रायगडमध्ये प्रथमच झाली या पक्ष्याची नोंद; महाराष्ट्रातील तिसरी नोंद

रायगडातील पहिली तर, महाराष्ट्रातील तिसरी नोंद

    18-Feb-2024   
Total Views |
red knot
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्रात तिसऱ्यांदा रेड नॉट (लाल जलरंक) या पाणपक्ष्याचे दुर्मिळ दर्शन झाले आहे. रायगड जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद असून गुरूवार दि. १५ फेब्रुवारी रोजी प्रथम या पक्ष्याचे दर्शन झाले. बहराई फाऊंडेशनच्या वैभव पाटील यांनी या पक्ष्याला प्रथम पाहिले असून त्यानंतर पुन्हा शनिवार दि. १७ फेब्रुवारी रोजी पक्षिनिरिक्षण करताना बहराई फाऊंडेशनचे इतर सदस्य हरीश पाटील, सुरेंद्र पाटील, अनुज पाटील, आशिष ठाकूर यांच्या समवेत या पक्ष्याचे दर्शन झाले.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील सारल या समुद्र किनाऱ्यावर या पक्ष्याचे दर्शन झाले आहे. Calidris canutus असे या पक्ष्याचे शास्त्रीय नाव असून यापुर्वी ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात तसेच पालघर जिल्ह्यातील चिंचणी किनाऱ्यावर अशा दोन ठिकाणी या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. या पक्ष्याचे आढळक्षेत्र हे संपूर्ण जगभरात आहे. हा पक्षी उत्तर अमेरिकेत वीण करतो, तर दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये हिवाळी स्थलांतर करतो. तसेच आर्टिकमध्येही या पक्ष्याची वीण होते आणि ऑस्ट्रेलियामध्ये ते हिवाळी स्थलांतरासाठी जातात. यावेळी ते पक्षी स्थलांतराच्या एकूण आठ आकाशमार्गांपैकी 'इस्ट एशिया-आॅस्ट्रेलेशिया' या आकाशमार्गाचा वापर करतात. भारतात हिवाळी स्थलांतर करणारे पाणपक्षी हे उत्तर आशिया खंडामधून येतात. यावेळी ते 'सेंट्रल एशियन' आकाशमार्गाचा वापर करतात. 'रेड नाॅट' पक्षी हे 'सेंट्रल एशियन फ्लायवे'चा वापर करत नाहीत. अशावेळी ठाणे खाडीत दिसलेला 'रेड नाॅट' पक्षी हा भरकटेल्या अवस्थेत याठिकाणी आल्याची शक्यता आहे.


'रेड नाॅट' पक्ष्याविषयी

'रेड नाॅट' हा २५ सेमी आकाराचा लहान पक्षी आहे. त्याचे वजन १०० ते २०० ग्रॅम एवढेचे असते. स्थलांतरादरम्यान हे मोठ्या थव्यांमध्ये दिसून येतात. या थव्यांमध्ये एकाचवेळी १० ते २० हजार 'रेड नाॅट' पक्षी असण्याची शक्यता असते. सर्वात लांब स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या यादीत 'रेड नाॅट' पक्ष्याचा समावेश होतो. साधारणे हे पक्षी कमीत कमी १० हजार किलोमीटरपर्यंत स्थलांतर करतात.
“रेड नॉटच्या नोंदीबरोबरच याआधी बहराई फाऊंडेशनने आत्तापर्यंत पाईड व्हिइयर, कॉमन क्वेल, क्रेस्टेड पोचर्ड अशा दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहेत. वाढत्या पर्यटनामुळे अलिबागचे किनारे प्रदूषित तिथल्या अधिवासाला धक्का पोहोचत आहे. त्यामुळे, अशा प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य टिकवून ठेवण्यास हे अधिवास संरक्षित करणे गरजेचे आहे.”

 - वैभव पाटील
पक्षी अभ्यासक, बहराई फाऊंडेशन


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.