महात्मा गांधींपेक्षा राहुल गांधी जास्त चालतात!

आ. जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य

    12-Mar-2024
Total Views |
MLA Jitendra Awhad



ठाणे :   शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा आव्हाडांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधींपेक्षा काँग्रेस नेते राहूल गांधी जास्त चालतात, असे वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. एकंदरीत, महाविकास आघाडीत या वादामुळे अंतर्गत कलह होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

आव्हाड म्हणाले, महात्मा गांधीचे प्रत्येक आंदोलन पायी चालत झाले होते. पण, राहुल गांधी, तीन हजार सहाशे किलोमीटर चाललेत. इतके तर महात्मा गांधी सुद्धा चाललेले नाहीत. असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने एक प्रकारे महात्मा गांधीचा अवमान केल्याची चर्चा रंगली आहे. याआधी आव्हाडांनी राम मांसाहारी होता, असेदेखील म्हटले होते. या वक्तव्यामुळे आव्हाडांवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठविली गेली. त्यानंतर आता राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल वक्तव्यामुळे पुन्हा टीकेचे लक्ष्य बनले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी १६ मार्च रोजी ठाण्यात येत आहेत. त्या संदर्भात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत आव्हाड बोलत होते.राहुल गांधी जेव्हा पहिल्यांदा चालायला निघाले तेव्हा टिंगल टवाळी होत होती. लोक हसत होते. हे चार दिवसांचे आठ दिवसांचे नाटक आहे.अशी खिल्ली उडवली गेली. खरं तर हे भारतीयांच्या दृष्टीने चालण्याला महत्व आहे.महात्मा गांधीचे प्रत्येक आंदोलन पायी पायी चालत चालत झाले होते. पण, राहुल गांधी तीन हजार सहाशे किलोमीटर चाललेत आहे, इतके तर महात्मा गांधी सुद्धा चाललेले नाहीत. असा दावा आव्हाडांनी केल्याने नवा वाद उदभवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


ठाण्याची जागा शिंदेनाच मिळायला हवी - आव्हाडांना शिंदेंचा पुळका

ठाण्याची जागा शिवसेनेची हक्काची जागा, असे असताना यावरून संभ्रम निर्माण केला जात आहे. ज्या हक्काने ही जागा शिवसेनेने जिंकली आहे, त्या हक्काने जरी आम्ही विरोधात असलो तरी ही जागा शिंदे गटालाच मिळायला पाहीजे. असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने आव्हाडांना शिंदेचा इतका पुळका का आला ? असा सवाल केला जात आहे. विशेष म्हणजे, यावेळी व्यासपीठावर ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे हे देखील उपस्थित होते.