मुंबई : कोस्टल रोड हे पुर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या एका व्यक्तीचं स्वप्न आहे. ही ठाकरे गॅरंटी होती आणि आहे, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी केले आहे. सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. फेब्रुवारीच्या शेवट्च्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता आदित्य ठाकरेंनी या प्रकल्पाचे श्रेय आपले असल्याचे म्हटले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "गेले १०-१५ दिवस आम्ही पाहत आहोत की, कोस्टल रोडचे श्रेय घेण्याचं काम सुरु आहे. कोस्टल रोड पुर्ण झालेला नसतानाही त्याचं उद्धाटन करण्यात येत आहे. पण एक सत्य आहे की, कोस्टल रोड आणि एमटीएचएल हे दोन्ही काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. कोस्टल रोड हे पुर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या एका व्यक्तीचं स्वप्न आहे. ही ठाकरे गॅरंटी होती आणि आहे."
ते पुढे म्हणाले की, "गोखले पुलाचा विषय आम्ही सतत मांडला आहे. परंतू, पुल झाल्यानंतरही घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना किंवा ठराविक व्हीआयपींना वेळ नसल्यामुळे हे काम प्रलंबित होतं. गोखले पुलही अर्धवट असताना त्याचं उद्धाटन करण्यात येत आहे. जे कामं तयार आहेत तिथले उद्धाटन केले जात नाहीत. कारण या सरकारकडून श्रेय घेण्याचं काम करण्यात येत आहे," असेही ते म्हणाले.