महापालिका आयुक्त चहल यांची बदली, केंद्रीय निवडणूक आयोगाची कार्यवाही
पश्चिम बंगालच्या पोलिस महासंचालकांचीही उचलबांगडी
18-Mar-2024
Total Views |
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना हटविण्याचे निर्देश दिले आहेत.
आयोगाने सर्व राज्य सरकारांना निवडणुकीशी संबंधित कामाशी संबंधित अशा अधिकाऱ्यांची बदली करण्याचे निर्देश दिले होते, ज्यांनी पदावर तीन वर्षे पूर्ण केली आहेत किंवा त्यांच्या गृहजिल्ह्यांमध्ये नियुक्त आहेत. त्यानुसार, केंज्रीय निवडणूक आयागाने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना हटविण्याचे आदेश दिले आहेत.
त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्याच्या मुख्य सचिवांनाही महाराष्ट्रात समान पदावर असलेल्या सर्व महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त किंवा इतर महानगरपालिकांचे उपायुक्त यांच्या बदल्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या पोलिस महासंचालकांचीही उचलबांगडी केली आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गृहसचिवांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशच्या सामान्य प्रशासन विभागांच्या सचिवांना हटवण्यात आले आहे.
दरम्यान, या हटविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडे दुहेरी प्रभार होते. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेदरम्यान आवश्यक असलेली निष्पक्षता आणि तटस्थता कायम ठेवण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे.