श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण : आधी अलाहाबाद उच्च न्यायालयात जा, ईदगाह समितीची याचिका फेटाळली
19-Mar-2024
Total Views |
नवी दिल्ली : श्रीकृष्ण जन्मभूमीशी संबंधित यांचिकांच्या एकत्र सुनावणीस विरोध करणाऱ्या ईदगाह समितीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिका फेटाळत सुप्रीम कोर्टाने समितीला आधी अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. तसेच, सदर प्रकरणी याचिका ही एकत्रीकरणाशी संबंधित असल्याचेही न्यायालयाने सांगितले आहे.
दरम्यान, मथुरेतील वादग्रस्त शाही ईदगाह आणि श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने शाही ईदगाह समितीची याचिका फेटाळून लावली असतानाच समितीला आधी अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्यास सांगण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करताना समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती मागितली होती. उच्च न्यायालयाने या विषयाशी संबंधित सर्व याचिकांवर एकाच वेळी सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते.
ईदगाह समितीने कोर्टात म्हटले की, एकत्रितपणे दाखल करण्यात आलेल्या अनेक याचिकांचे दावे परस्परविरोधी आहेत. याशिवाय याबाबतचा निर्णय घाईघाईने घेण्यात आल्याचा दावा करताच न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य केला नाही. तसेच, अलाहाबाद उच्च न्यायालयात या प्रकरणावर पुनर्विलोकन याचिकाही दाखल करण्यात आली आहे, या प्रकरणी उच्च न्यायालयात आधी निर्णय घ्यावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
ईदगाह समितीच्या याचिकेवर या प्रकरणाची पुढील सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. तसेच, उच्च न्यायालयात निर्णय झाल्यावरच सर्वोच्च न्यायालयात ईदगाह समिती या प्रकरणी जावे लागणार आहे. श्रीकृष्णजन्मभूमी खटल्यात हिंदू पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे मागणी केली होती की या प्रकरणी दाखल १५ स्वतंत्र याचिका एकत्र विलीन कराव्यात आणि त्यानंतर सुनावणी घेण्यात यावी. यामुळे खटल्याच्या सुनावणीला गती मिळेल आणि पक्षकारांनाही सोय होईल, असे हिंदू पक्षाने म्हटले आहे.