होय, मी काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गटाची भेट घेतली : वसंत मोरे
19-Mar-2024
Total Views | 66
पुणे : मी काँग्रेस, शिवसेना, शरद पवार गट या सर्वांकडे जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या आहेत, असे वक्तव्य वसंत मोरेंनी केले आहे. वसंत मोरेंनी मनसेचा राजीनामा देऊन अनेक दिवस उलटले आहेत. त्यानंतरही त्यांनी अजूनपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, आता मी थोडा वेळ घेत आहे, असे ते म्हणाले आहे.
मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना वसंत मोरे म्हणाले की, "माझं पुढील राजकीय भविष्य उज्ज्वलच आहे. परंतू, मी थोडा वेळ घेतोय कारण पुण्याची निवडणूक ही चौथ्या टप्प्यावर असून या निवडणूकीला अजून ५५ दिवस आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात अजूनही बैठका सुरु आहेत. मी काँग्रेस, शिवसेना, शरद पवार गट या सर्वांकडे जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या आहेत. अजून त्यांची पहिली यादीदेखील आलेली नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी आणखी काही दिवस लागतील. त्यामुळे मी थोडा वेळ घेतोय."
ते पुढे म्हणाले की, "निवडणूक जिंकायची असेल तर योग्य रस्त्यावर असण्याची गरज आहे. मी सध्या योग्य मार्गावर असून त्यात नक्कीच यशस्वी होईल. मी वेळ घेतोय पण माझी वेळ चुकलेली नाही. मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहे," असेही ते म्हणाले आहेत.