"मविआचे जालन्यातील उमेदवार मनोज जरांगे!"

    28-Feb-2024
Total Views |

Jarange


मुंबई :
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या वेळी वंचित बहुजन आघाडीने मनोज जरांगेंना जालना मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातून अभिजित वैद्य यांना उमेदवारी देण्याची मागणीही करण्यात आली आहे. 
 
जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य यांना महाविकास आघाडीचे कॉमन कॅण्डीडेट म्हणून जाहीर करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारीमध्ये किमान १५ ओबीसी उमेदवार असावे आणि ३ अल्पसंख्यांक उमेदवार असावेत, अशा मागणीचा प्रस्तावही वंचितने मविआला दिला आहे.

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "वंचित बहुजन आघाडीच्यावतीने एकुण २७ जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीला देण्यात आला आहे. या २७ जागांमध्ये काही जागांचा अपवाद वगळता बाकी सर्व जागांवर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत," असे ते म्हणाले.
संघर्ष करुन सहभागी झालो!
 
"आम्हाला महाविकास आघाडीत समाविष्ट करुन घ्या यासाठी सर्वात जास्त पत्र आम्ही दिले आहेत. संघर्ष करुन आम्हाला मविआत घ्या असं सांगावं लागलं. निमंत्रित म्हणून आम्ही सहभागी झालो आहोत. परंतू, आम्ही दिलेल्या प्रस्तावावर मविआच्या घटक पक्षांनी चर्चा करुन निर्णय घ्यावा," अशी मागणीही त्यांनी केली आहे.