सिम्बायोसिस नाट्यगृहात दि. ९ फेब्रुवारीला तर यशवंत नाट्यगृहात रविवार, दि. ११ फेब्रुवारीला गोव्याच्या ‘लोकविश्वास प्रतिष्ठान’तर्फे अभिनय नृत्याविष्कार स्वरुपात गदिमा-बाबूजींचे ‘गीतरामायण’ सुमारे २०० दिव्यांग कलाकारांनी प्रस्तुत केले. या अद्भुत कार्यक्रमाचा मागोवा घेणारा हा लेख...
अभिनय नृत्याविष्कार स्वरुपात‘गीतरामायण’ रंगमंचावर साकार होतंय... किमान ५० ते ६० कलाकार वावरत आहेत. त्या कलाकारातील काहींना दिसत नाही, तर कुणी श्रवणबाधित, बरेचसे तर बुद्धीबाधित, काही कमरेतून खाली लुळे, कुणाला सरळ उभंही राहता येत नाही... पूर्णतः समस्या असलेली एक मुलगी, तर चाकाच्या खुर्चीत बसून भावपूर्ण चेहर्यातून व्यक्त होत होती. परंतु, एकदाही कुणी कुणाला धक्का दिला नाही की, क्षणभराचाही काही गोंधळ नाही; सारे कसे परस्परांना समजून घेत, दोन तास, एक सेकंदही मध्ये रिकामा न जाता सारे शिस्तबद्धपणे हसर्या चेहर्याने आनंद देणे, नि घेणे चालू होते.सिम्बायोसिस नाट्यगृहात दि. ९ फेब्रुवारीला तर यशवंत नाट्यगृहात रविवार, दि. ११ फेब्रुवारीला गोव्याच्या ‘लोकविश्वास प्रतिष्ठान’तर्फे अभिनय नृत्याविष्कार स्वरुपातगदिमा-बाबूजींचे ‘गीतरामायण’ सुमारे २०० दिव्यांग कलाकारांनी प्रस्तुत केले, तर इतर कलावंत १०० जण असा ३०० जणांचा ताफा गोव्याहून सहा बसमधून पुण्यात दाखल झाला. २०२० साली जेव्हा गदिमा-बाबूजींचे जन्मशताब्दी वर्ष होते, तेव्हा गोव्यात या कार्यक्रमातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. हा कार्यक्रम काही पुणेकर रसिकांनी बघितला होता. त्यावेळी हा कार्यक्रम पुण्यातही व्हावा, असा आग्रह धरला होता. या आग्रहाखातर हे दोन प्रयोग पुण्यात झाले. एका प्रयोगाला माजी खासदार प्रदीपदादा रावत उपस्थित होते.
गोव्यातील तीन गायक आणि वादक यांच्या जोडीला दोन दृष्टिहीन गायक यांनी गदिमांची गीते सादर केली. गीत रामायणाची कथा पुढे नेणारे निवेदन संगीतासह ध्वनीमुद्रित स्वरुपात तयार होते. मधील कथेचा भाग एक दृष्टिहीन मुलगी आणि दोन मंद अध्ययनक्षमता असलेल्या मुलांनी सूत्रधार म्हणून अभिनित केला. पूर्ण कथाभाग या तिघांचाही मुखोद्गत होता, हे विशेष! अगदी ’स्वयेश्री रामप्रभू ऐकती’पासून सुरू झालेली रामकथा.. श्रीरामांचा वनवास..सीताहरण, सुग्रीवमैत्री..सेतूबंधन..लंकादहन..आणि राम-रावण युद्ध असे सारे टप्पे पार करीत, ‘भूवरी रावण वध झाला.’ पर्यंतचा सारा देखणा सोहळा साकारला. जिथे रामकथा साकारते तेथे हनुमंतांसाठी पाट आणि विडा ठेवला जातो.येथपासूनच आनंदाची नांदी झाली.या प्रवासात प्रत्येक प्रसंग फार प्रत्ययकारीपणे समोर साकार झाला. सारे नेपथ्य देखणे, जी साधनसामग्री शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी मेहनतीने घडवली होती. रामजन्माच्या वेळचा पाळणा, सीतेला रथातून पळवून न्यायचा रथ, ’थांब सुमंता थांबवी रे रथ’ मधील घोड्यांसहित रथ, मुलांनी काळ्या ओढण्या पांघरून बनवलेलीनौका, सागराचं निळं पाणी, त्यावर चकाकणारे मासे, राजा दशरथासाठी श्रीरामांना असलेली छत्रं-चामरं सारंच देखणं नि भव्यदिव्य सलग गीतरामायण समोर साकारताना बहुतांश गीतांच्या वेळी प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या.
विशेषत्वाने दाद द्यावी, असे काही प्रसंग समोर साकारले गेले. लंकेत हनुमतांची शेपूट पेटवली गेली ती शेपूट खरोखरीच दहा फूट लांब होती तर श्रीरामांनी उचललेलेशिवधनुष्य, ते भंग पावल्याचा प्रसंग खूपच भावस्पर्शी झाला. सेतू बांधतानाची वानरसेना, हातातील श्रीरामांच्या नावाचादगड, अशोकवनातील सीता सारे अनुभवताना पुनःपुन्हा डोळे भरून येत होते. शूर्पणखेच प्रेक्षागृहातून तिचे अखेरीस श्रीराम प्रेक्षकातून छत्रचामरासह आले, पाहुण्यांनी त्यांना पुष्पहार घालून केलेले वंदन एक दिव्य अनुभूतीच वाटली. नकळत सार्यांचेच हात जोडले गेले. सुमारे २०० मुलांच्या या महानाट्याचे दिग्दर्शन जयेंद्रनाथ हळदणकर यांनी सांभाळले होते. दुधात साखर विरघळावी तसे ते आणि त्यांची टीम मेहनत करीत होती. सलाम त्यांच्या कार्यकर्तृत्वाला! प्रचंड मेहनत आणि सराव यातूनच हा आत्मविश्वास त्यांनी मिळवला, एवढे नक्की. मुलांचे मेकअप करणारे, तुळशीदास व प्रीतम नाईक यांनाही दाद द्यावी तितकी कमी! दृष्टिहीन, कर्णबधिर आणि बुद्धीबाधित मुलांच्या शाळाविभागांचे मुख्याध्यापक अनुक्रमे सारिका चारी, विनोद सतरकर आणि अरविंद मोरे यांनी पालक-शिक्षकांना-कर्मचार्यांना हाताशी धरून हे शिवधनुष्य पेलले. मूळ संकल्पना लोकविश्वास प्रतिष्ठानच्या सचिव सविता मनोहर देसाई यांची बुद्धीबाधित मुलीचे पालक असलेले हे देसाई दाम्पत्य. प्राजक्ता ही त्यांची मुलगी; काही वर्षांपूर्वी देवाघरी गेली आणि या उभयतांनी सारे आयुष्य या मुलांसाठी वाहून घेतले. सलग पाचवेळा संस्थेचे अध्यक्षपद भूषविणारे अनुप प्रियोळकर!
नावीन्याचा ध्यास नि कलात्मकतेचा, श्वास जपणारे, उत्साही व्यक्तिमत्व ‘आर्थिक सल्लागार’ असणारे अनुप सर हिमालयासारखे सार्यांच्या पाठीशी असतात, हे विशेष अनेक मुलांचे पालक यानिमित्ताने प्रथमच पुण्यात आले. खूप शारीरिक मर्यादा असलेलीमुलं असूनही, त्यांच्यासह(मुलांसह)रंगमंचावर वावरताना त्या मातांचे चेहरे आनंदातिशयाने उजळून निघाले होते, इतका उत्साह ओसंडून वाहत होता. मंतरलेले ते दोन तास अविस्मरणीय आनंदच नाही, तर दैवी शक्तीची प्रचिती देऊन गेले. या महानाट्याच्या सुरुवातीचे प्रास्ताविक व औपचारिक उद्घाटन संपल्यानंतर अखेरचे निवेदन करण्याची संधी मला मिळाल्याने जणू काही मीही त्याचाच भाग होऊन गेले. खरेतर या नाट्याचे प्रयोग शाळा-महाविद्यालयात होणे गरजेचे आहे. आपण परिपूर्ण आहोत, भाग्यवान आहोत, याची तरी जाणीव यानिमिताने नक्की होईल. कारण, या मुलांच्या चेहर्यावरून, शरीररचनेवरून, वागण्यातून त्यांच्यातील न्यूनतेची सहज कल्पना करता येते. असे असूनही अतिशय आनंदी, उत्साही मुलं, माता यांकडे पाहून प्रेरणेचा स्फुल्लिंग हमखास जागा होईल.
सातत्याने काहीतरी मला हवे असण्याची लालसा, असमाधानी वृत्ती, इतरांना मिळालेलेमलाही मिळायला हवे, याची अतृप्ती, हे सारे, किती फोल असून, निसर्गाने आपल्याला भरभरून दान दिले आहे, ही जाणीव करून देणारा हा प्रयोग नवीन-जुन्या पिढीने नक्कीच अनुभवावा. आजच्या मोबाईल, व्हॉटस अॅपच्या जगात, आपण भावनाशून्य होऊन फक्त मेसेज पुढे तरी पाठवतो वा डिलिट करतो मनापर्यंत ते पोहोचतच नाहीत. हा प्रयोग नक्कीच मनाला स्पर्श तर करतोच, पण आपण काही आपल्यातील थोडे द्यावे, ही त्यागाची भावना मनात अंकुरित करणारा आहे. विशेष म्हणजे, या ३०० व्यक्तींच्या चमूची चार दिवस निवास आणि भोजनाची, पूर्ण पोटापाण्याची व्यवस्था पुण्यातील प्रतीक एकबोटे नावाच्या एका तरुणाने केली होती. त्याचे हात देवाचे झाले, याबद्दल तीळमात्र शंका नाही. कवी दत्ता हलसगीकर यांचे शब्द नकळत ओठावर आले-
ज्यांच्या अंगणात झुकले ढग,
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे
आभाळा एवढी उंची ज्यांची,
त्यांनी थोडे खाली यावे,
मातीत ज्यांचे जन्म मळले,
त्यांना थोडे उचलून घ्यावे.
शोभा नाखरे