नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायूतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीला गेले असून लवकरच ते केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढणार की, नाही याबाबत लवकरच स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सोमवारी रात्री ते दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेदेखील दिल्लीत दाखल झाले असून मनसे महायूतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
लवकरच राज ठाकरे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मनसे आणि महायूतीची युती झाल्यास मनसे किती जागा लढवणार, याबद्दलची उत्सुकता लागली आहे. निवडणूक आयोगाने निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यातच आता मनसे महायूतीत सहभागी होणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.