ठाणे,कल्याण व भिवंडी लोकसभा क्षेत्रात एकुण ६५ लाख १ हजार ६७१ मतदार, महिला मतदार महिला २९ लाख ९४ हजार ३१५
18-Mar-2024
Total Views |
ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ठाणे जिल्हयातील ठाणे,कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदार संघात एकुण ६५ लाख १ हजार ६७१ मतदार असुन यात २९ लाख ९४ हजार ३१५ महिला मतदार आहेत. एकट्या ठाणे लोकसभा क्षेत्रात ११ लाख २७ हजार ९९५ महिला मतदार आहेत.
तेव्हा, यंदा मतदानाचा टक्का ७५ टक्केपर्यंत नेण्याचा निर्धार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.दरम्यान, नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असला तरी ठाणे जिल्ह्यात महिला शक्तीचा कौल निर्णायक ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रात अंतिम मतदार यादीत एकुण ६५ लाख १ हजार ६७१ मतदार असुन यात ३५ लाख ६ हजार ८२ पुरुष तर २९ लाख ९४ हजार ३१५ महिला आणि १२७४ इतर मतदार आहेत.यंदा ८२ हजार ३२७ नवमतदार वाढले असले तरी एकुण १ लाख २८ हजार मतदार वगळण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ठाणे जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
भिवंडी मतदार संघात ९ लाख ३३ हजार ८१०,कल्याण लोकसभेत ९ लाख ३२ हजार ५१० आणि ठाणे लोकसभा क्षेत्रात ११ लाख २७ हजार ९९५ महिला अशा एकुण २९ लाख ९४ हजार ३१५ महिला मतदार आहेत. हे लिंग गुणोत्तर प्रमाण ८५४ इतके आहे. जिल्ह्यात एकूण ६ हजार ५९२ मतदान केंद्र असुन सर्वाधिक ५११ केंद्रं ग्रामीण भाग असलेल्या मुरबाड मतदार संघात तर सर्वात कमी म्हणजेच २५१ केंद्रे उल्हासनगर मतदार संघात आहेत.
होम व्होटींगसह सुलभ मतदान सुविधा
ठाणे जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रे पुरेशी आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण ६ हजार ५९२ मतदान केंद्र असुन सर्वाधिक ५११ केंद्रं ग्रामीण भाग असलेल्या मुरबाड मतदार संघात तर सर्वात कमी म्हणजेच २५१ केंद्रे उल्हासनगर मतदार संघात आहेत.एकुण सहा संवेदनशील मतदान केंद्रे असुन शहरी भागात ३६ मतदान केंद्रे मोठ्या गृहनिर्माण संकुलामध्ये ठेवण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यात मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी ८५ वर्षावरील तसेच चालता न येणाऱ्या विकलांग मतदारांसाठी होम व्होटींगची सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.
निवडणूक प्रणाली बनली हायटेक
निवडणुक प्रणालीदेखील हायटेक बनली आहे. निवडणूकीच्या दरम्यान काही अनियमितता आढळून आल्यास नागरिक सि व्हीजील या अॅपद्वारे दृकश्राव्य तक्रार पाठवता येणार असून १०० मिनिटांच्या आत तक्रार निवारण केली जाणार आहे.केवायसी (Know Your Candidates) या अॅपद्वारे उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, मालमत्तेची माहिती तर मतदार राजाच्या सोईसाठी व्होटर हेल्पलाईन ॲपद्वारे मतदार यादीतील मतदाराचे नाव शोधणे, मतदार नोंदणीचे अर्ज दाखल करणे, मतदान केंद्रांची माहिती मिळणार आहे.
इलेक्शन सिझर मॅनेजमेंट सिस्टिम (ईएसएमएस) या अॅपद्वारे जप्त केलेल्या अंमलीपदार्थ, मद्य, मौल्यवान धातू, रोख रक्कम जप्त केलेली माहिती डिजिटल पद्धतीने संकलित केली जाणार आहे. सक्षम या अॅपलिकेशन द्वारे दिव्यांग व्यक्तींना मदत तर सुविधा या अॅपद्वारे उमेद्वारांना निवडणूक कालावधीत निवडणूक विषयक विविध परवानगी मिळवणे सुलभ होणार आहे.एन्कोअर या अॅपद्वारे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र, प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सुविधा असुन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवडणुकी संदर्भातील डिजिटाईस स्वरूपात माहिती संकलित करणे सुलभ होणार आहे.