शेतकऱ्यांना मोठा दिलासा! केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी हटवली

    18-Feb-2024
Total Views |

Onion


नवी दिल्ली :
केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठवली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने हा निर्णय घेतला असून कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने देशातील कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. ३१ मार्च २०२४ ही यासाठी अंतिम मुदत ठेवण्यात आली होती. त्यानंतर आता अंतिम मुदतीच्या आधीच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी हटवली आहे.
 
कांद्याचे कमी झालेले उत्पादन आणि वाढते भाव लक्षात घेत केंद्र सरकारने ८ डिसेंबर रोजी कांदा निर्यातबंदी घातली होती. तसेच ३१ मार्च २०२४ पर्यंत ही बंदी लागू करण्यात आली होती. दरम्यान, आता केंद्र सरकारने ही बंदी उठवल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय केंद्र सरकारने आता ३ लाख मेट्रीक टन कांदा निर्यातीला मंजूरी दिली आहे. तसेच बांग्लादेशमध्ये ५० हजार टन कांद्याच्या निर्यातीला मंजूरी देण्यात आली आहे.
 
गुजरात आणि महाराष्ट्रात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे लक्षात घेत सरकारने कांदा निर्यातबंदी हटवली असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना कांदा शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.