..आणि एका चाहत्याने चक्क ‘पद्मश्री’ पंकज उधास यांच्यावर बंदुक रोखली होती

    26-Feb-2024
Total Views |
 
pankaj udhas
 
मुंबई : “चिठ्ठी आई है आई है चिठ्ठी आई है...”, हे गाणं आजही कानावर पडलं की पद्मश्री पंकज उधास यांचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो. गझल विश्वात आपले अढळ स्थान निर्माण करणारे पद्मश्री पंकज उधास यांचे आज २६ फेब्रुवारीला मुंबईत निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे संगीत विश्वात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आठवणीत एक खास किस्सा जाणून घेऊयात.
 
पंकज उधास यांनी हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन तर केलेच, पण त्यांना खऱी ओळख मिळाली ती त्यांच्या गझल गायकीमुळे. पंकज उधास त्यांच्या गझलचे लाईव्ह कॉन्सर्ट बऱ्याच ठिकाणी करत होते. असंच एका कार्यक्रमात त्यांच्या चाहत्यांने असे काही कृत्य केले की सगळेच जण घाबरले. पंकज उधास यांच्या एका चाहत्याने त्यांना त्याच्या आवडीची एक गझल ऐकवण्याची फर्माईश केली होती. काही कारणास्तव पंकज यांनी त्याला नकार देताच त्याने बंदूक काढून त्यांच्या डोक्याला लावली. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी ती गझल गायली होती.
 
पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ साली गुजरातमधील जेतपूर येथे झाला. पंकज उधास यांचे मोठे भाऊ मनहर उधास हे हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे लहानपणापासून संगीत त्यांच्या घरात होते. १९९० मध्ये ‘ घायाल’ चित्रपटासाठी त्यांनी गानसम्राज्ञी पद्मभूषण लता मंगेशकर यांच्यासोबत ‘माहिया तेरी कसम’ हे मधुर गीत देखील गायले होते. तर १९९४ मध्ये पंकज यांनी गायिका साधना सरगम यांच्यासाथीने सोबत मोहरा चित्रपटातील ‘ना कजरे की धार’ हे गाणे देखील स्वरबद्ध केले होते. याव्यतिरिक्त ‘साजन, ‘ये दिल्लगी’ , ‘फिर तेरी कहानी’, ‘याद आयी’, यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायन केले होते.