कर्नाटकनंतर राजस्थानातही हिजाबहट्टाची धर्मांधता...

    19-Feb-2024   
Total Views |
jodhpur-hijab-controversy-heated-up-again-in-rajasthan

२०२२ साली कर्नाटकमधील हिजाबवरुन उठलेल्या वादंगाने अख्ख्या राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते. तत्कालीन भाजप सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबबंदी सक्तीची केल्याने धर्मांधांना चेव चढला. तसाच काहीसा हिजाबहट्टाचा प्रकार राजस्थानमध्येही अलीकडेच निदर्शनास आला. तेव्हा, अशा शक्तींना वेळीच रोखण्याची आज नितांत आवश्यकता आहे.

कर्नाटकमधील उडुपी येथे हिजाब परिधान करण्यास, शाळा व्यवस्थापनाने दिलेल्या नकारानंतर, त्या राज्यात उफाळून आलेला वाद विस्मरणातून गेलेला नसतानाच, तसाच वाद आता राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील पिपर शहरातील एका शाळेमध्ये निर्माण झाला. शाळेमध्ये गणवेशातच येण्याचे शाळा व्यवस्थापनाचे धोरण असताना, ते धोरण धाब्यावर बसवून, पिपर शहरातील शासकीय उच्च माध्यमिक शाळा क्रमांक दोनमधील दहा मुस्लीम विद्यार्थिनी हिजाब परिधान करून शाळेमध्ये आल्या. ही घटना शनिवार, दि. १७ फेब्रुवारीची. शाळेने त्यास हरकत घेतल्यानंतर, त्या मुलींचे पालक शाळेच्या प्राचार्यांशी तावातावाने हुज्जत घालत असल्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर झळकल्या. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. शाळा व्यवस्थापनाने गणवेश का आवश्यक आहे, त्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.

पण, संबंधित पालक काही एक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. ते लक्षात घेऊन, शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. योग्य गणवेशात न आल्याबद्दल, त्या शाळेतील एका शिक्षकाने त्या मुलींना शाळेच्या मैदानावर येण्यास प्रतिबंध केला. ही बाब त्या मुलींनी आपल्या पालकांना सांगितल्यावर, शाळा व्यवस्थापनाशी भांडण्यासाठी त्यांचे पालक शाळेत आले. ‘शाळेचे काहीही नियम असले, तरी आमच्या मुली हिजाबमध्येच येतील,’ असा आग्रह त्या पालकांकडून धरण्यात आला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. विद्यार्थ्यांनी गणवेशातच शाळेत आले पाहिजे, असे आम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतो. पण, त्यावरून एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी शाळेत येऊन गोंधळ घातला. आज हे सरकार आहे, उद्या दुसरे येईल; पण तुम्ही येथेच आहात, हे लक्षात ठेवा, अशी दादागिरीची भाषाही त्या मुलींच्या पालकांनी वापरली. दरम्यान, राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी विद्यार्थ्यांनी विशिष्ट गणवेशातच शाळेत आले पाहिजे, असे स्पष्ट करून, शाळेच्या आवारात अशी धार्मिक दादागिरी सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट केले. कर्नाटक राज्यात हिजाब परिधान करण्यावरून, मोठे वादळ उठले होते. आता ते लोण राजस्थानात पसरू लागल्याचे दिसते. अशा प्रकारांचा शासनाने कठोरपणे बिमोड करावयास हवा. वेळेच त्यास आळा घातला न गेल्यास, अशा प्रवृत्ती आणखी शिरजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

केरळमध्ये ’एसएफआय’ आणि ‘पीएफआय’ यांचे साटेलोटे!

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे तेथील डाव्या सरकारविरुद्ध कणखर भूमिका घेत असल्याने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या ’एसएफआय’ या विद्यार्थी संघटनेकडून त्यांच्याविरुद्ध निदर्शने केली जात आहेत, त्यांना काळे झेंडे दाखविले जात आहेत. राज्यपालांचा मोटारींचा ताफा अडविण्याचे प्रकारही घडले आहेत. डाव्या संघटनांची हिंसक निदर्शने लक्षात घेऊन, केंद्र सरकारने राज्यपालांना अधिक सुरक्षाही पुरवली आहे. पण, या निदर्शनात खंड पडलेला नाही. कोणाच्या इशार्‍यावरून ही निदर्शने होत आहेत, हे वाचकांना सांगण्याची आवश्यकता नाही. दोन दिवसांपूर्वी म्हणजे दि. १८ फेब्रुवारी रोजी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे वायनाडकडे निघाले असताना, मत्तानुर येथे ’एसएफआय’च्या निदर्शकांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. रानटी हत्तीच्या हल्ल्यात मरण पावलेल्या, अजीश यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राज्यपाल निघाले असताना, वाटेत ही निदर्शने झाली. राज्यपाल खान यांच्याविरुद्ध ते जातील, तेथे निदर्शने केली जात आहेत. पण, राज्यपाल त्या निदर्शकांना बेडरपणे सामोरे जात आहेत. या निदर्शनाबद्दल बोलताना, राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी एक खळबळजनक आरोप केला होता. ‘एसएफआय’ आणि बंदी घालण्यात आलेल्या ’पीएफआय’ यांचे साटेलोटे असून, त्यांच्या संगनमताने ही निदर्शने केले जात असल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे. गेल्या दि. २७ जानेवारी रोजी निलामेल येथे राज्यपालांना काळे झेंडे दाखविण्यात आले होते. त्यावेळी ज्यांना पकडण्यात आले, त्यामध्ये ’पीएफआय’चे सात जण असल्याचा दावा राज्यपालांनी केला आहे. या दोन्ही संघटना संगनमताने आपल्याविरुद्ध निदर्शने करीत आहेत, असे राज्यपालांनी म्हटले आहे. निलामेल येथील निदर्शनाच्या वेळी राज्यपाल आपल्या मोटारीतून बाहेर आले आणि त्यांनी निदर्शकांना त्यांचा हेतू काय आहे, अशी विचारणा केली. यावेळी पोलिसांनी जी अनास्था दाखविली, त्याबद्दल राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली. निदर्शकांना पकडेपर्यंत आपण येथून हलणार नाही, असे सांगून राज्यपाल तेथील एका दुकानासमोर ठाण मांडून बसले. या संदर्भातील ‘एफआयआर’ची प्रत आपणास मिळाली पाहिजे, अशी मागणीही राज्यपालांनी केली. अलीकडे केरळ विद्यापीठाच्या सिनेटच्या बैठकीच्या वेळी अध्यक्षपदी उच्च शिक्षणमंत्री स्थानापन्न झाल्याच्या घटनेबद्दलही राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिष्टाचाराचे संकेत धाब्यावर बसविण्यात आल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे. केरळमधील डाव्या आघाडीचे सरकार आणि राज्यपाल यांच्यात सध्या अत्यंत तणावाचे संबंध आहेत. तेथील डावे सरकार आपल्या विद्यार्थी संघटनांना राज्यपालांविरुद्ध निदर्शने करण्यास प्रवृत्त करीत आहेत. राज्यपालपद हे घटनात्मक पद असतानाही, केरळ सरकारकडून त्या पदाचा सातत्याने अवमान केला जात आहे. पण, असे सर्व घडत असतानाही, राज्यपाल तेथे खंबीरपणे पाय रोवून उभे आहेत.

मिथुन चक्रवर्तींनी ममता बॅनर्जी यांना खडसावले

सध्या प. बंगालमधील संदेशखाली परिसरात हिंदू महिलांवर झालेल्या अत्याचारांचे प्रकरण देशभर गाजत आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या असे काही घडले असल्याचे मानण्यास तयार नाहीत. हा सर्व संघाचा आणि भाजपचा बनाव असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात गुंतलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना बेड्या ठोकण्याऐवजी या घटनांविरुद्ध आवाज उठविणार्‍या जनतेलाच त्यांचे पोलीस लाठ्याकाठ्यांनी झोडपून काढत आहेत. ममता बनर्जी यांनी अलीकडेच संदेशखाली परिसर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला बनलेला असून, त्या भागातील हिंसाचारास संघ चिथावणी देत असल्याचा आरोप केला. ममता बॅनर्जी यांच्या आरोपांना भाजप नेते आणि प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी जोरदार उत्तर दिले. ममता बॅनर्जी यांचा आरोप खोडून काढताना, या सारखा निलाजरेपणा दुसरा असूच शकत नाही, असे चक्रवर्ती यांनी म्हटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम संपूर्ण देशात आहे. संघ ही नकारात्मक शक्ती नसून, सकारात्मक शक्ती आहे, असे मिथुन चक्रवर्ती यांनी लक्षात आणून दिले. संघाने वेळोवेळी देशकार्यासाठी झोकून दिल्याकडे मिथुन चक्रवर्ती यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत बोलताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेऊन, संघ हिंसाचारास चिथावणी देत असल्याचे आणि जातीय तणाव वाढवत असल्याचे वक्तव्य केले होते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करून, संदेशखाली प्रकरणी ममता बॅनर्जी या संघ आणि भाजपवर जाणूनबुजून टीका करीत आहेत. त्या टीकेला मिथुन चक्रवर्ती यांनी तितकेच सडेतोड उत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी या चोर सोडून संन्याशालाच फासावर लटकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, प. बंगालमधील राष्ट्रभक्त जनता ममता बॅनर्जी यांचे पितळ उघडे पाडल्यावाचून राहणार नाही!

९८६९०२०७३२
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दत्ता पंचवाघ

एम. ए. (अर्थशास्त्र), पत्रकारिता क्षेत्रात ३३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेपासून पत्रकारितेस प्रारंभ. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यटन आदी विषयांवर विपुल लेखन. आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी लेखन.