्यांनी प्रांजळपणे मान्यही केले, हे त्यांचे मोठेपण!न्यायालयाचे स्वातंत्र्य, राज्यघटनेचे पावित्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, सेक्युलॅरिझम हे फली यांच्या आस्थेचे व तत्त्वाचे विषय होते. त्यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही. कायदा, न्याय व्यवस्था यांचे संरक्षक अशीच त्यांनी नेहमी ठाम व आक्रमक भूमिका घेतली. याच कालखंडात ’इंटरनॅशनल कमिशन ऑफ ज्युरिस्टस’ या संस्थेचे ते अनेक वर्षे सदस्य होते.
१९९५ ते १९९७ या काळात त्यांनी या संस्थेचे अध्यक्षपदही भूषविले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय खटल्यात न्यायाची बाजू उचलून धरलेली दिसते.त्यांना आपल्या आयुष्यात अनेक मानसन्मान प्राप्त झाले. भारत सरकारने राज्यसभेचे सदस्यत्व तसेच ’पद्मविभूषण’ ही सन्मानाची पदवी देऊन फली यांच्या विद्वत्तेचा सन्मान केला. झुंजार वृत्तीने आपल्या व्यवसायात तत्त्वाशी तडजोड न करता, फली नरिमन यांनी उदंड यश मिळविले. आपल्या उपजत विनोदबुद्धीने व बुद्धी कौशल्याने त्यांनी आपले व्यावसायिक जीवन यशस्वी व समृद्ध केले.त्यांनी स्वतः जरी न्यायव्यस्थेतील पद नाकारले असले, तरी त्यांचे सुपुत्र रोहिंटन नरिमन हे सर्वोच्च न्यायालयातून न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झाले. वेगळ्या अर्थाने मुलाने आपल्या पित्याचा वारसा पुढे चालविला. फली नरिमन यांची पत्नी बाप्सी नरिमन या ’किचन क्वीन’ म्हणून ओळखल्या जात. त्यांनी स्वयंपाकशास्त्र (कुकरी) या विषयात अनेक पुस्तके लिहिली आहेत. २०२० साली त्यांचे निधन झाले आणि आता फली यांनी आपल्या कृतार्थ जीवनाचा शांतपणे निरोप घेतला आहे.
या लेखाच्या शेवटच्या टप्प्यात फली नरिमन यांनी ज्ञानाच्या क्षेत्रात जी भरीव कामगिरी केली, तिची दखल आपण घेणार आहोत. आपले ज्ञान, अनुभव कुशाग्र व तरलस्पर्शी बुद्धिमत्ता यांचे प्रतिबिंब त्यांनी लिहिलेल्या सहा ग्रंथांत व असंख्य लेखांत उमटलेले दिसते. यातील तीन ग्रंथ मैलाचा दगड आहेत. १) You must know your Constitution २) Before Memory Fades ३) The State of Nation - in the context of Indian Constitution. याच कालखंडात देशात भारतीय राज्यघटनेच्या मूलाधाराला धक्का लागल्याचे प्रसंग जेव्हा-जेव्हा घडले, तेव्हा-तेव्हा त्याविरोधात स्पष्ट व रोखठोक मतप्रदर्शन करणारे असंख्य लेख त्यांनी लिहिले आहेत. ते जेव्हा ग्रंथबद्ध होतील, तेव्हा ज्ञानाच्या क्षेत्रात मोलाची भर पडलेली असेल. (त्यांच्या ’The state of Nation’ या अत्यंत अभ्यासपूर्ण ग्रंथाचे मी केलेले सविस्तर परीक्षण दि. १ एप्रिल २०१८च्या दै. ’मुंबई तरूण भारत’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.) फली नरिमन यांच्या निधनाने भारतीय राज्यघटनेच्या न्यायव्यवस्थेच्या सद्सद्विवेकबुद्धीचा संरक्षक आणि मानवतावादी लेखक व विचारवंत आपल्यातून गेला आहे. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली!
-डॉ.श्याम अत्रे