“...तर आम्ही भाजपसोबत जाणार”; प्रकाश आंबेडकरांचं सुचक विधान

    02-Mar-2024
Total Views |

Prakash Ambedkar


मुंबई :
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत गेली असली तरी त्यांच्यात काही आलबेल असल्याचे दिसत नाही. वंचित बहुजन आघाडीकडून सतत मविआवर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत. दरम्यान, आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट भाजपमध्ये जाण्याचा सूचक इशारा दिला आहे. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
 
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "आम्ही सुधारणांवर विश्वास ठेवतो. आमचा राजकीय अजेंडा नाही. सामाजिक सुधारणा करता करता सत्ता मिळाली तर आम्ही निश्चितपणे घेणार आहोत. आताची सुधारणेची जी गरज आहे, ती म्हणजे जातीवर आधारित असलेले पुरोहित आहेत. यामध्ये समाजात समता आणि अधिकार आणावे लागेल. जातीवर आधारित पुरोहितशाही पुर्णपणे कायद्याने बंद व्हायला हवी. यासाठी हिंदु स्कुल ऑफ थिओलॉजी उभं करावं लागेल. त्यातून जो पुरोहित बाहेर पडेल त्याच्यामार्फतच देशात धार्मिक विधी केले जावेत. भाजप अशा प्रकारचा कायदा आणि सुधारणा करायला तयार असेल तर आम्ही त्यांच्यासोबत जाणाच्या विचार करु शकतो," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडीची बैठक सुरु असताना आम्ही बाहेर बसलेलो असतो. आम्ही आमची यादी त्यांना दिलेली आहे. त्यांनी ठरवून आम्हाला कळवावं अशी परिस्थिती सध्या आहे. महाविकास आघाडीच्या ज्या काही बैठका झाल्यात त्यामध्ये फक्त तीन पक्ष बसतात. त्यांचं बोलणं झाल्यानंतर ते आम्हाला बोलवतात. आम्ही वंचित आणि उपरे आहोत. त्यामुळे बैठकांमध्येही आम्ही उपरेच आहोत,” असे म्हणत त्यांनी खेद व्यक्त केला.