'वीर सावरकर' एक देशव्यापी असा चित्रपट; पद्मश्री दादा इदाते यांचे प्रतिपादन

    26-Feb-2024
Total Views | 124
Dada Idate on Veer Savarkar
 
मुंबई :  "भूतकाळ आणि वर्तमानकाळ या दोघांची सांगड घालून उज्ज्वल भविष्यासाठी तयार केलेला 'वीर सावरकर' हा देशव्यापी असा चित्रपट आहे.", असे प्रतिपादन सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते यांनी केले. 'वीर सावरकर' हा सुधीर फडके प्रस्तुत चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 'HD 4K' या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे नव्याने साकारण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनी (सोमवार, दि. २६ फेब्रुवारी) या हिंदी चित्रपटचा प्रीमिअर शो पार पडला.

सदर कार्यक्रम सावरकर दर्शन प्रतिष्ठान आणि स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई तर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते, सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव रवींद्र माधव साठे, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर उपस्थित होते. चित्रपटात स्वा. सावरकरांची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेंद्र गौड़ही यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधत दादा इदाते म्हणाले, "हिंदुत्वाचे पहिले नरेटीव स्वामी विवेकानंदांनी सर्वप्रथम जगभरात सेट केले. पुढे लाल-बाल-पाल यांनी तो धागा पुढे नेला. त्यानंतर हिंदु म्हणजे नक्की कोण याचे उत्तर खऱ्याअर्थाने स्वा. सावरकरांनी दिले आणि व्याख्येच्या रूपात ते जगासमोर सेट केले. 'मी हिंदु आहे' ही भावना प्रत्येकात रुजवली. आता गाफील न राहता आपल्याला हिंदुराष्ट्रनिर्मितीत सक्रियपणे सहभाग कसा घेता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे."

रवींद्र माधव साठे यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की, "वीर सावरकर चित्रपट मराठी, हिंदी व्यतिरिक्त इतर भाषांमध्येही यावा अशी सुधीर फडके यांची इच्छा होती. विशेषतः दक्षिणी भाषेत तो यावा असे त्यांचे स्वप्न होते. तेही लवकरच पूर्ण होईल. मूळ चित्रपट ३ तासांचा असून नव्याने तयार केलेला चित्रपट हा १ तास ५० मि. वर आणण्यात आला आहे. असे असले तरी चित्रपटाच्या मूळ गर्भितार्थाला धक्का लागलेला नाही. त्यामुळे सावरकरांच्या विचारांचे दूत बनून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे."

रणजीत सावरकर यावेळी म्हणाले, "बाबूजींनी त्याकाळी हा चित्रपट बनवायचा जणू ध्यास घेतला होता. हा चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तो एक विचार आहे. त्यामुळे अभ्यासाच्या दृष्टीकोनातून तो बघून स्वा. सावरकरांचे विचार पोहचवणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान वापरून केलेल्या बदलांमुळे सावरकरांचे विचार आजच्या पिढीपर्यंत नक्कीच मोठ्याप्रमाणात पोहोचतील, असा विश्वास आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121