गोएंका शाळा प्रकरण : पोलिसांकडून नऊ जणांचे जबाब

    23-Feb-2024
Total Views |
 Thane bus molestation

ठाणे :  ठाण्यातील सी पी गोएंका या खाजगी शाळेच्या सहलीत बसमध्ये बस अटेंडन्ट जावेद खान याने शाळकरी मुलींचा विनयभंग प्रकरणी पालकांचा उद्रेक झाल्यानंतर शाळेच्या तीन शिक्षिका तसेच व्यवस्थापनातील तिघांचे निलंबन करण्यात आले होते. तर कापुरबावडी पोलिसांनीही गंभीर दखल घेत पीडित चार मुली आणि त्यांच्या पालकाचे तसेच बस चालकाचा असे नऊ जणांचे जबाब नोंदवून बस ताब्यात घेऊन पंचनामा केला.

ठाण्यातील सी.पी. गोएंका इंटरनॅशनल स्कूल या शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांची मंगळवारी घाटकोपर येथील एका थीम पार्कमध्ये सहल गेली होती. त्यावेळी सहलीच्या बसचा अटेंडन्ट जावेद खान याने काही विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता. या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी बस अटेंडन्ट जावेद खान याला अटक करून त्याचा जबाब नोंदविला आहे. गुरुवारी सदर प्रकरणी शाळा व्यवस्थापनाला जबाबदार धरून कारवाईची मागणी पालकांनी आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केल्यानंतर खाजगी शाळा व्यवस्थापनाने सहा जणांना निलंबित केले. यामध्ये शिक्षिका आणि प्रशासनातील तिघांचा समावेश आहे.