रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपच लढवणार! राणेंचं सूचक ट्विट

    29-Feb-2024
Total Views |

Narayan Rane


मुंबई :
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक सुचक ट्विट केलं आहे.
 
नारायण राणे आपल्या 'X' अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्‍या जागेसंबंधी आपला हक्‍क दाखवित आहेत. रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे," असे ते म्हणाले.

 
रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा शिवसेना लढणार असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता ही जागा भाजपच लढवणार, असं सुचक ट्विट केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलं आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यापैकी कोणाचा उमेदवार रिंगणात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.