वेगे वेगे धावू...

    05-Feb-2024   
Total Views |
Giant Tortoises
 
ससा कासवाची गोष्ट अगदी सुपरिचित. वेगाने धावता येऊ शकणारा ससा शर्यत हरतो, तर सावकाश पण स्थिर वाटचाल करणारे कासव मात्र शर्यत जिंकते. अशा बोधकथा आपल्याला बालपणापासूनच पर्यावरणाशी आणि विविध परिसंस्थांशी कळत-नकळतपणे जोडत असतात. मात्र, आता अशाच प्रकारे डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला आव्हान देत, एका विशिष्ट प्रजातीचे कासव ही शर्यत पुन्हा एकदा जिंकू पाहतेय.
 
महाकाय कासवे (Giant Tortoises) ही जमिनीवरील कासवांच्या प्रजातींमधील दुसरी सर्वांत मोठी कासवांची प्रजाती. ही कासवे मादागास्कर आणि गॅलोपॅगास या बेटांवर आढळत होती. पण, कासवांच्या प्रजातींमधील एक अतिशय महाकाय, नामशेष झालेल्या एका कासवाची प्रजात पुन्हा आढळली आहे. तब्बल 600 वर्षांनंतर ही नामशेष झालेली कासवे पुन्हा दिसू लागल्याने, लवकरच ती मोठ्या संख्येने दिसू लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मादागास्कर आणि गॅलोपॅगास या बेटांवर आढळणार्‍या, या कासवांना तब्बल सहा वर्षांच्या दीर्घकालीन प्रकल्पानंतर पुन्हा पुनरुज्जीवित करणे शक्य होत आहे. 'Aldabra' या प्रजातीच्या कासवांचा पहिला गट 'Aldabrachelys gigantea' 2018 मध्ये सेशेल्समधून दाखल झाला. तेव्हापासून ही कासवे प्रजनन करत होती. गुरे चराईमुळे खराब झालेल्या एखाद्या प्रदेशामध्ये या महाकाय कासवांना नैसर्गिक अधिवासात सोडले, तर अनेक समस्यांना आळा घालता येऊ शकतो, असे काही पर्यावरण शास्त्रज्ञांचे मत. यामध्ये गवताळ प्रदेश, बेटांवर असलेली जंगले, झुडुपे यांचा समावेश असून, यांचे पुनर्संचयन करण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे मत पर्यावरण शास्त्रज्ञांनी मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर भविष्यात जंगलातील विनाशकारी आगी रोखण्यासाठीही याची मदत होईल, असे सांगितले जाते.

’गॅलापॅगोस’ महाकाय कासवे ही ’अल्दाब्रा जायंट’ जगातील कासव कुळातील दुसरी सर्वांत मोठी प्रजात आहे. या ‘अल्दाब्रा’ प्रजातीतील कासवे 100 वर्षे जगू शकतात. या कासवांच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाबद्दल थोडक्यात सांगायचे, तर 2018 मध्ये ’अल्दाब्रा’ महाकाय कासवांची एक तुकडी मादागास्करमध्ये आणण्यात आली. 12 कासवांच्या या तुकडीमध्ये पाच नर आणि सात मादी कासवांचा समावेश होता. मादागास्करमध्ये आणल्यानंतर साधारण वर्षभराच्या कालावधीत दोन कासवांच्या पिल्लांचा जन्म झाला. तसेच साधारण पाच वर्षांच्या कालावधीत जवळजवळ दीडशेहून अधिक कासवांच्या अंड्यांमधून पिल्लांनी जन्म घेतला. मादागास्करमधील शिकार्‍यांमुळे तब्बल 600 वर्षांपूर्वीच ही प्रजात त्या प्रदेशातून नष्ट झाली होती. 1500च्या दशकामध्ये सेशेल्समधून पुन्हा आणलेल्या, या कासवांच्या तुकडीमुळे पुनर्प्रस्थापनाच्या प्रकल्पाबरोबर साधारण विकसित होताच, लवकरच त्यांना अंजाजवी येथे सोडण्यात आले. पिल्ले आकाराने लहान असल्यामुळे शिकारी पक्षी, फिरस्ते कुत्रे, मांजरी अशा संभाव्य भक्षकांपासून त्यांना धोका असण्याची शक्यता असल्यामुळे, या पिल्लांचा बचाव करणे गरजेचे होते. यामुळेच पिल्लांचा योग्य विकास होईपर्यंत, त्यांना सोडण्यात आले होते.

त्याचबरोबर ज्या अधिवासामध्ये त्यांना मुक्त करायचे, ते तापमान, तिथले वातावरण अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्या गेल्या. या सहा वर्षांच्या प्रकल्पाला आता यश मिळाले असून, यामध्ये घेतले गेलेले निकष यांच्यावर आधारित या महाकाय कासवांच्या संख्येमध्ये आता वाढ झाली आहे. पण, या कासवांना पुनर्प्रस्थापित करण्यासाठी एवढा खटाटोप का? तर वर नमूद केल्याप्रमाणे गवताळ प्रदेश परिसंस्था, बेटांवर असलेली जंगले, झुडुपे हे अधिवास पुनर्संचयित करण्यासाठी या कासवांची नैसर्गिकपणे मदत होईल, असे पर्यावरण शास्त्रज्ञांना वाटते. त्याचबरोबर गेल्या 600 वर्षांमध्ये काही प्रदेशनिष्ठ वनस्पती प्रजातींचे निरीक्षण केल्यास, त्यांच्यामार्फत नैसर्गिक पुनरुत्पादन होऊ शकलेले नाही. याचाच अभ्यास आणि संशोधन केले, तर ही महाकाय कासवे या समस्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
 
अशा या प्रकल्पाद्वारे नैसर्गिक प्रजननाच्या माध्यमातून 2030 पर्यंत अंजजावी रिझर्व्हमध्ये 500, तर 2040 अखेर सुमारे दोन हजार जंगली महाकाय कासवांचा जन्म होणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे 600 वर्षांनंतर पुन्हा दिसू लागलेली ही कासवे म्हणजे जीवसृष्टीतील एक ऐतिहासिक आणि सकारात्मक घटनाच म्हणावी लागेल.


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.