माफी नको, मार्ग शोधा!

    02-Feb-2024   
Total Views |
mark zhukergerg
 
फेसबुक’चे (मेटा कंपनीचे) सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग म्हणाले होते की, “When you give everyone a voice and give people power, the system usually ends up in a really good place.” पण, झुकेरबर्ग यांनी सोशल मीडियाबद्दल व्यक्त केलेला हा आशावाद एकांगीच ठरला. कारण, सोशल मीडियाने प्रत्येकाला ‘व्हॉईस’ची ‘पॉवर’ दिली खरी. पण, त्यापैकीच काही ‘व्हॉईस’ने एक वाईट, काळीकुट्ट आभासी दुनियादेखील निर्माण केली. आज या दुनियेतील छळ, कपट, अन्याय, अत्याचाराला लहान मुलांपासून ते तरूणवर्ग मोठ्या संख्येने बळी पडताना दिसतो. हे चित्र पाश्चिमात्य राष्ट्रांत तर अधिक विदारक.
 
म्हणूनच या सोशल मीडिया मालकांना त्यांच्या उत्पादन-सेवांमुळे रक्ताळलेल्या भीषण दुष्परिणामांचा आरसा नुकताच अमेरिकन खासदारांच्या समितीने दाखवला. यावेळी सोशल मीडियामुळे विविध कारणास्तव जीव गमवाव्या लागणार्‍या मुलांचे पालकही आवर्जून उपस्थित होते. मग काय, सोशल मीडिया ही ‘गुड प्लेस’ आहे, या भ्रमात वावरणार्‍या झुकेरबर्गला उपस्थित पालकांची सपशेल माफी मागावी लागली. त्यामुळे झुकेरबर्ग आणि अन्य सोशल मीडिया कंपन्यांच्या मालकांनी, या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांची पोपटपंची बंद करून, याविरोधात थेट कृतीकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज यानिमित्ताने प्रकर्षाने अधोरेखित झाली.
 
अशी ही वादळी चर्चा तब्बल साडेतीन तास चालली. या चर्चेच्या केंद्रस्थानी होता, तो प्रामुख्याने लहान मुलांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आदळणारा हानिकारक कंटेट. त्यातही अश्लील व्हिडिओ आणि फोटो. अमेरिकेमध्ये तर लहान मुलांच्या बाबतीतही ‘सेक्सटॉर्शन’च्या घटनाही वाढल्याची धोक्याची घंटा वाजवत, खासदारांनी सोशल मीडिया कंपन्यांचे कान उपटले. यामध्ये लहान मुलांना विविध आमिषे दाखवून, त्यांच्याशी मैत्री वाढवणे, त्यांची अश्लील छायाचित्रे, व्हिडिओ चलाखीने मिळविणे आणि मग त्यासाठी त्या मुलांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणे, अशा प्रकारांमध्ये अमेरिकेत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. २०२३च्या एका आकडेवारीनुसार, लहान मुलांशी संबंधित तब्बल १०३ दशलक्ष अश्लील कंटेटची दखल घेऊन, तो सोशल मीडियावरून हटविण्यात आला.
 
त्यामुळे असे प्रकार थांबविण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांनी आजवर काय केले, असा संतप्त सवाल यावेळी खासदारांनी उपस्थित केला. एवढेच नाही, तर सोशल मीडियाची थेट जीवघेण्या सिगारेटशी तुलना करून, सिगारेट जसे व्यक्तीला कर्करोगग्रस्त करून मृत्युपंथाला नेते, तसेच सोशल मीडियामुळे मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात आल्याची चिंताही खासदारांनी व्यक्त केली. सोशल मीडियावरील समस्यांचा पाढा त्यांच्याच मालकांपुढे वाचून, याविषयी तुम्ही आजवर काय केले आणि हे रोखण्यासाठी काय करणार आहात, म्हणून या मालकांवर प्रश्नांची सरबत्ती यावेळी करण्यात आली.
 
मग काय, आम्ही लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी नियम कठोर केले, त्यासाठी विशेष टीम, खास अब्जावधींच्या निधीची तरतूद केली, अशी सारवासारव सगळ्या मालकांनी केली. तसे त्यांनी केले असेलही; पण त्याचे सकारात्मक परिणाम सोशल मीडियावर निश्चितच दिसून आलेले नाहीत. तसेच सोशल मीडियावरील ९० टक्के अश्लील कंटेट हा अमेरिकेबाहेरून अपलोड होत असल्याचे स्पष्टीकरण देत, आपली जबाबदारी झटकण्याचाही प्रयत्न या मालकांनी केला. ‘आम्हीदेखील पालक आहोत, आम्हालाही सोशल मीडियावरील धोक्यांची पूर्ण जाणीव आहे,’ असे या मालकांनी भावनिकदृष्ट्या सांगितले खरे.
 
पण, दुर्दैवाने सोशल मीडियाचे मालक म्हणून विचार करताना, यांच्यातील पालकत्वच कुठे तरी हरवल्याचे दिसते. कारण, सर्वच सोशल मीडिया कंपन्या कठोरपणे कंटेटचे नियमन करण्यात, दोषींवर कारवाई करण्यात सपशेल अपयशी ठरल्या आहेत. उलट कोट्यवधी वापरकर्त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचा डाटा, प्रसंगी वापरकर्त्यांच्या खासगी माहितीशीही तडजोड करून आपले इमले उभारण्यातच ही मंडळी अधिक धुंद झालेली दिसतात. वर्तमान सोशल मीडियाची ही अशी भयावह परिस्थिती. त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या नवतंत्रज्ञानाची दिवसागणिक पडणारी भर. तेव्हा तंत्रज्ञानसंबंधी नियम, कायदे-कानून देशपातळीवर कठोर हवेच; पण जगालाही वैश्विक स्तरावर एकमुखाने याविषयी शाश्वत मार्ग शोधावाच लागेल!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची