मार्क्सवाद्यांच्या गुंडशाहीला कंटाळलेल्या बंगाली जनतेने तृणमूल काँग्रेसला सत्तेवर बसविले खरे, पण केवळ सरकारच्या नावात बदल होण्याखेरीज राज्यातील परिस्थितीत कसलाच गुणात्मक बदल घडला नाही. उलट बंगालची स्थिती आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली. तरीही या बेबंदशाहीविरोधात कोणा लेखकांनी आपले पुरस्कार परत केले नाहीत की, कोणा चित्रपट कलाकाराला तेथे राहण्याची भीती वाटत नाही! ‘इंडी’ आघाडीतील सर्वच पक्षांनी मौन पाळून आपला खरा चेहरा यानिमित्ताने जनतेपुढे आणला आहे.
प. बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेच्या अंधाधुंद परिस्थितीच्या नवनव्या दशा दररोज उघड होत आहेत. तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याने संदेशखाली भागात आणलेल्या मोगलाईच्या अंगावर शहारे आणणार्या दुष्कृत्यांच्या कहाण्या जाहीर झाल्यावर दीड-दोन महिन्यांनी त्याला अटक करण्याची कामगिरी पोलिसांनी केली. पण, हे सारे नाटक आहे, हे त्याला पोलीस ठाण्यात आणतानाचे व्हिडिओ पाहिल्यास लगेचच दिसून येते. हा शाहाजहान अतिशय रुबाबात आणि निर्भिडपणे पोलीस ठाण्यात चालत येताना दिसतो. तो आरोपी आहे की, एखादा नेता आहे की मंत्री, असेच त्याच्याकडे पाहून वाटते. एकाही पोलिसाने त्याला पकडलेले नाही की त्याच्या हातात बेड्या नाहीत. उलट त्याचे अंगरक्षक असल्याप्रमाणे पोलीस कर्मचारी त्याच्या मागून अदबीने चालत जाताना दिसतात.मुळात शाहजहान शेखला तृणमूल सरकारनेच सुरक्षित आसरा दिला होता. या काळात त्याच्या अत्याचाराचे पुरावे नष्ट करण्यचे कामही बिनबोभाट सुरू होते. पण, प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे दिसताच इतके आठवडे फरारी असलेला हा शाहजहान शेख अचानक पकडला जातो. इतका बालिशपणा जनतेला कळत नाही, असे वाटते काय? त्याला आता अटक झाली आहे, तीसुद्धा संदेशखालीतील अत्याचारांसंदर्भात नव्हे, तर त्याच्या गुंडांनी प. बंगालमध्ये चौकशीसाठी आलेल्या ‘ईडी’च्या अधिकार्यांवर केलेल्या हल्ल्यासंदर्भात. लवकरच तो जामिनावर बाहेर येईल, यात शंका नाही. पण, एका शाहजहान शेखला पकडल्याने बंगालमधील गुंडगिरीचे राज्य संपत नाही.
शाहजहान शेख कमी होता म्हणून की काय, आता तृणमूलच्या आणखी एका गुंड नेत्याच्या नव्या धमक्या प्रसारमाध्यमांतून जनतेपुढे येत आहेत. बीरभूम जिल्ह्यातील मयुरेश्वर-२ पंचायत समितीत उपसरपंच असलेला जटिलेश्वर मोंडल हा नेता मतदारांना उघडपणे धमकाविताना दिसतो. ‘जे मतदार तृणमूलला मतदान करणार नाहीत, त्यांचे हात कापले जातील,’ अशी उघड धमकी देतानाचे त्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत आहेत. गेल्या रविवारी बीरभूममधील उलकुंडा येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सभेत या जटिलेश्वरने गंभीर धमकी दिली. पोलीस, केंद्रीय सुरक्षा दले वगैरे हे निवडणूक पार पडल्यावर निघून जातील आणि मग आम्ही आम्हाला मत न देणार्या मतदारांकडे पाहून घेऊ. या जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद वगैरे आमच्याच (तृणमूल काँग्रेसच्या) हाती आहे, त्यांच्याकडून तुम्हाला कसलीही मदत मिळणार नाही, असे सांगून हा गुंड नेता म्हणतो की, ‘आम्ही तुमची हाडे मोडू. आमच्या विरोधात गेल्यास तुम्हाला घराबाहेरच पडू देणार नाही. माझे ऐकाल, तर घराबाहेर पडूच नका,’ इतके धमकावण्यापर्यंत त्याची मजल गेली आहे.तुम्ही राज्य सरकारकडून स्वस्तात धान्य घेता, सरकारी मदत घेता, पत्नीचे पेन्शन घेता, पण असे असूनही तुम्ही आमच्याविरोधात मतदान केले, तर तुमचे हात आम्ही कापून टाकू, अशी उघड धमकी या जटिलेश्वरने दिली. ही मदत म्हणजे जणू काही तृणमूलची खासगी मालमत्ता आहे, अशी त्याची समजूत असावी. याविरोधात बंगालमधील भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. पण, सुवेंदू अधिकारी यांनाच अटक करण्याची धमकी ममता सरकारने दिली. त्यांना यापूर्वी संदेशखालीत जाण्यापासून रोखण्यात आले होते. त्यासाठीही त्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. हे बंगालमधील मुक्त आणि निर्भय वातावरण आहे.
यापूर्वीही प. बंगालच्या ग्रामीण भागात अनेक मतदान केंद्रांवर मतदारांना मते देण्यापासून रोखणार्या तृणमूलच्या गुंडांचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले होते. पण, त्यावर कारवाई करण्याची हिंमत ना निवडणूक आयोगाने दाखविली ना सर्वोच्च न्यायालयाने. अनेक गावांमध्ये तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी खर्या मतदारांच्यावतीने स्वत:च मतदान केल्याचेही अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. आपल्या विरोधात मतदान केल्याचा संशय असलेल्या मतदारांची हत्या करणे आणि त्याच्या घरांना आगी लावणे, ही तृणमूलच्या कार्यकर्त्यांसााठी नित्याची गोष्ट आहे. प. बंगालमध्ये इतक्या उघडपणे आणि सरसकट गुंडशाहीने थैमान घातले असतानाही त्यांच्याविरोधात ना प्रसार माध्यमांमधून टीका होत आहे, ना कोणा कलाकारांनी आणि बुद्धिजीवींनी आपले पुरस्कार परत केले आहेत. भारतात, मुंबईत राहण्याची भीती वाटणार्या चित्रपट कलाकारांना प. बंगालमध्ये राहण्याची भीती मात्र वाटत नाही.कलाकार सोडा, पण ममताबानोंच्या अराजकी आणि पाशवी राजवटीविरोधात ‘इंडी’ आघाडीतील एकाही पक्षाने तक्रारीचा सूर काढलेला नाही. तक्रार सोडाच, अनेक पक्षांनी तर तेथे असे काही घडत आहे, हेही मान्य करण्यास नकार दिला. त्यांच्या मते प. बंगालमध्ये सारे काही आलबेल आहे.
जेथे बलात्काराची तक्रार करणार्या महिलांनाच बलात्कार झाल्याचे पुरावे दाखविल्याशिवाय तक्रार नोंदवून घेण्यास पोलीस नकार देतात, अशा या अद्भुत जगात कोण राहणार? प. बंगालमध्ये लोकशाहीच अस्तित्त्वात राहिलेली नाही, असे वक्तव्य करणारे लोकसभेतील विरोधी नेते व काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी यांच्या वक्तव्यास दुजोरा देण्यास काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्त्वच नकार देते. ‘बंगालमध्ये अशा गोष्टी घडतच असतात,’ असे काँग्रेस अध्यक्ष खर्गे बिनदिक्कत सांगू शकतात. असे असूनही, त्यांच्या मते, देशात लोकशाही आणि स्वातंत्र्य मात्र नरेंद्र मोदी यांच्यामुळेच धोक्यात आले आहे. ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ यासारख्या घोषणा देणार्या प्रियांका वाड्रासुद्धा संदेशखालीतील अत्याचारांवर मूग गिळून स्वस्थ बसल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या कथित घोषणेतील पोकळपणा उघड झाला आहे. विशेष म्हणजे, हिंदूंच्या आस्थेशी निगडित कोणत्याही मुद्द्याला विरोध करण्यास वेगाने पुढे सरसावणारे काँग्रेसमधील अनेक नामवंत वकील हेही याबाबत शांत बसून आहेत. एकंदरीतच आळीमिळी गुपचिळी अशी ‘इंडी’ आघाडीची अवस्था आहे. प. बंगालमध्ये कायद्याचे राज्य उरले नसले, तरी भाजपनेच देशात लोकशाहीचा गळा आवळल्याची मतलबी ओरड करण्यास सर्व विरोधी नेते पुढे येतात, यासारखा निर्लज्जपणा दुसरा नसेल!