नवी दिल्ली : केरळमधील सर्वात मोठ्या विद्यापीठात युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला ‘इंतिफादा’ असे नाव देण्यात आले आहे. केरळ विद्यापीठात दि.७ मार्च ते दि.११ मार्च या कालावधीत होणारा युवा महोत्सव 'आक्रमकतेच्या विरोधात कलेचा निषेध' या टॅगलाइनसह आयोजित केला जात आहे. ज्याचा थेट अर्थ इस्रायल-हमास युद्धात हमासला पाठिंबा आहे. आता या 'इंतिफादा' विरोधात एका विद्यार्थ्याने केरळ आणि लक्षद्वीप हायकोर्टात याचिका दाखल करून नाव बदलण्याची मागणी केली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केरळ विद्यापीठाच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत त्याने कोर्टाला नाव बदलण्याचा आदेश जारी करण्याची विनंती केली आहे, कारण 'इंतिफादा' हा केवळ गोंधळात टाकणारा शब्द नाही. सध्याच्या इस्रायल-हमास युद्धाच्या दृष्टीने हा एक फूट पाडणारा शब्द आहे.
'इंतिफादा' हा शब्द केवळ हमाससारख्या दहशतवादी संघटनांशीच जोडला जात नाही, तर केरळ विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या लोगोवर पॅलेस्टाईनला इस्रायली नकाशावर दाखवण्यात आल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. युवा महोत्सवाचा लोगो कला व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी योग्य नसल्याचे विद्यार्थ्याने म्हटले आहे. याबाबत राज्यपाल आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्रही लिहिल्याचं विद्यार्थ्याने म्हटलं आहे, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. या प्रकरणी उच्च न्यायालयाने आता केरळ विद्यापीठाला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.
इंतिफादा म्हणजे काय?
इंतिफादा हा अरबी शब्द आहे, ज्याचा अर्थ बंड किंवा विद्रोह असा होतो. विशेष म्हणजे इंतिफादा हा शब्द मध्य-पूर्व ते उत्तर-पश्चिम आफ्रिकन देशांमधील 'तख्तापलट' सारख्या कारवायांमध्ये सर्वाधिक वापरला गेला आहे आणि गेल्या काही दशकांपासून तो इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धात 'इस्राएल' विरोधात वापरला जात आहे. . प्रत्येक वेळी वेस्ट बँक किंवा गाझा पट्टीत इस्रायलच्या विरोधात काही घडते तेव्हा त्याला 'इंतिफादा' म्हणून प्रसिद्धी दिली जाते. एकीकडे त्याला प्रतिकार म्हणतात, तर दुसरीकडे इस्रायलवर भ्याड हल्लेही केले जातात. सध्या हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाला पाचवी इंतिफादा असेही म्हटले जात आहे.