गृहमंत्र्यांकडून पुणे पोलिसांचा गौरव; २५ लाखांचे बक्षीस जाहीर

    24-Feb-2024
Total Views |
Pune Police news


पुणे
: पुणे पोलिसांची अमली पदार्थ संदर्भात केलेली कारवाई ही अतिशय अभिमानास्पद असून अलिकडील काळातील ही अशा प्रकारची देशातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.आज येथे त्यांनी अलिकडेच पुणे पोलिसांनी जे जवळपास 3600 कोटी रूपयांचे ड्रग्ज जप्त केले त्यात सहभागी पोलिस अधिकार्‍यांचा सन्मान केला असून या कामगिरीबाबत 25 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.येथे आयोजित एका छोट्या समारंभात गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, उपायुक्त संदीपसिंग गिल आणि अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांचा गौरव केला.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ड्रग फ्री महाराष्ट्र ही मोहिम आपण राज्यात राबवित आहोत. अमली पदार्थ हे समाजाला आणि तरुणांना उद्ध्वस्त करतात. जे काम बंदुकीची गोळी करु शकत नाही ते काम हे अमली पदार्थ करीत आहेत. म्हणूनच त्या विरोधात झीरो टॉलरन्स पॉलिसी आम्ही अंगिकारली आहे. त्यानुसार पुणे पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आपण ही बाब गांभिर्याने घेतली पाहिजे की, जर पुणे पोलिसांनी जप्त केलेला हा साठा घरापर्यंत पोहोचला असता तर किती घरे उद्ध्वस्त झाली असती? अनेक ठिकाणी अमली पदार्थांचे कारखाने टाकले जात आहेत. पैशांची देवाणघेवाण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.

याअर्थाने ही कामगिरी महत्त्वाची आहे. आता पोलिसांनी हे आव्हान समजून ड्रग्ज कुठे तयार होते, त्याची कशी विक्री होती, त्यात कोण सहभागी आहे याचादेखील तपास करावा. या प्रकरणाचे विदेशातदेखील धागेदोरे असल्याचे ते म्हणाले.आयुक्त अमितेश कुमार यांनी आपणास आज पुणे दौर्‍यावर आपण येत आहात तेव्हा सहकार्‍यांची भेट घेऊ शकाल काय याबद्दल विचारणा केली. त्यावेळी आपण अतिशय आनंदाने होकार दिल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आयुक्त अमितेश कुमार, नवनियुक्त राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी, सहपोलिस आयुक्त प्रवीण पवार, अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त अमोल तांबे उपस्थित होते.