नव्या भारताचे प्रतिनिधित्व

    18-Mar-2024   
Total Views |
International Big Cat Alliance

भारतातील महत्त्वाकांक्षी ’प्रोजेक्ट टायगर’ने गेल्या वर्षी पन्नाशी गाठली. व्याघ्र संवर्धनामध्ये भारताने यश मिळवलेच. त्याबरोबरच सातत्याने कमी होणार्‍या, इतर प्रजातींचेही संवर्धन व्हावे, यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. कर्नाटकाच्या म्हैसूरमध्ये दि. ९ एप्रिल रोजी भरविण्यात आलेल्या समारंभामध्ये घडलेली आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ची घोषणा केली. यामध्ये ’मार्जार’ कुळातील वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबटे, चित्ता, जॅग्वार व पुमा या सात प्रजातींच्या संवर्धनासाठी घोषणा करण्यात आली. दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया येथून भारतात चित्त्यांचा अधिवास पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांचे स्थलांतरही गेल्यी वर्षी करण्यात आले होते.

’मार्जार’ कुळातील मोठ्या मांजरांचे संवर्धन व्हावे, यादृष्टीने पंतप्रधानांनी ही घोषणा केली होती. या ’इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’चे मुख्यालय भारतातच करण्याचा निर्णय फेब्रुवारीअखेर केंद्राने घेतला. वाघ (पँथेरा टायग्रीस), सिंह (पँथेरा लिओ), जॅग्वार (पँथेरा ओन्का), बिबट्या (पँथेरा परडस) आणि हिमबिबट्या (पँथेरा अनसिया) हे प्राणी डरकाळी फोडणार्‍या वर्गात येतात. यामध्ये सिंहाची गर्जना सर्वाधिक मोठी मानली जाते, तर हिमबिबट्याचा या वर्गात पूर्वी समावेश केला जात नसे. पण, कालांतराने ते बदलले व हिमबिबट्याचे देखील ’पँथेरा’ म्हणून वर्गीकरण केले गेले, तर उर्वरित पुमा आणि चित्ता या ’पँथेरा’ वर्गात येत नाहीत; पण त्यांना ’मार्जार’ कुळातच समाविष्ट केले जाते. भारतीय उपखंडामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या वाघ, आशियाई सिंह, भारतीय चित्ता तसेच हिमबिबट्या या प्रजातींचे माहेरघर आहे. (IBCA) म्हणजेच ’इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ ही अनेक देश आणि मोठ्या मांजरींच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या विविध ९७ देशांतील संस्था, मांजरी नसलेले; पण तरीही त्यांचे संवर्धन करण्यास इच्छुक असलेले काही देश यांचा समावेश आहे.
 
(IBCA) जागतिक सहकार्य आणि वन्य निवासी, विशेषतः मोठ्या मांजरींचे संरक्षण करण्यासाठीच्या प्रयत्नांना अधिक बळकट करणारा, एक प्रकल्प ठरणार आहे. मुख्यालय भारतात उभारण्याच्या दृष्टीने केंद्राने १५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच ’इंटरनॅशनल सोलार अलायन्स’च्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचा प्राथमिक साचा तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून हवामान बदलाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी, जैवविविधता संवर्धनाच्या प्रयत्नांना मजबूती देण्यासाठी तसेच ‘संयुक्त राष्ट्रां’नी शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, धोरणात्मक उपक्रमदेखील राबवू शकते.

भारताने पहिल्यांदाच मांडलेल्या, या संकल्पनेला आंतरराष्ट्रीय स्तरावरून चांगला प्रतिसाद मिळतोय. ’इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’चे मुख्यालय भारतात होणार असल्यामुळे, साहजिकच भारताचे महत्त्व वाढणार आहे. व्याघ्र संवर्धनात ज्याप्रमाणे भारताने ठोस पावले उचलत, आपली कामगिरी यशस्वी केली. तसेच २०२१ पासून आंतरराष्ट्रीय स्थानांतराचा भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेतून चित्त्यांचे स्थलांतरही केले गेले. चित्ते स्थानांतरण प्रकल्प बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाला असून, भारतात आल्यानंतर काही पिल्लांनी जन्मही घेतला. अशा प्रकारेच ‘मार्जार’ कुळातील इतर प्रजातींचे संवर्धन या अलायन्सच्या माध्यमातून यशस्वीपणे होऊ शकते, अशी आशा निर्माण होते. ‘मार्जार’ कुळातील प्राणी हे ‘अंब्रेला स्पिशीज’ म्हणून काम करतात. या मोठ्या प्रजातींचे संवर्धन आपसूकच आपल्याबरोबर इतर लहान मोठ्या प्रजातींचे अधिवास संरक्षण, संवर्धन घेऊन येते. त्यामुळेच यांना ’की स्पिशीज’ असेही म्हटले जाते. ’मार्जार’ कुळातील या प्राण्यांचे संवर्धन तसेच आपल्यासोबतच इतर अनेक प्रजातींचे संवर्धन आणि संरक्षण करणारे ठरणार आहेत. भारताने मांडलेली ही संकल्पना आणि ’इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’चे महत्त्व नव्या भारताचे प्रतिनिधित्व करणारे ठरेल, यात शंका नाही.



समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.