सौदर्याची खाण असलेल्या ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री मधुबाला यांचा बायोपिक लवकरच मोठ्या प़डद्यावर झळकणार आहे.
मुंबई : ऐतिहासिक, भटपट, प्रेमपट, ड्रामा हे आशय सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत गाजत आहेत. यात आणखी एक भर म्हणजे राजकीय विषयांवर आधारित चित्रपट आमि चरित्रपट. चरित्रपटांच्या यादीत आणखी एक बायोपिक आला असून याचे नाव आहे ‘मधुबाला’ (Madhubala Biopic). बऱ्याच काळापासून हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाची भूरळ प्रेक्षकांवर पाडणाऱ्या अभिनेत्री मधुबाला (Madhubala Biopic) यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर या चर्चांना पुर्णविराम लागला असून आलिया भट्टची निर्मिती असलेला ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक जसमीत के रीन यांनी या बायोपिकची (Madhubala Biopic) घोषणा केली आहे. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शनने या चित्रपटाची घोषणा केली आहे. याबरोबरच मधुबाला यांची बहीण मधुर ब्रीज भूषण या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत.
सोनी पिक्चर्सच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, मध्यंतरी फॅशन डिजायनर मनीष मल्होत्रा मधुबाला यांच्या जीवनावर बायोपिक करणार असून अभिनेत्री क्रीती सेनॉन यात मधुबाला यांची भूमिका साकारणार असे सांगितले जात होते. मात्र. मधुबाला यांच्या बहिणीने या गोष्टी खोडून काढल्या असून हा बायोपिक इतर कुणीही करायचं धाडस करू नये असं वक्तव्यही त्यांनी एका मुलाखतीदरम्यान केले होते.
पिंकव्हीलाशी साधलेल्या संवादात मधुर ब्रीज भूषण म्हणाल्या होत्या की, “एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे की मधूबालावर एकच बायोपिक बनेल ज्यामध्ये माझा सहभाग असेल. मला कुणाला दुखवायचा हेतु नाही, पण मधूबालाविषयी माहिती नसलेल्या गोष्टी आम्हाला प्रेक्षकांसमोर मांडायला आवडतील. हा बायोपिक बनवण्यासाठी मी पूर्णपणे स्वातंत्र्य द्यायला तयार आहे. मी आणि माझी टीम यावर काम करत आहोत, लवकरच याबद्दल अधिकृती घोषणाही करू”, असे त्या म्हणाल्या होत्या.

मधुबाला यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी दिल्लीत झाला. जन्मत: त्यांचे खरे नाव मुमताज जहान बेगम असे होते. मधुबाला यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर दिसणारी अभिनेत्री अशी ओळख होती. १९४७ साली वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी ‘नील कमल’ या चित्रपटातून प्रमुख अभिनेत्री म्हणून पदार्पण केले आणि अभिनेते राज कपूर यांच्यासोबत त्यांनी स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर ‘महल’, ‘तराना’, ‘मिस्टर एन्ड मिसेस ५५’, ‘मुघल-ए-आझम’, ‘काला पानी’, ‘फुल और काटे’, अशा अनेक चित्रपटांत त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या. त्यामुळे त्यांच्या आगामी बायोपिकमध्ये मधुबाला यांच्या जीवनाबद्दल कोणत्या रहस्यमय गोष्टी उलगडणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. शिवाय मधुबाला यांची भूमिका कोण साकारणार याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागले आहे.