फुलपाखरांचे झाले हिंदीत बारसे; अंगद, जटायू, मोतीमाला, बहुरूपिया....

    14-Mar-2024
Total Views |
butterfly




मुंबई (अक्षय मांडवकर) :
निसर्गात मुक्तछंदाने बागडणाऱ्या फुलपाखरांचे आता हिंदी भाषेत नामकरण झाले आहे (butterflies hindi names). आजच्या 'आतंरराष्ट्रीय फुलपाखरु दिना'निमित्त 'राष्ट्रीय तितली नामकरण सभे'ने फुलपाखरांची हिंदी भाषेतील नावांची यादी प्रसिद्ध केली आहे (butterflies hindi names). पहिल्या टप्प्यात २२१ प्रजातींची नावे प्रसिद्ध करण्यात आली असून 'अंगद', 'मल्लिका', 'जटायू', 'मोतीमाला', 'काग', 'बहुरूपिया' अशा आकर्षक नावांचा यात समावेश आहे. (butterflies hindi names)

भारत हा फुलपाखरांच्या जैवविविधतेने संपन्न असणारा देश आहे. देशात फुलपाखरांच्या साधारण १ हजार ४०० प्रजाती आढळतात. फुलपाखरू हा कीटक इतका छोटा आहे की, ‘अलेक्झांड्रा बर्डिवग’ (२५० मिमी) हे त्यांच्यामधील सगळ्यात मोठे फुलपाखरू, तर ‘ग्रास ज्वेल’ (१४ मिमी) हे सर्वात छोटे फुलपाखरू आहे. यापूर्वी फुलपाखरांची नावे इंग्रजी भाषेत होती. त्यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यत फुलपाखरांची माहिती पोहोचवण्यास अडचणी येत होत्या. चार वर्षांपूर्वी राज्यात आढळणाऱ्या फुलपाखरांची मराठी भाषेतील नावे प्रसिद्ध झाली होती. स्थानिक भाषेत फुलपाखरांना नावे असावीत, याच विचाराने हिंदी भाषेतील नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
यादी पाहण्यासाठी https://zenodo.org/records/10806662

फुलपखारांच्या निरीक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या देशातील विविध संस्थांनी या नामांतरणासाठी 'राष्ट्रीय तितली नामकरम सभे'ची स्थापना केली आहे. त्यामाधम्यातून फुलपाखरू अभ्यासक दिवाकर ठोंबरे यांच्या पुढाकाराने आनंद पेंढारकर, डाॅ. कृष्णमेघ कुंटे, धारा ठक्कर, मनीष कुमार, रुपक डे, रतींद्र पांडे, राहुल काला यांनी सहा महिने अथक प्रयत्न करुन फुलपाखरांचे हिंदी नामकरण केले आहे. डाॅ. कृष्णमेघ कुंटे यांच्यासह त्यांच्या विद्यार्थी लोचना रविशंकर हिने यासाठी मेहनत घेतली आहे. फुलपाखरांचे हिंदी भाषेतून नामकरण करताना त्यांच्या मराठी नावांचाही विचार करण्यात आला. फुलपाखरांचे अधिवास, खाद्यवनस्पती, स्वभाव आणि शरीरवैशिष्ट्य या मुद्द्यांना डोळ्यासमोर ठेवूनच त्यांची हिंदी नावे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय भारतातील सांस्कृतिक आणि पौराणिक संदर्भांचा आधारही घेण्यात आला आहे.

रंजक हिंदी नावे

महाराष्ट्राचे राज्यफुलपाखरू असणारे 'ब्ल्यू माॅरमाॅन' याला मराठीत 'निलवंत' म्हटले जाते. आता हिंदीमध्ये त्याचे नाव 'बडा बहुरूपिया' असे करण्यात आले आहे. देशातील आकाराने सगळ्यात मोठे फुलपाखरू म्हणजे 'गोल्डन बर्डविंग'. रामायणातील जटायूसारखा या फुलपाखराचा आकार मोठा असल्याने त्याचे हिंदीतील नामकरण 'रंगोली जटायू' असे करण्यात आले आहे. 'गोल्डन एन्जल' प्रजातीचा नर हा आपल्या हद्दीबाबत प्रचंड संवेदशनील असून तो आपली हद्द सोडून जात नाही. रामायणातील अंगदाचा पाय कोणालाही एका जागेवरुन हलवता येऊ शकत नव्हता. 'अंगद' आणि 'गोल्डन एन्जल' हद्दीबाबतचे हेच स्वभाववैशिष्ट्य हेरुन संशोधकांनी या फुलपाखराचे नाव 'सुनहरा अंगद' ठेवले आहे. 'कमांडर' या फुलपाखराच्या शरीरावरील मोत्याच्या माळेसारख्या रचनेमुळे त्यांचे हिंदी नामकरण 'मोतीमाला', असे करण्यात आले आहे.


लोकमान्यतेची गरज
आज प्रकाशित झालेली हिंदी भाषेतील फुलपाखरांची नावे ही पुढील १५ दिवस लोकांकडून येणाऱ्या सुचनेकरिता खुली असणार आहेत. या नावांना लोकमान्यता मिळाल्यानंतरच पुढील महिन्याभरात अंतिम यादी प्रकाशित करण्यात येईल. त्यानंतर ती सरकारसमोर सादर करण्यात येईल. - दिवाकर ठोंबरे, फुलपाखरू अभ्यासक
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.