मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आर्थिक वर्ष २०२३-२४ ची कोणतीही करवाढ न करता मालमत्ता कर देयके मुंबईकरांना ऑनलाईन उपलब्ध केली आहेत. तसेच, कर अधिदानासाठी ऑनलाईन सुविधेचा अधिकाधिक लाभ घेऊन भरणा करण्याकरिता महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागातील नागरी सुविधा केंद्रामध्ये देखील कर भरण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
दरम्यान, मालमत्ता कर देयक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ही देयके करदात्यांना ईमेलद्वारे पाठवली जात आहेत. शिवाय लघुसंदेश (एसएमएस) आणि व्हॉट्सऍप चॅटबॉटद्वारेही संदेश पाठवले जात आहेत. तसेच, सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयातील (वॉर्ड) नागरी सुविधा केंद्राच्या (CFC) काऊंटरवर मालमत्ता कराचा भरणा सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ऑफलाईन देखील केला जाऊ शकतो.