मुंबई : लालकृष्ण अडवाणीजी यांना भारतरत्न ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार घोषित करण्यात आला. त्यानंतर बावनकुळेंनी पोस्ट करत त्यांचे अभिनंदन केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "या देशाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री लालकृष्ण अडवाणीजी यांना भारतरत्न देण्याची माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेली घोषणा अत्यंत आनंददायी व सुखद आहे. देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांचा गौरव होणे ही माझ्यासह प्रत्येक भारतीय व रामभक्तांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांचे खूप खूप अभिनंदन."
"स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत अडवाणीजी यांची महत्त्वाची भूमिका आहे. देशाचे उपपंतप्रधान म्हणून त्यांनी केलेली कामगिरी मोलाची आहे," असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी अडवाणीजींना 'भारतरत्न' घोषित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले आहे.