(VHP Alok Kumar Sandeshkhali)
नवी दिल्ली : "पश्चिम बंगालमधील संदेशखालीमधून तेथील सत्ताधारी पक्ष आणि मुस्लीम गुंड यांच्यातील असलेल्या परस्पर संबंधांच्या गंभीर बातम्या समोर येत आहेत. संदेशखालीतील वाढत्या हिंसाचारास राज्य सरकारचे संरक्षण आणि खुला पाठींबा मिळत आहे. त्यामुळे पीडितांना न्याय देण्यासाठी आणि अराजकतेला आळा घालण्यासाठी तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे!", असे विधान विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी केले.
पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे जमीन बळकावणे आणि महिलांचा लैंगिक छळ अशा अनेक घटना समोर येत आहेत. संदेशखाली येथील महिलांनी तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान आणि त्यांच्या साथीदारांवर लैंगिक छळ, हिंसाचार आणि जमीन बळकावल्याचा आरोप केला आहे. महिनाभरापूर्वी रेशन घोटाळ्याप्रकरणी शाहजहान यांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. तपासादरम्यान टीएमसीचे शेकडो कार्यकर्ते त्याठिकाणी जमले. त्यांनी घोषणाबाजी करत ईडी अधिकाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोड केली होती.
आलोक कुमार यावर म्हणाले, "संदेशखालीमध्ये पोलीस किंवा राज्य सरकारची नाही तर शेख शहाजहानची सत्ता चालते, हे केलेल्या अधिक तपासादरम्यान उघडकीस आले. येथील महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्वत: या प्रकरणाची चौकशी केली आहे. तसेच तेथील उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची चौकशी केली असून तपासाअंती शहाजहान आणि त्याच्या समर्थकांना तेथील महिलांचा लैंगिक छळ आणि बलात्कार करण्यात हात असल्याचे समोर आले आहे."
पुढे आलोक कुमार यांनी अनेक खुलासे करत लक्ष वेधले. ते म्हणाले, "याठिकाणी परिस्थिती इतकी भीषण होती की पीडितांची एफआयआरही नोंदवण्यात आली नाही. त्या लोकांना एखादी मुलगी पसंत पडली तर ते त्या मुलीच्या घरच्यांना मेसेज करून त्या मुलीला पार्टी ऑफिसमध्ये सोडायला सांगत. दहशतीने त्रस्त झालेले हे कुटुंब त्यांच्या मुलीला तिथेच सोडायचे आणि पुढचा निरोप आल्यावर तिला परत आणायचे. महिला आयोगाकडे महिलांच्या लैंगिक शोषणाच्या १८ तक्रारी आल्या असून त्यापैकी दोन तक्रारी बलात्काराच्या आहेत. महिलांविरुद्धच्या या घटना चिंताजनक असून सरकार आणि पोलिसांकडून तक्रारींवर कारवाई न करणे हे अधिक चिंताजनक आहे."
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, "ज्या राज्याच्या मुख्यमंत्री स्वतः एक महिला आहेत, ते राज्य महिलांवरील गुन्ह्यांवर कोणतीही कारवाई करत नाही, हे किती दुर्दैवी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शाहजहानवर कारवाई करण्याऐवजी तेथील सरकार त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. ममता बॅनर्जी शहाजहान आणि त्याच्या गुंडगिरीचा बचाव करत आहेत. ममताजींनी विचार करावा की तिथे कायद्याचे राज्य चालते आहे का? तिथल्या सरकारला राज्यघटनेनुसार राज्य चालवता येत आहे का?"