नवी दिल्ली : ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस हे भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मित्सोटाकिस यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. दोन्ही देशांत स्टार्टअप्स, शिपिंग आणि कनेक्टिव्हिटी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर उभयंतांमध्ये चर्चा झाली.
या भेटीदरम्यान, 'आम्ही प्राचीन आणि महान सभ्यता आहोत, आता आम्ही संबंधांना आधुनिक रूप देऊ, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर, दोन्ही देशांमधील स्टार्टअप्स, शिपिंग आणि कनेक्टिव्हिटी या गोष्टी देशांसाठी उच्च प्राधान्याचे विषय असून यामध्ये सहकार्य वाढविण्यावरही दोन्ही देशांनी भर दिला.
ग्रीस शेतीपासून संरक्षणापर्यंत प्रत्येक गोष्टीत भारताचा भागीदार असेल. तसेच, पंतप्रधानांनी गेल्या वर्षी ग्रीस भेटीची आठवण करून देतानाच दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत होण्याचे द्योतक असल्याचेदेखील सांगितले. तब्बल १६ वर्षांनंतर ग्रीसच्या पंतप्रधानांची भारत भेट ही एक ऐतिहासिक घटना आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत ही कौतुकाची बाब आहे, असे सांगतानाच पंतप्रधान मोदी म्हणाले, फार्मा, वैद्यकीय उपकरणे, तंत्रज्ञान, संशोधन, कौशल्य विकास आणि अवकाश यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे. तसेच, उभय देश गेल्या वर्षी या क्षेत्रात झालेल्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलत असल्याचेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.