विरार : दैनंदिन जीवनात डिजिटल माध्यमांचा आपण प्रामुख्याने वापर करत असतो. डिजिटल माध्यमांचा वापर करत असताना अनेकदा सायबर क्राईम घडण्याची दाट शक्यता असते म्हणूनच विवा महाविद्यालयातील बीएएमएससी विभाग (मराठी) आणि इका फाऊंडेशन विरार यांच्या संयुक्त विद्यमाने बापूजी बाबाजी जाधव स्मारक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, चांदिप येथे डिजिटल जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत विवा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन केले त्याचे अर्थ सांगून डिजिटल जागृती चे विविध संदेश विद्यार्थ्यांना दिले. विद्यार्थ्यांनी नाटक सादर करून डिजिटल माध्यमांद्वारे फसवणूक कशी केली जाते, फसवणूक झाल्यावर काय करावे इत्यादी बद्दल माहिती देण्यात आली. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, आर्थिक सुरक्षितता इत्यादी महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन डिजिटल जनजागृती बद्दलचे विविध व्हिडिओ दाखवून मुलांना शैक्षणिक जीवनात डिजिटल माध्यमांचा कसा लाभ होईल याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून इका फाऊंडेशन चे संस्थापक ॲड. श्रीहास चुरी व लाईन क्लबचे फाउंडर मेंबर दीपक भगत उपस्थित होते. बाबा जाधव चांदीप शाळेचे मुख्याध्यापक मा. सुभाष चव्हाण, विवा महाविद्यालयाचे साहाय्यक प्राध्यापक. बाळकृष्ण आईर साहाय्यक प्राध्यापक रुक्सार शेख यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. हा उपक्रम पार पाडण्यासाठी बीएएमएससी विभाग प्रमुख शाहीन महीडा, विवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वी. एस. अडिगल, विवा महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे, उप प्राचार्या डॉ. दिपा वर्मा यांचे साहाय्य लाभले.