अलीकडील काळात सर्पमित्रांनी सापांविषयीची सर्वसामान्यांची भीती दूर करून त्याबाबत कुतूहल निर्माण केले. याबाबत अशाच एका संशोधक वृत्ती असलेल्या देवदत्त शेळके या मास्तरविषयी...
सर्प विश्वातील असंख्य शंकांचे निरसन करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आणि देशभरातील सर्पमित्र आणि अभ्यासक देवदत्त शेळके यांना ‘मास्तर’ म्हणून ओळखतात. हा माणूस प्रसिद्धीच्या झोतापासून सदैव दूर असतो.देवदत्त शेळके सध्या अंबरनाथ येथे स्थायिक आहेत. शालेय अभ्यासासोबतच त्यांना वनस्पतींची आवड होती. त्यामुळे विद्यार्थी दशेत विविध प्रजातींच्या वनस्पतींची लागवड आणि बोन्साय बनवणे असे प्रयत्न ते सातत्याने करीत असत. शिवाय लहानपणापासून त्यांना तालीम कुस्ती, पोहणे आणि कबड्डीचीदेखील आवड. पुढे १९८७ साली कबड्डीतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली.वयाच्या अकराव्या वर्षी विहिरीत पोहताना कपारीतून धामण त्यांच्या अंगावर पडली. भीती तर वाटली, मात्र त्याचवेळी धाडस करून त्यांनी तिला पकडले आणि निसर्गात मुक्त केले.
एक जीव वाचवण्याचे समाधान त्यांना मिळाले खरे, मात्र तेव्हापासून त्यांच्या जीवनाला एक नवी दिशादेखील मिळाली. वन्यजीव सेवा किती महत्त्वाची आणि गरजेची आहे, ही जाणीव झाल्याने त्यांनी या क्षेत्राचा अभ्यास आणि संशोधन सुरू केले. अर्थात, सर्प अभ्यास करायचा कसा, हा प्रश्न होताच. मात्र, भरपूर वाचन करून त्यांनी यात मास्तरकी मिळविली. आज राज्यभर नव्हे, तर देशातदेखील त्यांचे अनेक शिष्य आहेत. त्यांच्या वडिलांनी यात त्यांना सहकार्य केले. पुस्तके जमा करून सापाच्या चित्रांवरून त्यांनी विविध सर्प जातींची माहिती मिळविली.तसा तर साप हा प्राणी भीती वाटावी असाच. मात्र, त्याच्याबाबत आकर्षण निर्माण व्हावे, त्याबाबतची सर्वसामान्यांची भीती दूर व्हावी, यादृष्टीने कार्य व्हायला हवे. केवळ सर्पमित्रांनी साप दिसला, तो पकडला आणि रानात किंवा जंगलात सोडून दिला, एवढ्यावर थांबून चालणार नाही, अशी त्यांची धारणा होती.
देवदत्त जेव्हा पदवीधर झाले, तेव्हा त्यांचे वडीलमित्र असलेल्या एका नामवंत सरीसृप तज्ज्ञाकडे घेऊन गेले. मात्र, त्यावेळी त्यांना उपहासाने ‘असे गारुडी मला रोज भेटतात’ असे म्हटले होते. या एका वाक्याने देवदत्त यांचे जीवन बदलले आणि मग त्यांनी ‘टॅक्सनोमी’ हा विषय निवडला. विशेष म्हणजे, सापांचे ‘जिन्स’, ‘जेनेरा’, ‘स्पिशीस’ ठरवण्याचे शास्त्र यावर संशोधन करताना, सापांना रेस्क्यू करणे आणि त्यांना अधिवासात सोडणे, हे काम चालूच होते. हे सुरू असताना कबड्डीची आवड असल्याने त्यातही देवदत्त यांनी यश संपादन केले. याच आधारावर त्यांना ‘राष्ट्रीय खेळाडू’ म्हणून बँकेत नोकरी लागली. बंगालच्या एका जगप्रसिद्ध सर्पतज्ज्ञाच्या सहवासात शेळके यांना अनेक गोष्टी शिकता आल्या. मात्र, आपल्याला पडलेल्या अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी हे कुतूहल सतत जागे ठेवले.
संशोधनात त्यांनी सर्पविश्वाच्या अनेक थिअरीही मांडल्या. अजूनही अनेक विषयांवर त्यांचे कार्य सुरू आहे. आगामी काळात सर्प अभ्यासासोबतच सर्पमित्रांना मार्गदर्शन किंवा त्यांना शास्त्रीय साप समजावून सांगणे, हे काम करण्याचा मानस असून सध्या नवीन प्रचलित सापात विभागानुसार एकाच जातीच्या सापांमध्ये जेनेटिक काही फरक असतो का? आणि त्यांच्या विषातील घटक वेगळे असतात का? यावर संशोधन त्यांनी सुरू केले आहे. उदाहरणार्थ, खानदेशात आढळलेल्या सापाच्या विषात तेथील हवामानानुसार असलेली तीव्रता आणि मराठवाड्यातील किंवा कोकणातील त्याच सापांमधील विषात आढळणारी तीव्रता, ही कमी-जास्त असते का? यावर ते गेली अनेक वर्षे कार्य करीत असून, यात त्यांना यश येत आहे. ‘व्हेनम कलेक्शन’ची जिल्हानिहाय थिअरी मांडण्याबाबत ते आग्रही आहेत. शिवाय व्याघ्र किंवा गिर प्रकल्पाच्या धर्तीवर सर्प संवर्धनाबाबत कार्य व्हावे, असे त्यांचे मत आहे.पत्नी पल्लवी शेळके यांचे त्यांना या सर्व संशोधनात खूप मार्गदर्शन लाभते. कारण, त्यादेखील ती कल्याण महानगरपालिकेत सध्या ‘चीफ सायंटिफिक ऑफिसर’ म्हणून कार्यरत आहेत.
आपल्या निवृत्तीनंतर त्यांना प्रवास आणि संशोधन यात वेळ द्यायचा आहे. शिवाय क्लायंबिग, ट्रेकिंग, बोन्साय बनवणे हे इतर छंददेखील ते जोपासतात. वन्यजीव संरक्षण, संवर्धन आणि संशोधनासोबतच या छंदाचीदेखील जोड असल्याने आयुष्यात एक वेगळेच समाधान लाभल्याचे शेळके आवर्जून सांगतात. पुढील काळात सर्पमित्रांना मार्गदर्शन किंवा त्यांना शास्त्रीय साप समजावून सांगणे हे काम अजून चालू आहे. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ते या विषयावर व्याख्यानेही देतात.देवदत्त शेळके यांना संशोधनादरम्यान साधारण ७५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामझ्ये ‘वाईल्डलाईफ’मधील सर्वोच्च असा ‘महाराष्ट्रभूषण’ (वाईल्ड लाईफमधील) ‘अंबरनाथ भूषण’, ‘अंबरनाथ वैभव’, ‘बेस्ट बोन्साय कलेक्टर’ अशा पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा.
अतुल तांदळीकर
(अधिक माहितीसाठी संपर्क - ९१४६६३३३६६)