९० व्या वर्षीही आशा भोसले गाजवणार श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य!
29-Feb-2024
Total Views |
गाण्याच्या चाहत्यांना आणि आशा भोसले यांचा आवाज ऐकण्याची लाईव्ह संधी मिळणार आहे. गेली अनेक वर्ष त्यांनी विविध प्रकारांच्या गायलेल्या गाण्यांचा आस्वाद मुंबईकरांना घेता येणार आहे.
मुंबई : भारतीय मनोरंजनसृष्टीतील सदाबहार गायिका म्हणजे पद्मभूषण आशाताई भोसले (Asha Bhosle). ५०-६० च्या दशकांपासून श्रोत्यांना केवळ हिंदीच नाही तर अनेक भाषांमधून सुमधूर गाणी ऐकवणाऱ्या आशातीई वयाच्या नव्वदीत देखील प्रेक्षकांचे गाऊन मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. आशाताईंच्या नव्वदीतही त्यांच्या सुरांची जादु श्रोत्यांना लाईव्ह ऐकण्याची संधी लवकरच मिळणार आहे. 'आशा @ 90: वो फिर नहीं आते' (Asha Bhosle) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पुन्हा एकदा श्रोत्यांना आशाताईंच्या आवाजाच्या दुनियेत हरवून जाण्याची संधी मिळणार आहे.
मुंबईत आशाताईंच्या 'आशा @ 90: वो फिर नहीं आते' ही सर्वात मोठी संगीत मैफल मुंबईतील जिओ गार्डनमध्ये होणार आहे. हा कॉन्सर्ट ९ मार्च रोजी जिओ गार्डन, येथे संध्याकाळी ७ वाजल्यापासून सुरु होणार आहे. यात आशाताई क्लासिकल बॉलीवुड हिट, गझल आणि सदाबहार गाणी अशा विविध गाण्यांचा नजराणा सादर करणार आहेत. या सुरेल मैफिलीत आशा भोसलेंना गायक सुदेश भोसले देखील साथ देताना दिसणार असून. त्यांची नात जानाई शास्त्रीय नृत्य सादर करणार आहे.
अनेक पुरस्कारांच्या मानकरी म्हणजे आशा भोसले…
आत्तापर्यंत आशाताईंनी अनेक पुरस्कारांवर नावं कोरली आहेत. राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आणि २००८ मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार;हे पुरस्कार आशा भोसलेंना प्रदान करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये देण्यात आला होता. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला. शिवाय २०२१मध्ये महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार देखील आशाताईंना प्रदान करण्यात आला होता.