(RSS Nation First Dattatreya Hosbale)
लखनौ : "संघ आणि स्वयंसेवकांना स्वत:साठी काही करायचे नसून त्याच्यासाठी देश सर्वप्रथम आहे."; असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले. रा.स्व.संघाच्या कानपूर महानगरातील शाखा स्वयंसेवकांचे एकत्रिकरण नुकतेच पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
स्वयंसेवकांना संबोधत ते म्हणाले, "कुंभाराच्या चाकावर माती ज्याप्रकारे फिरते तशी ती विशिष्ट वस्तूचा आकार घेते. तसेच संघाच्या शाखेत येणारा स्वयंसेवक वैयक्तिक विचार न करता राष्ट्रहिताचा विचार करू लागतो. त्याच्या दृष्टीने संपूर्ण समाजाला तो कुटुंब मानू लागतो. हे संघाचे वैशिष्ट्य आहे. कुठल्याही स्वयंसेवकासाठी आपल्या शाखा क्षेत्रातील प्रत्येक कुटुंब स्वतःचे कुटुंब होत जाते."
पुढे ते म्हणाले, "शाखा हे असे ठिकाण आहे, जिथे येणारा स्वयंसेवक देश आणि समाजाच्या हिताचा विचार करून प्रत्येक कामाचा विचार करतो. जे लोक वर्षानुवर्ष शाखेत एकत्र येतात त्यांना एकमेकांची जात कोणती हे माहीत नसते. १९२५ पासून आजतागायत ही पवित्र परंपरा आपण जपली आहे. म्हणायला साधं वाटतं, पण त्याचं सातत्य राखणे तितके सोपे नाही."