भवतु सब्ब मंगलम्...

    26-Feb-2024   
Total Views |
 Dr. Sangeeta Ambhores


वैद्यकीय क्षेत्रातले एक सन्मानीय नाव म्हणजे डॉ. संगीता अंभोरे. याचबरोबर सामाजिक आणि कलाक्षेत्रातही डॉ. संगीता अंभोरे यांनी ठसा उमटवला आहे. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख.

संगीता तुकाराम अंभोरे सध्या गर्व्हमेंट ऑफ डेन्टल महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये साहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. दंतचिकित्सेमध्ये अनेक दशके काम करण्याचा त्यांना दांडगा अनुभव. महाराष्ट्रभर दंतचिकित्सा, आरोग्य चिकित्सेची शिबिरे त्या आयोजित करतात. गरजू गोरगरीब व्यक्तींना आरोग्य उपचारासाठी सर्वतोपरी साहाय्य करणे, तसेच गावखेड्यातील लोकांना अत्याधुनिक उपचार मिळवून देण्यासाठी त्या तत्पर आहेत. अथक प्रयत्नांनी त्यांनी शासनाच्या मदतीने ग्रामीण भागात दोन ठिकाणी डायलिसीस सेंटर उभारले. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये संवेदनशीलतेने काम करण्यासाठी त्या विविध स्वयंसेवी संस्थांना सहकार्य, मार्गदर्शन करीत असतात. ‘संवेदना’ संस्था तसेच ‘स्वराज फाऊंडेशन’ या दोन संस्थांच्या माध्यमातून राज्यभर त्यांचे सेवाकार्य सुरू आहे. तसेच रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीच्या सेवावस्तीतील आरोग्य कार्यामध्येही त्या सहभागी आहेत. त्यांनी अनेक संशोधनपत्रे लिहिलेली आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि फे्रंच भाषेवर प्रभुत्व असलेल्या संगीता ‘बॅचलर्स ऑफ डेन्टल सर्जरी’नंतर ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून त्यांनी ‘इनडोडॉन्टिक्स’विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्या शास्त्रीय संगीत शिकलेल्या आहेत.भरतनाट्यम् विशारद आहेत. इतकेच काय चित्रकलेमध्येही त्यांना विशेष प्रावीण्य आहे.

डॉ. संगीता अंभोरे यांचे हे यशस्वी जगणे पाहिले की वाटते, आजकाल अनेक महिला वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेतच, मग संगीता यांचे वेगळेपण काय? तर! एक स्त्री म्हणून वाट्याला आलेल्या विवंचनांना भांडवल न बनवता त्यांनी त्यावर मात केली. स्वतःसोबत कुटुंब आणि समाजाचेही हित साधले. अंभोरे कुटुंब मूळचे छत्रपती संभाजी नगर येथील कन्नड तालुक्यातील किशोर गावचे. तुकाराम अंभोरे आणि स्वयंप्रभा अंभोरे दाम्पत्यांना तीन मुले. त्यापैकी एक संगीता. तुकाराम हे सैन्यामध्ये तांत्रिक विभागात काम करायचे तर स्वयंप्रभा या शिक्षिका. दोघेही सामाजिका कार्यात अग्रेसर. तुकाराम यांच्या घरी ‘पँथर’च्या चळवळीचे कार्यकर्ते नेते यांचा राबता असायचा. त्यावेळी ‘दलित पँथर’चे गंगाधर गाडे, प्रितमकुमार शेवगाव, रतनकुमार पंडागळे अगदी सध्याचे मंत्री रामदास आठवले हेसुद्धा तुकाराम यांच्यासोबत असत. समाजाच्या उत्थानासाठी आपला खारीचा वाटा असावा म्हणून तुकाराम यांनी निवृत्तीनंतर शासनाकडून मिळालेला सगळा पैसा समाजासाठी उपयोगात आणला त्यासाठी ‘दलित पॅँथर’ हे माध्यम निवडले. याच संस्कारात संगीता जगत होत्या.

असो. दहावीनंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील दंतवैद्यक महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयाच्या दुसर्‍या वर्षात शिकत होत्या. चांगले स्थळ आले म्हणून त्यांचाही विवाह करण्यात आला. काही महिन्यांनी त्यांना मातृत्वाची चाहुल लागली. आयुष्याचे पट स्वतःच्या आवडीनुसार विणता येतातच असे नाही? त्यांच्या आयुष्यात एक दुर्घटना घडली आणि एका वर्षांत त्यांना माहेरी परत यावे लागले. त्यावेळी त्या महाविद्यालयाच्या तिसर्‍या वर्षाला शिकत होत्या. माहेरी आल्या आणि त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. संगीता यांच्यासाठी तो काळ कठीण होता. त्यांना आणि त्यांच्या कन्येला आयुष्यभर सांभाळणार का? असा प्रश्न अनेक जण अंभोरे दाम्पत्यांना विचारू लागले. त्यावेळी आई स्वयंप्रभा संगीता यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. त्यांनी संगीताला विश्वास, हिंमत दिली की, ‘इथेच जग संपत नाही. तुला आयुष्यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे आहे.’ आई आणि नुकतीच जन्मलेली लेक यांच्यामुळे संगीता यांच्या आयुष्याला प्रेरणा मिळाली. कुणावरही ओझे न बनता, स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या त्यांनी नोकरीसाठी मुंबई गाठली. नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले.

दहा वर्षं त्या मुंबईतील दंतवैद्यक महाविद्यालयात तात्पुरत्या म्हणून कार्य करत होत्या. लेकीच्या संगोपनासाठी आत्याला मुंबईला आणले. संगीता सकाळी महाविद्यालयात नोकरी करायच्या, दुपारी घरी लेकीला वेळ द्यायच्या आणि पुन्हा संध्याकाळी खासगी दवाखान्यात नोकरी करायच्या. असे आयुष्य होते. अथक कष्टांनी त्यांनी दहा वर्षांत मुंबईत जम बसवला. त्यांनी ‘नीट’ची परीक्षा आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांना तेव्हा दंतवैद्यक महाविद्यालयात मेडिकल ऑफिसर म्हणून कायम नोकरी लागली. आता त्यांना महाविद्यालयात शैक्षणिक क्षेत्रात काम करायचे होते. पण, तशी संधी उपलब्ध होत नव्हती. महाराष्ट्रात १५ डॉक्टर त्यांच्यासारखेच अनुभव, पात्रता असूनही वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी मिळत नव्हती. संगीता यांनी या सगळ्यांशी संपर्क साधला. सरकारकडे गार्‍हाणे मांडले. सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांची पूर्तता केली आणि स्वतःसकट संगीता यांनी इतर १५ डॉक्टरांनाही वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून संधी मिळवून दिली. या कामी मंत्री गिरीश महाजन यांनी या गटाला मार्गदर्शन सहकार्य केले. पुढे भाजप वैद्यकीय आघाडीचे डॉ. अजित गोपछडे यांच्या आरोग्य सेवा कार्याशी त्यांचा संपर्क झाला. यापुढेही संगीता यांना तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या करूणा आणि सम्यक विचारांच्या विज्ञाननिष्ठ विचारांनी समाजातील शोषित-वंचित घटकांसाठी कार्य करायचे आहे. ‘भवतु सब्ब मंगलम्’ हा विचार जिथंपर्यंत नेता येईल, तिथंपर्यंत कार्यान्वित करायचा आहे. त्यांचे विचारकार्य दिशादर्शक आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.