ठाणे : आगामी निवडणुकांचे वेध लागल्याने ठाणे जिल्हा निवडणुक विभागही सज्ज झाला आहे. यासाठी मतदार राजाचे अमूल्य 'मत' त्रिस्तरीय सुरक्षाकवचामध्ये सुरक्षित असल्याचे प्रात्यक्षिक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दाखवण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये मत टाकल्यानंतर आपले अमुल्य मत ज्या उमेदवाराला दिले त्याची पोचपावती ३६ व्हीव्हीपॅट मशिनद्वारे मतदारांना दाखवण्यात येत आहे. त्यामुळे ईव्हीएम विरोधात ओरड करणाऱ्यांना व्हीव्हीपॅट द्वारे चपराक बसली आहे.
प्रत्येक निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनबाबत काही जणांकडून शंका व्यक्त करण्यात येत असतात. मध्यंतरी काही राजकीय पक्षांकडुन ईव्हीएम मशिनऐवजी मतदानपत्रिकेचा वापर करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने याबाबत मतदारांमध्ये जागृती करण्याचे काम सुरू केले आहे.
त्यानुसार ठाणे जिल्हा निवडणुक विभागातर्फे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनवर मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येत आहे. यात मतदाराने मतदान केल्यानंतर ते कुणाला दिले हेही दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रातील मध्यवर्ती कार्यालयांमध्ये एकुण ३६ मोबाईल व्हॅनमधील व्हीव्हीपॅट मशिनदवारे ईव्हीएम जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएमबाबत तसेच मतदान प्रक्रिया समजावण्यासाठी २९ फेब्रु. पर्यंत ही मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली.