सौदीची परिवर्तनाची बांग

    28-Feb-2024
Total Views |
ministry of islamic affairs saudi arabia new rules
सौदी अरेबिया जगभरातल्या मुस्लिमांसाठी त्यांच्या धार्मिक आस्थेचा, रूढी-परंपरांचा विषय. मात्र, सौदी अरेबिया आता ‘व्हिजन २०३०’ अंतर्गत कमालीचा बदलत आहे. आपल्या रूढीवादी, परंपरावादी कट्टरता प्रतिमेपासून सौदी अरेबिया स्वतःला दूर करत आहे. सौदी अरेबियाच्या ‘मिनिस्ट्री ऑफ इस्लामिक अफेयर’ विभागाने रमझान, रोजा इफ्तारसाठी काही नियमावली जारी केली. त्या नियमानुसार आता सौदी अरेबियामध्ये कुणीही मशिदीमध्ये इफ्तार पार्टी करू शकत नाही.

मशिदीच्या प्रांगणात किंवा दुसर्‍या कोणत्यातरी नियोजित ठिकाणी इफ्तार पार्टी करावी, रोजा सोडावा. इफ्तार पार्टी संदर्भात संपूर्ण जबाबदारी त्या आयोजक इमामाची असेल. मशिदीमध्ये मौलवींचे नमाज किंवा उपदेशाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यालाही बंदी आहे. कोणत्याही माध्यमातून मशिदीमधील इमामांचे उपदेश किंवा नमाज प्रसारित करण्याला बंदी आहे. इतकेच नाही, तर इफ्तारसाठी इमाम निधी संकलन करू शकत नाहीत.अर्थात, या नियमांची कार्यवाही सौदी अरेबियाचे सध्याचे पंतप्रधान मुहम्मद बिन सलमान यांच्या आदेशानुसारच झालेली. त्यामुळे सलमान यांना जगभरातल्या मुस्लीम कट्टरपंथीयांनी अनेक दुषणे दिली. या कट्टरपंथीयांचे म्हणणे की, सलमान यांना सार्वजनिक जीवनातील इस्लामचा प्रभाव कमी करायचा आहे. पाश्चात्य देशांच्या वळचणीला जाऊन इस्लामच्या पारंपरिक संस्कृतीला सलमान क्षती पोहोचवत आहेत.थोडक्यात त्यावर कट्टरपंथीय नाराज. यावर प्रशासनाने या कट्टरपंथीयांना उत्तरही दिले. प्रशासनाने म्हटले की, मशिदीचे पावित्र्य आणि स्वच्छता अबाधित राहावी म्हणून मशिदीमध्ये इफ्तार पार्टीला बंदी घातली आहे. दुसरीकडे इस्लामचे पारंपरिक पावित्र्य टिकावे, इस्लाम श्रद्धाळूंची श्रद्धा आणखीन सशक्त व्हावी, यासाठी मशिदीमध्ये इमामांच्या नमाज आणि इतर उपदेशाच्या व्हिडिओे रेकॉर्डिंगला आणि इतर माध्यमातून प्रसाराला बंदी घातली.

हे सगळे नियम इस्लामच्या पारंपरिक श्रद्धास्थानी कार्यान्वित होत आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या हिंदूबहुल भारतात सगळ्याच छोट्या-मोठ्या मशिदींमध्ये आणि ‘भाईचार्‍या’च्या मोहिमेअंतर्गत अनेक मंदिरांमध्येही शाकाहारी इफ्तार पार्ट्यांचे आयोजन होत असते. मुंबईतील कितीतरी मशिदींवरील भोंगे हे परिसरातील अनेक वस्त्यांमधील घरांशी जोडलेले आहेत. रमझानच नाही, तर वर्षभर मशिदींमध्ये नमाज किंवा उपदेश सुरू झाला की, ते सगळ्या वस्त्या-वस्त्यांमधील भोंग्यांमधून ऐकू येते. सौदी अरेबिया हे आमचे श्रद्धा केंद्र आहे, असे मानणारे लोक भारतातही आहेत. ते सौदीच्या मशिदी, निधी संकलन, प्रसार माध्यमावर बंदी आणि इफ्तार संदर्भातले नियम मानतील का? असो. याआधीही सौदी प्रशासनाने पारंपरिक नियमांमध्ये अनेक बदल केले. जसे पूर्वी सौदी येथे हजला एकटी महिला जाऊ शकत नव्हती. मात्र, सलमान यांच्या कारकिर्दीत हा नियम बदलला गेला. आता महिला एकटी म्हणजे ‘मेहरम’ (म्हणजे नात्यातला काळजीवाहू पुरुष) शिवाय हज करू शकणार, तसेच पूर्वी सौदीच्या स्त्रियांना घरातल्या पुरुषांच्या मर्जीशिवाय पासपोर्ट बनवता येत नसे. ती तिच्या मर्जीने विवाह करू शकत नव्हती.

कितीही महत्त्वाचे कारण असले तरीसुद्धा महिला घरातल्या पुरुषांच्या संमतीशिवाय देशाबाहेर जाऊ शकत नव्हती. मात्र, सलमान यांनी हे सगळे कायदे नियम रद्द केले. त्यानंतरही अनेक सुधारणा झाल्या. जसे महिलांना वाहन चालवण्याचा अधिकार मिळाला. त्रिसुधारणेचा सौदी आलेख आपण पाहू. सौदीमध्ये मुलीसांठी १९५५ साली पहिली शाळा उघडली गेली. पुढे १९७० मध्ये महिलांसाठी पहिले विद्यापीठ सुरू झाले. सौदीतील महिलांना देशाचे नागरिक ओळखपत्र मिळण्यासाठी २००१ साल उजाडावे लागले. मुलींचा निकाह त्यांच्या इच्छेविरोधात कुणाशीही केला जाई. तिला नकार देण्याचा धार्मिक-सामाजिक अधिकारच नव्हता. इच्छेविरोधातील निकाहाला विरोध करण्याचा कायद्याने अधिकार सौदीतील स्त्रियांना २००५ साली मिळाला. महिलांना मतदानाचा अधिकारही २०१५ साली मिळाला. हा सगळा बदल सोपा नाही. सौदी अरेबिया सकारात्मक आधुनिक प्रतिमा बनवण्यासाठी कात टाकत आहे. त्यामुळे जगभरातले कट्टरतावादी अस्वस्थ. मात्र, सौदीच्या धार्मिक वारशामुळे आणि आर्थिक बलाढ्यतेमुळे हे कट्टरपंथी चुळबुळ करण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाहीत. हे सगळे पाहिले की वाटते, एक भारतीय म्हणून आपण किती भाग्यवान. तुर्तास बदलत्या सौदीचे अभिनंदन.