अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : एक चिंतन

    07-Feb-2024   
Total Views |
Article on 97th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यंदाचे ९७वे वर्षं. पुढील तीन वर्षांत स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेली ही साहित्य चळवळ शंभरी गाठेल. एके काळी दिग्गजांनी गाजवलेले हे व्यासपीठ आज नेमके कुठे आहे, याचा वेध घेताना संमेलनाविषयी होणारी ओरड आणि त्याची कालसुसंगतता तपासणेही तितकेच क्रमप्राप्त. त्यानिमित्ताने अमळनेर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘अखिल भारतीय साहित्य संमेलना’चा विविध आयामातून आढावा घेणारा हा लेख...

जळगावच्या अमळनेर येथे साहित्य संमेलन अखेरीस ‘पार पडले.’ होय, ‘पार पडले’ असेच म्हणावे लागेल! यावर्षी अपवादानेच संमेलन तसे निर्विघ्न झाले. परंतु, विशेष उल्लेखनीय असेही काही संमेलनात नव्हते, हेही तितकेच खरे. अमळनेर या लहानशा गावात प्रताप महाविद्यालय परिसरात संमेलन व्हावे, म्हणून गेली चार वर्षे स्थानिक प्रतिनिधी साहित्य महामंडळाकडे प्रस्ताव पाठवत आहेत. मात्र, संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातून येणारा साहित्य रसिकांचा ओघ एका गावाला पेलवणारा नक्कीच नाही. आर्थिक नियोजनापासून ते निवास व्यवस्था अशा सर्वंच आघाड्यांवर स्थानिकांना लक्ष द्यावे लागते. खरे तर मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत साहित्य संमेलने भरवणे केव्हाही श्रेयस्कर; परंतु ग्रामीण जीवन, महाराष्ट्राच्या विविध गावांत बोलल्या जाणार्‍या मराठीच्या बोली, तेथील स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब असलेले साहित्य मुख्य प्रवाहात आणावयाचे म्हटल्यास आणि साहित्याच्या माध्यमातून अवघा मराठी भाषिक जोडायचा म्हटल्यास, छोट्या खेड्यांत भरवल्या जाणार्‍या संमेलनांना पर्याय नाहीच. केवळ पुस्तकाच्या माध्यमातून माहिती असलेल्या आपल्या महाराष्ट्राचे दर्शन यानिमित्ताने वाचकांना होते.

स्थानिक उद्योगधंद्यांना चालना मिळते, आर्थिक चलनवलन वाढीस लागते, पर्यटनाच्या दृष्टीनेही साहित्य संमेलन स्थानिकांसोबत महाराष्ट्रभरातील रसिकांना समृद्ध करुन जातात. महाराष्ट्र शासनाकडून काही प्रमाणात निधी संमेलनासाठी दिला जातो; परंतु तो अपुरा असल्याने आयोजनाची मोठीच जबाबदारी या गावांवर येते, हे मात्र विचार करण्यासारखेच. ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ हे काही नवे व्यासपीठ किंवा खासगी संस्थेने आयोजित केलेला उपक्रम नाही. त्यामुळे निवास आणि भोजनाच्या मर्यादा या प्रकर्षाने जाणवतातच. यावेळी ज्या निमंत्रित वक्त्यांना आणि सहभागींना आपल्या निवास आणि भोजनाची जबाबदारी घेणे शक्य असेल, त्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे वाटते. यामुळे आयोजकांवरील बोजा थोडा का होईना कमी होऊ शकेल. कारण, संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या जनसमुदायासमोर आपले विचार मांडण्याची मिळालेली संधी, संमेलनाचे व्यासपीठ हाच खरे तर मोठा सन्मान. साहित्य मंडळाकडूनही याबाबत विचार झाल्यास, उर्वरित निधीचा विनियोग करणे सोपे जाईल; तसेच सोईसुविधा यांच्याबाबत नियमित येणार्‍या तक्रारींची संख्याही कमी होईल.

आयोजनातील ढिसाळपणासोबतच दुसरी ओरड साहित्य रसिकांकडून होते, ती म्हणजे साहित्य संमेलने हे राजकीय अजेंडा राबवण्यासाठी नेत्यांनी बळकावलेली व्यासपीठे आहेत. खरे तर कला, साहित्य यांसारख्या जीवन समृद्ध करणार्‍या सर्वच माध्यमांना राजाश्रयाची गरज पूर्वापारपासूनचीच. अगदी भारतात राजेशाही होती तेव्हापासूनच. आपला इतिहाससुद्धा नेहमीच जेत्यांच्या बाजूने लिहिला गेला. तेव्हा राजकीय नेत्यांना सरसकट वगळून चालणार नाही; मात्र लोकशाहीचा मान राखत आणि सद्यःस्थितीतील राजकीय संस्कृतीचे पुनरावलोकन करण्यासाठी विविध विचारसरणी किंवा पक्षीय नेत्यांचा एकत्रित परिसंवाद आयोजित करण्यास हरकत नसावी. यातून प्रशासन आणि प्रजेत सुसंवादही वाढीस लागेल. परंतु, केवळ निधी उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावरून साहित्याचे व्यासपीठ साहित्यबाह्य गोष्टींसाठी वापरले जाऊ नये. राजकीय संस्कृती आणि साहित्य निर्मिती एकमेकांस पूरक आहेत, तेव्हा एकमेकांच्या आधारेही साहित्य दिंडी महाराष्ट्राला सर्वार्थाने प्रगल्भ करेल, यात शंका नसावी.

अशा या साहित्य संमेलनात एकाच वेळी विविध सभागृहांत परिसंवाद, अन्य कार्यक्रम होत असतात. तसेच अनेक दालने, कवी कट्टा, प्रदर्शने, पुस्तक व खाद्यविक्रीचे स्टॉल्ससुद्धा सज्ज असतात. बहुतांशी कार्यक्रम नियोजित वेळेत सुरू होत नाहीत, ही तर साहित्य संमेलनाची जणू एक अघोषित प्रथाच! काहीवेळेला तर परिसंवादाचे रुपांतर चक्क भाषणबाजीत होते, हे तर अजिबात खपवून घेण्यासारखे नाही. अनेक ठिकाणी एकाच वेळी कार्यक्रम होत असल्याने, मुख्य सभामंडपात शुकशुकाट दिसतो; पण त्याच वेळी इतर सभागृह आणि पुस्तक दालने मात्र वर्दळ आणि रसिकांनी भरून गेलेली असतात. पुस्तक दालने दिवसभर उन्हाच्या त्रासाने त्रस्त असतात व म्हणूनच म्हणावी तशी विक्री होताना दिसत नाही, अशीही एक तक्रार कानावार आली. त्यामुळे पुस्तक दालने मुख्य सभागृहाला जोडून घेतल्यास परिणामकारक बदल दिसतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, परिसंवादात वक्ते निवडताना चार संस्थांचा एक एक प्रतिनिधी असा अट्टाहास असल्याने, वक्त्यांमध्ये एकसूत्रता दिसून येत नाही. मुद्द्यांची पुनरावृत्ती, तोचतोचपणा क्वचित दर्जातील भिन्नता या सर्वांमुळे परिसंवादाचा विषय चांगला असला, तरीही तो तितकासा श्रवणीय होत नाही.

हा सर्व नन्नाचा पाढा आणि त्रुटी व उपाययोजना सांगून एकांगी भाष्य करणे, हा या लेखाचा मुळीच उद्देश नाही. साहजिकच बर्‍याच नव्या आणि स्वागतार्ह गोष्टी यावर्षीच्या संमेलनात पाहायला मिळाल्या. त्यापैकी एक आवर्जून अधोरेखित करावेसे वाटते ते म्हणजे तरुणांचा सक्रिय सहभाग. संमेलनपूर्व कार्यक्रमात बाळमेळावा झाला. यामध्ये केवळ बालगोपाळांचे कार्यक्रम नव्हते, तर हा मेळावाच शालेय विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. मेळाव्याचे संपूर्ण नियोजन विद्यार्थ्यांच्या नियोजन समितीने केले. अगदी कार्यक्रमाचा अध्यक्ष आणि स्वागताध्यक्षसुद्धा विद्यार्थीच! लहान वयापासून होणार्‍या या सर्व प्रकारच्या जबाबदारीचे संस्कार सर्वस्वी कौतुकास्पदच. या मुलांना व्यासपीठ देणार्‍या अमळनेर येथील आयोजन समितीचे म्हणून कौतुक करावे तेवढे कमीच. त्याचबरोबर या वर्षी संमेलनाला ‘डिजिटल टच’ देण्यात आला. सर्व परिसंवादांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले; तसेच संमेलन लाईव्ह लिंकद्वारे उपस्थित राहू न शकणार्‍यांसाठीही उपलब्ध करून देण्यात आले. संमेलनाबाबत सर्व प्रकारची चौकशी करण्यासाठी ‘चॅटबॉट’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आयोजकांनी परिधान केलेले जॅकेट्स आणि सत्कारमूर्तींसाठी असलेल्या शाली प्लास्टिकचा पुनर्वापर करून तयार केल्या होत्या. हा निर्णय पर्यावरणपूरक असाच.

‘संमेलनाचे अध्यक्ष चालते बोलते असावे,’ या आग्रहास्तव यावर्षी रवींद्र शोभणे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अनेक उत्तम मुद्द्यांचा समावेश त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केला. प्रशासनाला त्यांच्या कर्तव्यांकडे लक्ष देण्यासाठी सूचविण्याचे संमेलनाध्यक्षांनी करावयाचे काम त्यांनी निडरपणे केले. आज समाज ज्या निवडक साहित्यिकांना समीक्षेअभावी किंवा वाचनाअभावी डोक्यावर घेतो, अशा अनेक नामवंत साहित्यिकांच्या साहित्यकृतींचे त्यांनी विश्लेषण केले. खान्देशात जाऊन अखिल भारतीय व्यासपीठावरून भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरीतील आणि त्यांच्या वक्तव्यातील विरोधाभास, त्यांची बेजबाबदार भूमिका घेण्याची पद्धत यांविषयी सविस्तर आढावा घेऊनही शोभणेंनी भाष्य केले. परंतु, त्यांनी भाषण सरधोपटपणे वाचून दाखवल्याने, त्यातील मजकुराला म्हणावे तसे टोक निश्चितच आले नाही. माध्यमांची, प्रशासनाची, तरूण वर्गाची साहित्यविषयक कर्तव्ये व भूमिका, याविषयीही संमेलनाध्यक्षांनी भाष्य केले. दै. ’मुंबई तरूण भारत’ने मुलाखतीच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत सविस्तर उद्बोधन त्यांनी आपल्या भाषणात केले, हे त्यांच्या चिंतनशील स्वभावाचे विशेष!

साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष या भूमिकेतून विद्रोहाने वेगळे संमेलन भरवणार्‍या विद्रोही व्यासपीठावरून काय कार्यक्रम होतात, हेही पाहण्याच्या उद्देशाने विद्रोही संमेलनाला शोभणेंनी दिलेली भेट कौतुकास्पदच. परंतु, त्यांनी त्यावेळी वापरलेले शब्द मात्र आक्षेपार्ह आहेत, हे विसरता येत नाही. विद्रोही संमेलनाच्या सभागृहात शोभणे यांच्या जाण्याने तेथील कार्यक्रम विस्कळीत झाला व तेथील आयोजकांनी शोभणे यांना सभागृहाच्या बाहेर जाण्याविषयी सूचवले. यावेळी ‘मी अस्पृश्य आहे का?’ असा उद्विग्न सवाल शोभणे यांनी विचारून, स्वतःची ‘शोभा’ करून घेतल्याचीच चर्चा साहित्य वर्तुळात अधिक रंगली. ’विद्रोही साहित्य संमेलना’चा मूळ उद्देशच नाकारलेपणाच्या भावनेतून झालेला. त्याच बरोबर ’अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’ला निषेध म्हणून हे संमेलन त्याच गावात त्याच दिवशी संमेलनाध्यक्षांचे लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने भरवले जाते. या पार्श्वभूमीवर संमेलनाध्यक्षांचाही अपमान होणे योग्य नाही. तसेच ’विद्रोही संमेलन’ आपला मूळ उद्देश बाजूला सारून, केवळ जातियवादी विरोध करण्यावर भर देत आहे. विद्रोही साहित्य अनेक प्रकारचे असते, विद्रोहाला अनेक आयाम, अनेक प्रकार असतात; मात्र या कोणत्याच प्रकारचे साहित्य या व्यासपीठावरून दिसून आले नाही, ही बाब खेदजनकच.

या वर्षीच्या साहित्य संमेलनात अनेक विषयांवर परिसंवाद झाले. तसेच एकंदरीतच विषयांत विविधता दिसून आली. व्यासपीठावर तरूण मंडळी काही प्रमाणात दिसून आली. जनजातींसाठी आपले जीवन व्यतीत केलेल्या पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे यांची प्रकट मुलाखत सुरेख रंगली. पार लैंगिक प्रश्नांबाबत उहापोह करण्याची संधी गेल्यावर्षी पहिल्यांदा देण्यात आली होती, यावर्षी एक संपूर्ण परिसंवादच या विषयावर घेण्यात आला. सोबतच प्रश्नोत्तरांचे सत्र झाले. मराठी भाषा, विज्ञान साहित्य, नवतंत्रज्ञानाचा साहित्यातील वापर, विनोदी साहित्य, साहित्यिकांचे शताब्दीस्मरण अशा अनेक विषयांवर परिचर्चा घडल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त शस्त्रप्रदर्शन, साहित्यिकांचे स्वभावविशेष सांगणारे चित्रकार बोधनकर यांचे संमेलनाच्या आवारातील चित्रप्रदर्शन लक्षवेधी ठरले.

तेव्हा, शंभरीची वाट चालताना, संमेलनातील अनेकविध पैलूंवर विविध स्तरांवरून मंथन होणे, चिंतन होणे गरजेचे. संमेलनाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी, संमेलनाने कालसापेक्ष होणे आणि वाचक, रसिकांनीही या संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला, तर हा साहित्यिकांचा मेळा अधिकच खुलेल, हे नि:संशय!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.