अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती मधुरा वेलणकर हिने ‘मधुरव : बोरू ते ब्लॉग’ हा अनोखा नाट्याविष्कार प्रेक्षकांसमोर सादर केला. मराठी भाषा काळानुरूप कशी बदलली, मराठी साहित्यातील स्थित्यंतरे याचे नाट्य, नृत्य आणि संगीताच्या त्रिवेणी संगमातून लक्षवेधी सादरीकरण या नाट्यप्रयोगातून केले जाते. तेव्हा, दि. 27 फेब्रुवारीच्या ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या पार्श्वभूमीवर या अनोख्या नाट्यप्रयोगाविषयी मधुरा वेलणकर हिच्याशी केलेली हा खास बातचीत...
असा होता ’मधुरव ऑनलाईन’ ते ‘मधुरव: बोरू ते ब्लॉग’चा प्रवास
“मी मराठी माध्यमात शिकलेली मुलगी असल्यामुळे, लहानपणापासून मराठी भाषा ऐकणं, वाचणं याची सवय आहेच. शिवाय नाटक, चित्रपट, मालिका या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे, मराठी भाषेचा कायमच संबंध आला. त्यामुळे मराठी भाषेसाठी काहीतरी करावं, असं आधीपासून मनात होतं. पण, नेमकं काय हे सूचत नव्हतं. एका वृत्तपत्रात पाक्षिक लेख मी लिहीत होते, त्या सदराचं नाव होतं ‘मधुरव’. इतका लिखित ऐवज तयार झाला की, मी त्याचं पुस्तक केलं. त्यानंतर पुढे काय करायचं, हा विचार सुरू असतानाच, ’कोरोना’मुळे लॉकडाऊन लागला आणि सगळच ठप्प झालं. मग मला अभिजित साटम यांनी एक कल्पना सूचवली की, जुन्या-जाणत्या लेखक, साहित्यकारांच्या कलाकृती सगळेच जाणतात. पण, जे नवे लेखक किंवा आपले विचार विविध माध्यमांतून मांडणारी लोकं आहेत, त्यांना तू एक व्यासपीठ मिळवून देऊ शकतेस आणि याचमुळे आम्ही ‘मधुरव ऑनलाईन’ कार्यक्रम सुरू केला. त्यामध्ये जवळपास 500 लेख आले. ज्यातून नवी पिढी व्यक्त झाली. त्यातून मी निवडक 100 जणांचं लिखाण त्या ऑनलाईन कार्यक्रमात सादर केलं. त्याशिवाय प्रत्येक लेखकाचं एक स्वप्न असतं की, त्यांचं लिखाण किंवा साहित्य कुठेतरी प्रसिद्ध व्हावं आणि म्हणून मी ’आतिषबाजी’ हा एक अंक छापला. ज्यात निवडक 100 जणांचे लेख घेण्यात आले. त्यानंतर लॉकडाऊनच्या जंजाळातून आपण बाहेर आलो आणि पुन्हा ‘मधुरव’ हा कार्यक्रम प्रत्यक्ष सादर व्हावा, याचे स्वरूप काय असावे, हाच विचार सुरु झाला. मी एक कलाकार असल्यामुळे, मराठी भाषा आणि तिचा इतिहास, साहित्य, संस्कृती ही विविध सादरीकरणाच्या माध्यमातून जर का प्रेक्षकांसमोर पोहोचली, तर अधिक लोकांपर्यंत आपली मराठी भाषा पोहोचेल, या निष्कर्षावर येत, मी ‘मधुरव ः बोरू ते ब्लॉग’ हे संगीत, नृत्य आणि नाट्य यांचं मिश्रण असलेली कलाकृती सादर करण्यास सुरुवात केली. यात प्रामुख्याने 60 ते 70च्या दशकातील साहित्याचा उल्लेख केला असून, आम्ही सातवाहनांच्या राज्यापासूनचा इतिहास, मराठी भाषा कुठून, कशी आली आणि लढली, कशी श्रीमंत झाली आणि आणि आपल्यापर्यंत पोहोचली, ही भाषेची स्थित्यंतरे आम्ही या कलाविष्कारात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मातृभाषेचा स्वाभिमान आणि मातृभाषेची करमणुकीतून गोडी पिढ्यान्पिढ्या वाढत राहावी, यासाठी मनोरंजक पद्धतीचा आम्ही अवलंब केला आणि ‘मधुरव ः बोरू ते ब्लॉग’ ही कलाकृती प्रेक्षकांना स्वाधीन केली.
मराठी भाषा तग धरून ठेवण्यासाठी मराठी माध्यम शाळांची गरज!
काळानुसार व्यावहारिक भाषा शिकणंदेखील भाग आहे. याबद्दल बोलताना मधुरा म्हणाली की, ”मराठी भाषेविषयी आस्था तर आहेच. शिवाय इंग्रजी भाषा आयुष्यात फार उशिरा आल्यामुळे, मी ज्या मनोरंजन क्षेत्रात काम करते, तिथे माझं मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे, कधीच काही अडलं नाही. पण, महाराष्टबाहेर ज्यावेळी एक कलाकार म्हणून तुम्ही काम करण्यास जाता, त्यावेळी इतर भाषा पण महत्त्वाच्या असतात आणि त्या भाषांची किमान माहितीदेखील नसेल, तर त्याचा परिणाम हा तुमचा अभिनय कितीही उत्तम असेल, तरी तेथील भाषिक वर्तृळातील वावर कमी होतो. त्यामुळे आपल्याला हिंदी, इंग्रजी किंवा अन्य भाषांचे ज्ञानदेखील असायला हवे. पण, आपली मातृभाषा आपल्याला माहीत हवी, हे त्याहून अधिक महत्त्वाचे. पुढच्या पिढीला मराठी भाषा ही काय आहे? व्यवहारात तिचा कसा वापर केला पाहिजे, याचे ज्ञान घरातून पालकांनीच आपल्या मुलांना देणे गरजेचे आहे. मराठी माणसांच्या मुलांना मराठी भाषा समजण्यासाठी आणि तग धरून ठेवण्यासाठी मुळात मराठी माध्यमांच्या शाळांची देखील तितकीच गरज आहे. मराठी भाषा किती श्रीमंत आणि समृद्ध आहे, याची जाणीव लहान मुलांना करून देणं फार महत्त्वाचं आहे. काळानुरूप इतर भाषा अवगत करणं, जरी गरजेचं असलं, तरी मराठी भाषा शिकणं, हे प्राधान्य असलंच पाहिजे.
मराठी भाषा उत्तम शिकवणार्या शिक्षकांची फळी तयार करण्याची गरज
शिकवणं किंवा शिक्षण म्हटलं की, शाळा आणि शिक्षक हे महत्त्वाचेच. मराठी भाषेचा दर्जा आणि योग्य भाषेचे ज्ञान असण्यासाठी शाळा महत्त्वाची भूमिका पार पाडतात. याविषयी बोलताना मधुरा म्हणाली की, “आता शाळेचा विषय सुरूच आहे, तर मराठी भाषा शिकवणार्या उत्तम शिक्षकांची देखील तितकीच नितांत आवश्यकता आहे. याचं एक उदाहरण देते. ’कोरोना’ काळात मी मराठी भाषेत ’एमए’ केलं. पण, मला जे मराठी भाषा शिकवण्यासाठी शिक्षक होते, तेच ज्ञानी नव्हते. आम्हाला एखादा प्रश्न पडला, तर त्यांना उत्तरं देता येत नव्हती. त्यामुळे मराठी भाषेचा अभ्यास असणार्या आणि त्याबद्दल योग्य ज्ञान देणार्या मराठी शिक्षकांची फळी तयार करणेदेखील महत्त्वाचे आहे. तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, वाढीसाठी आणि आजन्म ती टिकून राहण्यासाठी शैक्षणिक पातळीवर मराठी भाषा भरभक्कम करणे आणि नव्या पिढीला मराठी भाषेबद्दल त्यांच्या मनात गोडी आणि कुतूहल निर्माण व्हावे यासाठी शिबिरं, व्याख्यानं किंवा कलांच्या माध्यमातून ते शिकवणं महत्त्वाचं आहे. माझ्या लहानपणी शाळेत काही महत्त्वाच्या दिवशी माईकवरून कार्यक्रम सादर केले जात होते. बर्याचदा शिक्षकांना काय कार्यक्रम सादर करावे किंवा विषय कसे घ्यावे, हे प्रश्नचिन्ह असायचे. माझी आजी शिक्षिका होती. तिने या समस्येचे निराकारण करण्याचे ठरवले आणि शाळेत विशेष दिवसाला कोणता कार्यक्रम सादर केला पाहिजे, याचे पुस्तक लिहिले आणि शाळांमध्ये वाटले. या सगळ्याचे तात्पर्य हेच की, शालेय जीवनात मराठी भाषा लहान मुलांच्या मनावर योग्यरित्या आणि त्यांच्या आवडीनुसार बिंबवली, तर आपली मातृभाषा ही पिढी आणखी श्रीमंत करून पुढे नेईल यात शंका नाही,” असे आपले प्रामाणिक मत मधुराने व्यक्त केले.
मालिकांमधील मराठी भाषेच्या सादरीकरणापूर्वी कलाकारांना वेळ द्यावा
सद्यःस्थितीला मराठी वाहिन्यांवर सुरू असलेल्या मालिकांमध्ये मराठी भाषेची किंवा मराठी भाषेतील अन्य बोलीभाषांची मोडतोड दिसून येते. यावर आपले मत मांडताना मधुरा म्हणाली की, ”ज्या पद्धतीने मालिकांचं चित्रीकरण अलीकडच्या काळात केलं जातं, कलाकारांना अभ्यास करण्यासाठी किंवा त्यावर काम करण्यासाठी वेळ मिळत नाही. वेळेच्या अभावामुळे हातात जी संहिता दिली आहे, ती बोलून दाखवा, अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे भाषेवर अभ्यासपूर्वक काम करता येत नाही आणि वरवर दिसणारा उथळपणाच प्रेक्षकांसमोर सादर केला जातो. फार पूर्वी ज्यावेळी मालिका प्रसारित होत होत्या, त्यावेळी हातावर मोजण्याइतपत मालिका असल्यामुळे व्यक्तिरेखा, तिची भाषा, संस्कृती यावर संशोधन आणि अभ्यास करून ती लिहिली आणि कलाकारांकडून सादर केली जात होती. पण, आताच्या मालिका सादर होताना, वेळेचा अभाव ही फार दुर्दैवी बाब असून, याचाच दुष्परिणाम मराठी भाषेच्या सादरीकरणावर दिसून येतो. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला जर त्याची व्यक्तिरेखा, तिची भाषा, संस्कृती जाणून घेण्यासाठी आणि तिची समृद्धी अधिक वाढवण्यासाठी पुरेसा वेळ दिला, तर ही समस्यादेखील दूर होऊ शकते,” असा सल्लादेखील यावेळी मधुराने नव्या कलाकारांना दिला.
समाजमाध्यमांचा सदुपयोग मराठी भाषेच्या प्रसारासाठी करावा
21व्या शतकात तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण गर्भश्रीमंत झालो आहोत. समाजमाध्यमांवर पाहिल्या जाणार्या आशयांत मराठी भाषा प्रयोगात बदल जाणवतो. याबद्दल व्यक्त होताना मधुरा म्हणाली की, “समाजमाध्यमांमुळे मराठी भाषा बदलली, हे जरी खरं असलं, तरी याच समाजमाध्यमांवर चांगल्या भाषेत, चांगल्या कलाकृती सादर करणार्या लोकांची संख्यादेखील उल्लेखनीय आहे. भाषा ही प्रवाही आहे, त्यामुळे काळ पुढे गेला की, ती बदलतेच. पण, तिचे मूळ स्वरूप टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, हे आपण ध्यानी ठेवले पाहिजे. समाजमाध्यमं ही आपल्या सोयीसाठी आहेत, त्यामुळे त्यांचा कसा वापर करावा आणि आपली मुळं कशी सांभाळावी, हे समजण्याइतके सगळेच जण ज्ञानी आहेतच. तंत्रज्ञानाला नाव ठेवण्यापेक्षा मराठी भाषेच्या प्रसारासाठी त्याचा सदुपयोग कसा करता येईल, यावर प्रत्येकाने भर देणं गरजेचं आहे.”
बोलीभाषेतील साहित्यनिर्मितीवर भर आवश्यक
मराठी भाषेत अनेक बोलीभाषा असून, त्यात दर्जेदार साहित्यनिर्मिती होते. ती अधिक व्हावी यासाठी काय करावे? असे विचारले असता मधुरा म्हणाली की, ”बोलीभाषेत तयार होणार्या साहित्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यावर भर असावा. शिवाय लिखाण, कल्पनाशक्ती, सादरीकरण या प्रक्रियेचे ज्ञान लोकांना देणंदेखील तितकेच आवश्यक आहे. बोलीभाषेत लिहिणार्या लेखकांना त्यांनी लिखाण कसं करावं, याचं प्रशिक्षण देत त्यांना दिशा दाखवली, तर बोलीभाषेतील साहित्य अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. कारण, बोलीभाषेत स्वतःची अशी गोडी आहे, त्यांच्या संस्कृतीत एक आपलेपणा आहे. तो जर का अधिक खुलून बाहेर आला, तर वाचकांना कुतूहल निर्माण होऊन, ते साहित्यदेखील अधिक प्रभावीपणे आपले स्थान तयार करू शकेल, यात शंका नाही.”
रसिका शिंदे-पॉल