UP मध्ये इंडी आघाडी फुटली?

    20-Feb-2024
Total Views |

 yadav
 
लखनौ : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपने 'अबकी बार चारशे पार'चा नारा दिला आहे. दुसरीकडे, देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन बनवलेली इंडी आघाडी शेवटची घटका मोजत आहे. भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी स्थापन झालेल्या विरोधी आघाडीला घटक पक्ष एक-एक करून सोडत आहेत.
 
इंडी आघाडीला आधीच, पंजाब, दिल्ली, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये मोठा झटका लागलेला असताना, आता उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा इंडी आघाडी फुटण्याच्या मार्गावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष इंडी आघाडीपासून वेगळे झाल्याची चर्चा आहे.
 
जागावाटपावरुन काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये फुट पडली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी उत्तर प्रदेशमध्ये सर्व काही सुरळीत आहे आणि जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशमध्येच याआधी इंडी आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आरएलडी जयंत चौधरींच्या नेतृत्वात एनडीएमध्ये सामील झाला आहे. आता काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये फुट पडल्यास, इंडी आघाडीचा हा शेवट असेल, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.