बौद्ध भिक्षूंवर अत्याचार

    01-Mar-2024   
Total Views |
Tibetan monks

शेकडो बुद्ध भिक्षू गुडघ्यावर बसून शांतपणे सहकार्य मागत होते. मात्र, त्याबदल्यात त्यांच्यावर पाण्याचा मारा, पेपर स्प्रे आणि टेसरचा मारा केला गेला. त्या शेकडो भिक्षूंना तुरुंगात डांबले गेले. शांततापूर्ण मार्गाने मागणी करणारे हे भिक्षू आहेत. चीनच्या अधिपत्याततील गार्जे तिब्बती स्वायत्त प्रांतातील डेगे काउंटी येथील वांगबुडिंग टाऊनशीपमध्ये राहणारे. चीनमध्ये ड्रिचू नदीवर २ हजार, २४० मेगावॅटच्या गंगटुओ जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती होत आहे. हा परिसर यांगत्से नदीच्या वरच्या भागात. मात्र, या प्रकल्पाला तेथील स्थानिक नागरिक विरोध करत आहेत. कारण, या केंद्राच्या निर्मितीमुळे दोन गावे पूर्णतः विस्थापित होणार आहेत. तसेच सहा मोठे बौद्ध मठही पाण्याखाली जाणार आहेत.

तथागतांचा जन्म नेपाळ-लुंबिंनीमधला. तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले ते भारतातील बिहार येथील बोधगया येथे. पुढे उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे तथागतांचे महानिर्वाण झाले. थोडक्यात, बौद्ध धर्माचे मूळच भारत आहे. याबद्दलही चीनला भयंकर असूया. कारण, जगभरातले बुद्धधर्मीय देश आस्थेचे प्रतीक म्हणून भारताकडे पाहतात. धम्माचा देश म्हणून आदर देतात. हे सगळे पाहून चीनचा तीळपापड होत असतो.जग भारताला बुद्धाचा देश मानते, तर ते तसे न होता नेपाळला बौद्ध आस्थांचे केंद्र म्हणून विकसित करायचे. पुढे ते केंद्र चीनमध्ये वळवावे, असे चीनचे मनसुबे. त्यासाठी चीन एक एक योजना आखतो. उदाहरणार्थ, तथागत गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनीमधला. चीनने लुंबिनी आणि काठमांडूदरम्यान एक रेल्वे लाईन विकसित केली. पुढे हा मार्ग ल्हासा आणि चीनच्या इतर बौद्ध स्थळांना जोडण्यात येणार आहे. २० २१ साली चीनने ‘दक्षिण चीन सागर बौद्ध धर्म फाऊंडेशन’ ही संस्था सुरू केली. दुसरीकडे चीनने पाकिस्तानमधील स्वात घाटातील गांधार परिसरालाही विकसित करण्याचा घाट घातला. का? तर उत्खननात तिथे जुने बौद्धविहार आढळले. नेपाळ आणि पाकिस्तान येथील बौद्धस्थळांना विकसित करून चीनशी जोडायचे, असे चीनचे नियोजन. आता कुणी म्हणेल की काय झाले? चीन धम्माचे काम करत आहे. पण, हे साफ खोटे आहे.
 
चीनमध्ये बौद्ध धर्माला मानणारी लोकसंख्या जास्त असली तरीसुद्धा चिनीच्या कम्युनिस्ट जुलमी राजवटीपुढे गुडघे टेकवतील, त्याच धर्माला चीनमध्ये अभय आहे. बौद्ध धर्मातील शांतता, करूणा मंगलमैत्री मध्यममार्ग वगैरे चीनच्या गावीही नाही. पण, तरीही चीनला बौद्धधर्मीय देश म्हणून पाहणारे भारतातही काही कमी लोक नाहीत. कितीतरी ‘डफलीवाले’ विद्रोही चीनला समर्थन करतात. का तर तो कम्युनिस्ट देश आहे म्हणून नाही, तर त्यांच्या मते, तिथे बौद्ध लोकसंख्या जास्त आहे म्हणून. पण, तिथल्या बौद्धांना बुद्धांच्याच विचारांवर जगण्याची संधी चिनी प्रशासन देत नाही, या सत्याकडे हे लोक मात्र कानाडोळा करतात. चीननेच बौद्ध धर्म गुरू दलाई लामा यांच्यावर अत्याचार केला, हेसुद्धा साोयीस्करपणे विसरतात. बौद्ध धर्मीय कोणत्याही कारणाने एकत्रित येऊ नये, यासाठी चीन षड्यंत्र रचत असतो. उदाहरणार्थ, २० २२ साली लोकप्रिय बौद्ध भिक्षू रिनपोछे यांचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या निमित्ताने बौद्धधर्मीय एकत्र येतील, या भीतीपोटी चीनने त्यांच्या मृत्यूची बातमीही लपवली.

‘तिब्बत राईट कलेक्टिव्ह’च्या एक अहवालामध्ये पुराव्यांसकट प्रकाशित करण्यात आले आहे की, चीनने दहा लाखांपेक्षा जास्त तिबेटी बौद्धांची हत्या केली. तसेच चीनच्या भारत आणि तिबेट सीमा भागातील बौद्ध समाजाला विस्थापित करून तिथे चीन सैनिकांना वसवत आहे. शांतताप्रेमी बौद्ध समाज आणि धम्म गुरू, भिक्षूही चीनच्या रडारवर कायमच आहेत. कारण, चीनला भीती वाटते की, तेथील बौद्ध जनतेने खर्‍या भिक्षूंच्या मार्गदर्शनाने जगायचे ठरवले तर? तर चीनची जागतिक स्तरावरची द्वेषपूर्वक, हिंसात्मक, षड्यंत्री वृत्तीला चिनी बौद्ध जनताच विरोध करेल. त्यामुळे चीनने देशातील बौद्ध धर्मीयांनाही कम्युनिस्ट बंधनातच ठेवले आहे. यावर भारतातल्या तमाम मानवहक्क कार्यकर्ते, पुरोगामी वगैरे लोक, चीनला राजकीय बाप मानणारे आणि भारतात गोरगरीब पीडितांचे कैवारी आहोत भासवणार्‍या डाव्या कम्युनिस्टांचे काही म्हणणे आहे की नाही? तूर्तास बौद्ध भिक्षूंवर अत्याचार करणार्‍या चीनचा निषेध!

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.