बाळ उतरे अंगणी...

    14-Mar-2024   
Total Views |
Levels and trends in child mortality

बाळ उतरे अंगणी
आंबा ढाळतो साऊली
चिमुकल्या पायांखाली सारी मखमल सावळी...

इंदिरा संत यांचे गीत आणि गिरीश जोशी यांचे संगीत लाभलेल्या वरील काव्यपंक्ती. परंतु, दुर्दैवाने जगभरातील लाखो दाम्पत्यांच्या अंगणात बाळ उतरल्यानंतरही ते अल्पायुषी ठरते. मग मातृत्व-पितृत्वाचे सुख क्षणभंगुरतेने भंगते. क्षणार्धात भरलेली ओंजळ अगदी दुसर्‍या क्षणी रिती होते. पण, याच संदर्भात नुकतीच एक सकारात्मक आणि आशादायक माहिती समोर आली आहे. ’ United Nations Inter-agency Group for Child Mortality Estimation (UN IGME)' च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, पाच वर्षांखालील बालमृत्यूच्या दरात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. त्यानिमित्ताने या अहवालातील ठळक निरीक्षणांची कारणमीमांसा करणारा हा लेख...

’संयुक्त राष्ट्रा’च्या या अहवालानुसार, 2022 साली बालमृत्यूदरात मोठी घट नोंदवण्यात आली. 2000 सालानंतर पाच वर्षांखालील बालकांचा मृत्यूदर हा तब्बल 51 टक्क्यांनी कमी झाला आहे. 2022 साली जन्मानंतर पाच वर्षांखालील मृत्यू झालेल्या बालकांची संख्या ही 4.9 दशलक्ष इतकी नोंदवली गेल्याचे आकडेवारी सांगते. 2000च्या आसपास हीच संख्या 9.9 दशलक्षच्या घरात होती. त्यामुळे हा आकडा लक्षात घेता, आता जाहीर झालेली आकडेवारी ही निश्चितच दिलासादायक म्हणता येईल. महत्त्वाचे म्हणजे, अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये बालआरोग्याच्या क्षेत्रातील सुधारलेली स्थिती अधिकाधिक बालकांना जीवनदान देणारी ठरली आहे. त्यामुळे सरकार, विविध संस्था, स्थानिक समुदाय, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी-अधिकारी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच लाखो बालके आज श्वास घेत आहेत.

खरं तर विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीने आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. परंतु, तरीही या आरोग्यक्रांतीचे लाभ अविकसित आणि विकसनशील देशांमधील गरजूंपर्यंत झिरपायला बरीच वर्षे जावी लागली. आता कुठे या उपेक्षित, अगदी पशूंसारख्या अवस्थेत मूल जन्माला घालणार्‍या महिलांपर्यंत आरोग्यसेवेची जीवनकिरणे पोहोचू लागली आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा तुलनेने सुधारलेल्या आरोग्य यंत्रणेमुळे, औषधोपचारांच्या उपलब्धतेमुळे पाच वर्षांखाली बालकांचा मृत्यूदर घटल्याचे, हा अहवाल मुख्यत्वे अधोरेखित करतो. विशेषकरून सहारा वाळवंटाच्या पट्ट्यातील आणि दक्षिण आशियाई देशांमधील प्रसूती व्यवस्थेतील सुधारणांमुळे हे चित्र आज पालटलेले दिसते. विशेषकरून कंबोडिया, मलावी, मंगोलिया, रवांडा यांसारख्या देशांमध्ये पाच वर्षांखालील बालमृत्यूचे प्रमाण सन 2000 पासून 75 टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. म्हणजे परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली हे खरेच; पण म्हणून सगळेच काही आलबेल आहे, असा गोड गैरसमज करून घेण्याचेही अजिबात कारण नाही.

कारण, या अहवालात जागतिक बालमृत्यूची मन विषण्ण करणारी आकडेवारीही ’संयुक्त राष्ट्रा’ने सादर केली आहे. त्यानुसार, जगभरात दर 14व्या सेकंदाला 28 दिवसांच्या आत जन्मलेल्या एका बालकाचा मृत्यू होतो. एवढेच नाही, तर दर सहाव्या सेकंदाला पाच वर्षांखालील एक बालक मृत्युमुखी पडते, तर दर 35व्या सेकंदाला पौगंडावस्थेतील एका बालकाला मृत्यू कवटाळतो. त्यामुळे 2000 ते 2022 या काळात एकूण 221 दशलक्ष बालकं, पौगंडावस्थेतील मुलं आणि तरुणांना विविध कारणास्तव या जगाचा निरोप घ्यावा लागला.
 
त्यामुळे सारांश हाच की, आजही मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची नितांत गरज आहे. म्हणजे एकीकडे जगात टेलिमेडिसीनचे प्रयोग यशस्वी होत असताना, दुसरीकडे दुर्गम भागात वैद्यकीय सेवेचा मागमूसही नाही, असा हा कमालीचा वैश्विक विरोधाभास. त्यामुळे संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना आणि त्या-त्या देशातील सरकारी यंत्रणांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा सर्वंकष पुनर्विचार करण्याची आज नितांत गरज आहे. बालमृत्यू रोखण्याबरोबरच प्रसूतीपूर्व निगा, प्रसूतीदरम्यानच्या तपासण्या, मातेचे आरोग्य, प्रसूतीपश्चात घ्यावयाची काळजी यांसारख्या बाबतीत अविकसित देशांना विकसित देशांनी सर्वोपरी साथ द्यायला हवी. तसे झाले तर फुलण्याआधीच कोमेजणार्‍या, या बालपुष्पांचा सुगंध दीर्घकाळ नक्कीच दरवळेल!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची