दगडफेकीचं षडयंत्र राजेश टोपेंच्या कारखान्यात! चौकशी करा!

आमदार रोहित पवार आणि राजेश टोपेंवर प्रवीण दरेकरांचे आरोप

    27-Feb-2024
Total Views |

Jarange


मुंबई :
अंतरवाली सराटीत झालेल्या घटनेचं प्लॅनिंग राजेश टोपेच्या कारखान्यात झाल्याचे बारस्कर महाराजांनी सांगितले असल्याचा मुद्दा भाजप आमदार प्रविण दरेकरांनी मंगळवारी सभागृहात उपस्थित केला. तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते.
 
प्रविण दरेकरांनी मंगळवारी सभागृहात मराठा आंदोलन आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, "महाराष्ट्रात मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाले. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेत मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं. परंतू, हा निर्णय झाल्यानंतर जरांगेंच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात अशांतता आणि अराजकतेचं चित्र निर्माण झालेलं आहे."
 
"जरांगेंच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्याविषयी अनेक गोष्टी महाराष्ट्रातील जनतेसमोर आल्या आहेत. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या बारस्कर महाराजांनीही अनेक गोष्टी खुल्या केल्यात. अंतरवाली सराटीत झालेल्या घटनेचं प्लॅनिंग राजेश टोपेंच्या कारखान्यात झाल्याचे बारस्कर महाराजांनी सांगितले. या राज्यामध्ये जर कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असेल तर ते कोणीही असो त्याचे प्लॅनिंग करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मागे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. गुन्हे दाखल केले होते. या राज्यात सरकार म्हणून सर्वांना एकच न्याय पाहिजे. मनोज जरांगे जर आमच्या उपमुख्यमंत्र्यांबद्दल अशा प्रकारची भाषा बोलत असेल तर त्यांच्या वक्तव्याची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक केली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
 
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्रात जरांगेंच्या मोठमोठ्या सभा झाल्या. जेसीबीने फुलांची उधळण करण्यात आली. जरांगेंनी सांगितलं की, मी समाजाकडून एकही रुपया घेणार नाही. मग या सभांचे, जेसीबींचे आणि ट्रॅक्टरचे लाखों रुपये कुठून आलेत? या सगळ्या आर्थिक व्यवहारांची ईडीमार्फत चौकशी व्हायला हवी. जरांगेंना कुणी पैसे दिले, त्यांना कुठून फोन आहे, याची चौकशी झाली पाहिजे."
 
"मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. फक्त त्यांना एक फोन येत होता त्यांनाच ते विश्वासात घ्यायचे आणि तो फोन शरद पवारांचाच होता. शरद पवार जरांगेंना फोन करत होते. आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनीच केला आहे, असे संगीता वानखेडे यांनी जरांगेंवर आरोप करताना सांगितले," अशी माहितीही प्रविण दरेकरांनी सभागृहात दिली.