विद्यार्थ्यांनी केला वाहतूक नियम पालनाचा निर्धार

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स च्यावतीने वाहतूक जनजागृती

    05-Feb-2024
Total Views |
IIMS Transportation Awareness

पिंपरी :
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)च्या एमबीए व एमसीए च्या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे कटाक्षाने पालन करण्याचा निर्धार केला.

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याच्या निमित्ताने वाहतूक पोलीस विभागाच्या सहकार्याने संस्थेच्या चिंचवड येथील 'यशस्वी भवन' च्या प्रागंणात आयोजित करण्यात या कार्यक्रमात वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सतेज जाधव यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम पालनाचे महत्व सविस्तर समजावून सांगितले.तसेच समाजातील प्रत्येक घटकाने वाहतूक नियम पालन ही आपली जबाबदारी मानायला हवी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. रस्त्यावरून वर्दळ करणाऱ्या वाहनांची वाढलेली संख्या, बेशिस्त वाहनचालक यामुळे नाहक वाहतूक कोंडी होते, तसेच दुर्देवाने अपघात घडल्यास प्रसंगी जीवितहानी होण्याचाही धोका असतो हे गांभीर्य लक्षात घेता सर्वांनी वाहतूक नियमांचे कसोशीने पालन केल्यास निश्चितच परिस्थिती सुधारू शकते असा विश्वास यावेळी बोलताना आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी व्यक्त केला.

यावेळी हेल्मेट परिधान करणाऱ्या,तसेच वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांना गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांनी सत्कार केला.तर आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी पोलीस उपनिरीक्षक सतेज जाधव, यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत सरोदे, ट्रॅफिक वार्डन लक्ष्मण क्षीरसागर व अक्षय कांबळे यांचाही सत्कार केला.

यावेळी विद्यार्थ्यांनी वाहतूक जनजागृतीविषयक पोस्टर प्रदर्शित केली. या कार्यक्रमाचे डॉ. पुष्पराज वाघ व प्रा. युगंधरा पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. तर पवन शर्मा यांनी आभार प्रदर्शन केले.